” काय मग गीता ? सोमवारी रिझल्ट आहे ना ? काय करायचं ठरवलंय बारावी नंतर ?
कुठे एडमिशन घेणार ? ”
हातातल्या चहाच्या कपात बिस्कीट बुडवून त्याच्या तुकडा तोडत कुलकर्णी काकांनी विचारलं आणि .. खिडकी जवळ उभी राहून सरबताचे घोट घेणाऱ्या गीताला अचानक ठसका लागला !
पुढे काय करायचं ? यापेक्षा ही आता बोर्डाचा निकाल चार दिवसांवर येऊन ठेपलाय याची जाणीव ” या प्रश्ना मुळे ” झाल्याने तिला उगीचच सरबताची चव कडवट लागली .
” अहो भाऊजी ! आधी काय दिवे लावते ही परीक्षेत ते बघायला हवं ..मग एडमिशन च बघू ” या शब्दात गीता च्या आईने ..अर्थात सुलभा ताईंनी परस्परच उत्तर देऊन एक प्रकारे तिचा उद्धारच केला ! पण एव्हढ्या वरच थांबल्या असत्या तर त्या सुलभाताई कसल्या ?
” नीता च्या वेळेस मात्र आम्हाला काही काळजी नव्हती हो ! अगदी दहावी आणि बारावी दोन्ही वेळेला आमची नीता मेरिट मध्ये येणार याची सगळ्यांनाच खात्री होती बघा . त्यामुळे….. ! ”
संभाषण नेहमी प्रमाणे गीता आणि नीता या बहिणींच्या तुलनेकडे वळू लागल्याचं पाहताच दोघींचे वडील श्रीधर रावांनी चिवड्याची डिश उचलून..
” गजा भाऊ ..अहो चिवडा घ्या ना … ” असं विषय बदलत सुलभा ताईंच वाक्य मध्येच तोडल.
पण गीता ला मात्र अश्या प्रसंगांची अगदी लहानपणा पासूनच सवय होती , नीता आणि गीता या सुलभा ताई आणि श्रीधर राव यांच्या संसार वेलीवर दोन वर्षांच्या अंतराने उमललेल्या कळ्या..पण आत्ता पर्यंतच्या आयुष्यात नियतीचे फासे मात्र दोघींसाठी काही एकसारखे पडले नव्हते , नीता मोठी म्हणून लाडाची या न्यायाने प्रत्येक गोष्ट तिला न मागता विनासायास … मिळत गेली , नवीन सायकल असो वा कपडे किंवा वह्या पुस्तकं नीताला सगळं नवीन मिळायच , आणि ” चांगलेच तर आहेत की , कुठं खराब झालेत ? ” अश्या पालुपदांनी मात्र नीताचे वापरून झालेले कपडे व पुस्तकं गीताच्या वाट्याला यायची , आणि ती ही सगळं हसतमुखाने , विना तक्रार स्वीकारायची .
किमान दुसऱ्या खेपेला मुलगा होईल ही इच्छा असणाऱ्या सुलभा ताईंचा गीता च्या जन्माने कदाचित अपेक्षा भंग झाला होता , त्यात नीता जन्माला आली होती तीच मातृ मुखी सदा सुखी या न्यायाने , गोरी पान नाकी डोळी सुंदर , बोलण्यात चुणचुणीत नसली तरी अभ्यासू , भरीस भर म्हणून सगळ्या परीक्षा मध्ये अव्वल येणारी !
गीता साठी मात्र ही वाट तितकी सुलभ नव्हती , मोठ्या बहीणी सोबत सतत होणाऱ्या तुलनेमुळे तिच्या पदरी नेहमीच उपेक्षा पडायची , एक अनामिक दडपण डोक्यावर असायचं
अर्थात श्रीधर रावांनी मात्र कधीच दोन्हीं लेकींमध्ये फरक केला नाही , अगदी लहानपणा पासूनच दोघींना माणुसकी आणि व्यवहार यांची शिस्तबद्ध शिकवण दिली . नीताच्या हुशारी च त्यांना जेवढ कौतुक वाटायचं तितकाच अभिमान गीता च्यां शांत , मेहनती आणि माणसं जोडणाऱ्या स्वभावाचा वाटायचा…ते नेहमी गीता ला अभ्यासा सोबत वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्यास प्रोत्साहित करायचे
शाळा, कॉलेज किंवा अगदी करियर बाबत त्यांनी दोघींना आपापली वाट निवडायचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं, पण बरेचदा ” उगीच घरात कलह नको ‘ या कारणाने अनेक प्रसंगांत ते मौन व्रत धारण करायचे !
” आमची नीता तर डॉक्टरच होईल बघा , प्रत्येक परीक्षेत पहिल्या पाचात असते ती ”
नीताचे असे जाहीर कौतुक करणाऱ्या सुलभा ताई गीता बद्दल मात्र फारश्या आशावादी नसायच्या , मग अशावेळी श्रीधर राव मात्र ” आमच्या गीतू ला माणसं जोडायचा खूप छंद , लीडर शिप क्वालिटी खूप छान आहे तिच्यात ,” अशी कौतुकाची थाप देत तिची बाजू सांभाळून घेत !
आणि अखेर तो निकालाचा दिवस उजाडला
इकडे गीता चा मात्र रात्रभर डोळ्याला डोळा लागला नव्हता , अगदी नीता प्रमाणे आपण ” मेरिट ,” मध्ये येणार नसलो तरी कॉमर्स घेतलय म्हटल्यावर त्यातल्या त्यात चांगले मार्क पडून पास व्हावं अशी तिची अपेक्षा होती पण इकॉनॉमिक्स चा पेपर थोडा … जड गेला होता, त्याची धाकधूक मनात होतीच ,
सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करून तिने बाप्पाला ” इकॉनॉमिक्स ,” साठी साकडं घातलं आणि आवरायला लागली ,
श्रीधर राव आवरून ऑफिस साठी जायला निघाले
” आज डबा नको , दुपारी जेवायला घरीच येईन , येताना पेढे आणतो ”
असं जाहीर करून घराबाहेर पडले , श्रीधर राव ” तोलारम आणि कंपनी ” मध्ये अकाउंट सांभाळायचे , पगार तुटपुंजा च होता पण बरीच वर्ष ते तिथेच चिटकुन होते त्यामुळे नोकरीत तसं स्थैर्य होतं आणि मुळातच देसाई कुटुंब मध्यमवर्गीय असलं तरीही अल्पसंतुष्ट आणि समाधानी असल्याने आहे त्यात व्यवस्थित भागायच..
” साहेब आज हाफ डे हवा होता ! नाही काही नाही , कन्येचा रिझल्ट आहे आज बारावी चां ”
शेठ च्या केबिन च दार उघडून दारातच अर्धवट वाकत , श्रीधर रावांनी अर्ध्या दिवसाची सुट्टी मागितली ..
” अरे वा ! देसाई… डीकरी बारावीत हाय के तुजी ? जा जा पण उद्या येताना ते पेढा आणायला विसरू नको हा”
असं म्हणत डोळ्यावरचां चष्मा नाकावर घेत मालक घनश्याम शेठ नी मिश्किल पणे परवानगी देऊन टाकली .
श्रीधर राव पेढ्याचा बॉक्स घेऊन घरात आले, गीता कॉलेज मधून यायची होती ,
दोन वाजता कॉलेज मध्ये निकाल मिळणार होता , त्यामुळे अडीच तीन पर्यंत ती येईल या अपेक्षेने जेवायचं थांबून ते आत बाहेर येरझाऱ्या घालत होते… सुलभा ताई मात्र निर्विकार पणाने टीवी समोर बसून होत्या …
तीन चे चार झाले.. नंतर पाच वाजायला आले तरी गीताचा पत्ता नाही म्हटल्यावर सुलभा ताईंच्या तोंडाचा पट्टा मात्र सुरू झाला … श्रीधर राव मात्र ” आज निकाल म्हटल्यावर बसल्या असतील सगळ्या मैत्रिणी गप्पा मारत कुठे तरी ” असा विचार करून आता आराम खुर्चीत बसले होते ,
घड्याळाच्या काट्यांनी सहाची उभी रेष दाखवली तेव्हा मात्र त्यांची धाकधूक वाढली .. काळजी वाटू लागली पण ही काळजी सुलभा ताईंना बोलून दाखवण्यात काही अर्थ नव्हता …अखेर
” नीतू .. बेटा जा बरं.. नारायण च्या दुकानातून गीताच्या दोघी तिघी मैत्रिणीं कडे फोन करून चौकशी कर पाहू ! कुठं आहेत सगळ्या ?”
गीता च्या स्वभावामुळे तिने बऱ्याच मैत्रिणी जोडल्या होत्या ..तरीही त्यातल्या त्यात खास म्हणून अनु आणि प्रीती कडे नीता ने फोन केले ….आणि घरात शिरताना तिच्या चेहऱ्यावर असलेले भाव पाहून श्रीधर रावांच्या काळजाचा ठोका चुकलाच !!!
” बाबा तिचा एक विषय गेलाय… इकॉनॉमिक्स ..बाकी सगळ्या मैत्रिणी पास झाल्यात .मी कॉलेज मधल्या पाठक मॅडम ना भेटून येते तुम्ही पुढे जावा अस प्रीतीला सांगून आपली गीतू कॉलेज मधून बाहेर पडली त्या नंतर कोणालाच भेटली नाही ” नीता ने सविस्तर बातमी पुरवली …
ते ऐकून सुलभा ताईंनी ” तरी बघा मी सांगतच होते… ” ह्या पालुपदाने बडबड सुरू केली पण श्रीधर राव मात्र वेगळ्याच काळजीत पडले , काही क्षण विचार करून ते खुर्चीतून ताडकन उठले , बाहेर आता उन्ह उतरून अंधाराची चाहूल लागली होती ..काही ही न बोलता त्यांनी अंगात जाकीट चढवलं पायात चपला सरकावून बाहेर पडले ..
” अहो आता तुम्ही कुठे निघालात असे ? कविता ताई , अशोक भाऊजी वगैरे मंडळी येतील आता पेढे मागत ….त्यांना काय उत्तर द्यायचं ? “….
हा सुलभा ताईंचा प्रश्न देखील त्यांनी नीट कानावर घेतला नव्हता !!
……. इकडे गीता झपझप पावलं टाकत निघाली होती , इतर वेळी संपता न संपणारा रस्ता …विचारांच्या तंद्रीत आणि भावनांच्या कल्लोळात कधी संपला आणि गावाची वेस ओलांडून ती भैरोबा च्या डोंगराचा चढ कधी चढू लागली ते तिलाही समजलं नाही…
एरवी भर दिवसा ही या डोंगराकडे यायचं गीताच काय पण इतर कोणाचं ही धाडस झालं नसतं …पण आजची बात काही औरच होती !
गीताच्या मनात असलेल्या दडपणा पुढे आज तिला हा निर्मनुष्य डोंगर … गुडघा भर उंचीच्या गवतातून जाणारी वाट आणि ही वाट संपल्यावर पुढे येणारी सुमारे हजारभर फूट खोल दरी याचं ही भय वाटत नव्हतं !
तशीच चालत चालत ती माथ्यावर येऊन पोहोचली तेव्हा पूर्ण अंधारून आलं होतं ..
वर पोहोचल्यावर तिला तिथल्या पाण्याच्या छोट्या कुंडा जवळचा दगड दिसला आणि
एकदम आठवलं ‘ लहान पणी सुट्ट्यांमध्ये बाबा तिला आणि नीता ला नेहमी या डोंगरावरून घेऊन यायचे आणि याच दगडावर बसून समोर दिसणाऱ्या त्या खोल दरी आणि जंगलात पूर्वी कसे प्राणी असत याच्या गोष्टी सांगायचे ….’ ते आठवून तिला पुन्हा एकदा भरून आलं, पण दुसऱ्याच क्षणी तिने ते विचार मनातून काढून टाकले आणि जो निर्धार करून ती आली होती ते साध्य करण्यासाठी ती दगडावर चढली …
आता मात्र मनातली कालवाकालव वाढली होती , चेहरा घामाने डबडबला होता , तिने क्षणभर डोळे मिटून घेतले तेवढ्यात त्या भयाण शांततेस चिरणारा आवाज तिच्या कानी पडला
” मार ना उडी…. निर्णय पक्का झाला आहे ना ! मग कसला विचार करतेस ?? ”
तिने दचकून मागे पाहिलं ..त्या अनपेक्षित आवाजानेच दचकून आपण तोल जाऊन दरीत खाली पडू की काय असं वाटून ती दोन पावलं मागे सरकली ..
” बाबा तुम्ही ?? ”
श्रीधर रावांना समोर पाहून ती आश्चर्याने ओरडली ….
” होय…मला ठाऊक होतं की तू इथेच येणार म्हणून ” शांत पणाने तिच्या कडे पाहत श्रीधर राव उत्तरले…
त्यांना पाहून मात्र गीताचं आता इतका वेळ धरून ठेवलेलं अवसान गळून पडलं …आणि ती तशीच त्या दगडावरुन उतरून श्रीधर रावांना जाऊन बिलगली आणि मग अश्रूंचा ही बांध फुटला..आणि ती हमसून हमसून रडू लागली ….
श्रीधर रावांनी देखील काही ही न बोलता तिला मनसोक्त रडू दिलं … थोडा वेळ मग आवेग ओसरल्यावर गीता च्या तोंडून रडक्या सुरात शब्द बाहेर पडले ” सॉरी बाबा ! तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकले , मी पास नाही होऊ शकले “….
श्रीधर राव त्यावर तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले ” अपेक्षा ?? कसल्या अपेक्षा ?? अगं एखादा विषय .. एखादी परीक्षा … किंवा डिग्री म्हणजे आयुष्य असतं का ? लक्षात ठेव तू जे विषय शिकातेस त्यातल्या जमा खर्चाच्या हिशेबा पेक्षा आयुष्याचा ताळेबंद खूप वेगळा असतो पोरी , आणि माझ्या आयुष्यात तुझं स्थान हे कुठल्या ही परीक्षेवर किंवा मार्कांवर अवलंबून नाही ! ”
” पण बाबा ! जर चांगलें मार्क नाही मिळाले किंवा नापास झाले तर नोकरी कशी……?”
आता गीता जरा सावरली होती ..पण तिला मध्येच थांबवत श्रीधर राव म्हणाले ” नोकरी ?? अगं प्रत्येक वेळेस नोकरी करण्याचीच इच्छा का ठेवतेस ? ”
” म्हणजे ???” कोड्यात पडून गीता विचारती झाली ..
” म्हणजे … अगं नोकरी करण्या पेक्षा आपण इतरांना नोकरी मिळेल असं काही तरी करण्याची इच्छा ठेवावी .. स्वावलंबी व्हावं आणि इतरांना आधार द्यावा ! आणि तुझ्या मध्ये ते गुण आहेत बेटा .. तू माणसं जोडू शकतेस…विचार कर .
परीक्षा महत्वाची असतेच …नाही असं नाही
पण एक गोष्ट लक्षात घे ” मेरिट ” हे नेहमी अभ्यासात किंवा परीक्षेच्या निकालात असतं असं नाही तर मेरिट हे तुमच्या तुमच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यातल्या स्थानावर अवलंबून असतं आणि तिथं परीक्षेचे मार्क कामी येत नाहीत तर समाजात तुम्ही कोणता मार्क म्हणजे ठसा उमटवत पुढे जाता ते खरं मेरिट ”
विचारात पडलेल्या गीता च्या कानावर ” चल बेटा ..घरी चल ” हे शब्द पडले आणि ती तिच्या बाबांसोबत यंत्रवत चालू लागली
” पण बाबा तुम्हाला कसं समजलं की मी इथे..” गीता चा प्रश्न पूर्ण होण्या आधीच श्रीधर राव हसत हसत उद्गारले ” बाप आहे तुझा मी .. कोणत्या वेळी तू कुठे जाशील हे मला चांगलं ठाऊक आहे …मला खात्री होतीच तू इथे येणार याची .!”
बाप लेक आता बोलत बोलत घरी पोहोचले
होते , सुलभा ताई ,नीता आणि पेढे मिळण्याच्या अपेक्षेने आलेले शेजारी व नातेवाईक मंडळी फाटका पाशीच उभे होते ..
श्रीधर रावांचा हात धरून येणाऱ्या गीता ला पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य ..कीव असे संमिश्र भाव होते तर काही वेळापूर्वी जरा सावरलेल्या गीता च्या चेहऱ्यावर मात्र पुन्हा एकदा आलेलं दडपण स्पष्ट दिसत होतं..
श्रीधर राव मात्र शांत आणि संयमी दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावर ते नेहमीचं प्रसन्न हास्य होतं…
त्याच आविर्भावात पुढे येत ते नीता ला म्हणाले ” नीतू बेटा अगं जा पेढ्याचा बॉक्स घेऊन ये ! सर्वांना पेढे वाट ”
हे ऐकून सगळेच बुचकळ्यात पडले ..कारण एव्हाना सगळ्यांना निकाल समजला होताच.. तरीही
अशोक भाऊंनी धाडस करीत विचारलंच ” पेढे ? पण वहिनी तर सांगत होत्या …आय मीन पास झाली का गीता ?? किती मार्क्स मिळाले ?? ”
नीता ने आणलेल्या पेढ्यांच्या बॉक्स मधील एक पेढा त्यांच्या हातात ठेवत श्रीधर राव म्हणाले ” अशोक …अरे मार्क्स कसले घेऊन बसलास..? आज माझी मुलगी मला परत मिळाली .. अगदी शंभर मार्क मिळण्या पेक्षा जास्त खुशी आहे यात ….घे अजून एक पेढा घे ”
आणि गीता अविश्र्वासाने भरल्या डोळ्यांनी तिच्या बाबांकडे पहात होती…..
…… आज ऑफिस मध्ये खूपच गर्दी होती .. स्वाभाविकच होतं म्हणा
सोमवार होता आज , बोर्ड ऑफ डायरेक्टर ची महत्त्वाची मीटिंग अकरा वाजता होती , एका नव्या कंपनी च्या टेक ओवर चा निर्णय त्यात होणार होता , कंपनीचे प्रमुख वितरक करारासाठी येणार होते ..त्या मुळे
” मॅनेजिंग डायरेक्टर अँड सी ई ओ ” च्या केबिन बाहेर बरीच गर्दी होती आणि सेक्रेटरी अपॉइंटमेंट नुसार एकेकाला मीटिंग साठी आत सोडत होती … अर्थात अल्पावधीत सुमारे अडीचशे कोटी चा टर्न ओव्हर करून नावारूपास आलेल्या ” मेरिट
इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ” या कंपनी साठी ही ” गडबड ..लगबग ” काही नवीन नव्हती ..
कंपनीत हेड अकाऊंटंट असलेल्या माधव ला .. एम डी च्या केबिन मध्ये जाण्यासाठी अपॉईंटमेंट ची आवश्यकता नव्हती …तरी ही केबिन मध्ये कोणी गेस्ट नाहीयेत ना ? याची एकदा खात्री करून टाय नीट करीत सावरून त्यांनी त्या आलिशान केबिन च्या दारावर टकटक करून दार अर्धवट उघडत
” मे आय कम इन ? अशी विचारणा करीत आत पाय टाकत दारातूनच अर्धवट वाकत आर्जव केलं
” गूड मॉर्निंग ..आज जरा हाफ डे हवा होता ! काही नाही आज सौरभ चा रिझल्ट आहे बारावी चा ..सो… !”
आणि ते ऐकून समोरील लॅपटॉप मधील नजर झटकन माधव कडे वळवली गेली आणि उत्तर आलं
” बारावी ? …अरे वा माधव सर तुमचा मुलगा बारावी ला होता ?? अवश्य घ्या सुटी आत्ता गेलात तरी हरकत नाही आणि उद्या येताना मात्र पेढ्याचा आख्खा बॉक्स माझ्या साठी आणायचा बरं ! ” आणि त्याच बरोबर एक प्रसन्न हास्य … आता समोरील लॅपटॉप बंद झाला होता …
” पुढे काय करायचं आहे आहे सौरभ च्या मनात ? ” त्यांनी विचारलं
” बघू आता मेरीट नुसार कुठे एडमिशन मिळेल त्या प्रमाणे …. ” माधव उत्तरला..
आणि
डोळ्या वरील चष्मा काढून खाली टेबलवर ठेवून खुर्चीतून उठत … एम डी ..अर्थात
गीता श्रीधर देसाई त्यांना म्हणाल्या
” माधव सर अहो खरं मेरिट हे परीक्षेच्या गुणांवर किंवा परीक्षेच्या पासिंग लिस्ट वर अवलंबून नसतं , तर उपजत गुणांचा वापर करून आयुष्यात आणि समाजात एका वेगळ्याच उंचीवर पोहोचणं हेच खरं मेरिट ..
सौरभ ला त्याच्या मनाप्रमाणे ज्या क्षेत्रात एक्सेल करता येईल तिथे जाऊ द्या …
हे सगळं भारावून ऐकून गीताला धन्यवाद देत माधव परत जायला निघाला …
आणि तेव्हढ्यात मागून पुन्हा गीताचा आवाज आला ..
” माधव सर..पेढे विसरू नका ह मात्र ! ”
आणि दोघे ही एकदमच हसत सुटले.
Leave a Reply