लक्षच लागेना कृतीत, करतोहे म्हणुन चुका !
मनस्थिती जाणा, ‘कामातुन गेला’ म्हणूं नका ।।
खिन्नपणा असुनही स्मिताचा यत्न स्तुत्य नच कां ?
राखा रे सन्मान ज़रा, ‘रडवेला’ म्हणूं नका ।।
नयनांचा ओलसर असे पडदा, तो नुरे सुका
तरि या विरहार्ता, ‘डोळे भरलेला’ म्हणूं नका ।।
अश्रूंचा पाझर हलकासा, दिसत नसे इतुका
पण, हळव्याला, ‘धीर मनी धरलेला’ म्हणूं नका ।।
संध्येच्या समयीं बुडली माझी कुटुंब-नौका
‘त्या’ वेळेला कोणी ‘पावन-वेला’ म्हणूं नका ।।
सखि गेल्यावर, टापटिपीच्या घर मुकलेंच सुखा
तरिही घर तें घर !, त्याला ‘तबेला’ म्हणूं नका ।।
मधुर घोट लावतात मजला विसराया दु:खा
अमृतास या, कुणि ‘मदिरेचा पेला’ म्हणूं नका ।।
ती गेली म्हणुनी आला मज वेडाचा झटका
तिची चूक ना, ‘दोषी’ प्राणप्रियेला म्हणू नका ।।
कॅन्सरग्रस्त सखी मम; तुम्हां यमाचाच पुळका !!
त्यानें तिजवर ‘उपाय योग्यच केला’ म्हणूं नका ।।
‘मृत्युस जाणें सामोरें’, मम सखीकडून शिका
मान्य, भले कुणि स्वत:ला ‘तिचा चेला’ म्हणूं नका ।।
नाहीं ठेवायचा मला कोणांवरही ठपका
उंच दोन-वच बोलल्यास, ‘चिडलेला’ म्हणूं नका ।।
हल्ली मज प्रत्येकच माणुस वाटे जरि परका,
मला ‘जगापासुनी पूर्ण तुटलेला’ म्हणूं नका ।।
‘जायचेंच मज आतां इथुनी’, विचार मनिं पक्का
परी, त्यामुळे, कुणिहि मला ‘हरलेला’ म्हणूं नका ।।
‘जीवित-प्रेत’च झालो मी, बसतां असह्य धक्का
तरिही जोवर श्वास, मढ्या या, ‘मेला’ म्हणुं नका ।।
शब्द उमटती, म्हणून, ‘कवि मी’ ही उठली भुमका
हृदयातिल रक्ता, ‘शब्दांचा झेला’ म्हणूं नका ।।
( दिवंगत पत्नी डॉ. स्नेहलता हिच्या आठवणीत )
मम : माझा / माझी / माझें / माझ्या
वच : बोल
भुमका : आवई , अफवा
– सुभाष स. नाईक .
M- 9869002126.
Leave a Reply