रविवारची सुट्टी. दुपारचं जेवण झाल्यावर मी गॅलरीत खुर्ची टाकून निवांत बसलो होतो. जूनचा महिना असल्यामुळे आभाळ भरुन आलं होतं. आता थोड्याच वेळात थेंब पडायला लागतील, असं भर दुपारी ‘नभ मेघांनी आक्रमिलं’ होतं.
तेवढ्यात मला कुणाचा तरी आवाज आला. होय, पाऊसच माझ्याशी बोलत होता. तो मला म्हणाला, ‘कसा आहेस मित्रा, ओळखलंस का मला?’ मी गोंधळून गेलो. मला काय बोलावं ते सुचेना.
‘अरे, मी तोच आहे. ज्याच्यासाठी तू लहान असताना आळवणी करायचास, ‘ये रे ये रे, पावसा.. तुला देतो पैसा.. पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठ्ठा..’ मी मात्र पैसा न घेता, लहानपणापासून तुला दरवर्षी भेटतच राहिलो. मी तोच आहे, तू मात्र बदललास.’
तुला आठवतं? तू लहान असताना आई वडिलांचं न ऐकता, भर पावसात कागदाच्या होड्या करुन, वाहत्या पाण्यात सोडायचास, काही होड्या पाण्याच्या प्रवाहात दूरवर जायच्या, काही उलट्या होऊन तरंगत रहायच्या. ती होती, आपली ‘पहिली’ भेट.
त्यानंतर आपण भेटलो, तू शाळेत गेल्यावर.. जून महिन्यात नुकतीच शाळेला सुरुवात झालेली असायची आणि माझी ‘हजेरी’ लागायची. तू शेवटच्या तासाला खिडकीतून माझ्यासाठी आर्जवं करीत रहायचा की, शाळा सुटल्यावर कसं ‘मस्त’ भिजत घरी जाता येईल.
आणि आज? आज तू ऑफिसच्या खिडकीतून माझं कोसळणं थांबण्याची वाट पहात राहतोस. मी नाहीच थांबलो तर छत्रीनं स्वतःचा माझ्यापासून बचाव करीत, रिक्षा करुन घरी जातोस. असा कसा रे, बदललास तू?
घरी आल्यावर बायको तुला वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी करुन देते. तुझा लहान मुलगा, होडी करुन देण्यासाठी तुझ्याकडे हट्ट करतो. तेव्हा तो पावसात भिजेल, त्याला सर्दी होईल म्हणून त्याला तू माझ्यापासून दूर ठेवतोस. असं तुझे वडील तर तुझ्याशी वागत नव्हते. असा कसा रे, बदललास तू?
शाळेनंतर काॅलेजमध्ये गेल्यावर तू माझ्यावर ‘जिवापाड प्रेम’ करु लागलास. मैत्रिणींबरोबर कॅन्टीनमध्ये गप्पा मारताना तुला मी तासनतास कोसळतच रहावं, असं वाटायचं. काॅलेजच्या लोणावळ्याच्या सहलीत माझ्या सहवासात तू मित्र-मैत्रिंणीसोबत ‘बेधुंद’ झाला होतास.
शिक्षणानंतर तुला उत्तम नोकरी लागली. ही आनंदाची बातमी घरी सांगण्यासाठी तू चालतच घरी पोहचलास, त्यावेळी मी तुझ्याच सोबत होतो. तुला भिजलेला पाहून आई-वडिलांचेही डोळेही कौतुकानं भिजले.
तुझ्या स्वप्नातली परी, ज्या दिवशी तुला भेटली. त्या क्षणाचा देखील मी एक साक्षीदार आहे. एकाच छत्रीत तुम्हा दोघांना रमतगमत फिरताना, सुखी संसाराची स्वप्नं रंगवताना, मी पाहिलंय.
कधीही रेनकोट न घालणारा तू, नंतर बदलत गेलास. पावसाळ्यात स्वतःला पूर्णपणे बंदिस्त करुन माझ्यापासून दूर होऊ लागलास…
मग मी देखील माझ्या मनात येईल, तेव्हाच बरसू लागलो. हवामान खात्याचे अंदाजही चुकवू लागलो.
शहरांतील झाडे तोडून, सिमेंटची जंगलं बेसुमार वाढायला लागली. मला अडवणाऱ्या डोंगरांची माणसांनी सपाटी केली. आता डोंगरच राहिलेले नाहीत…मग मी तरी कसा थांबणार? वाऱ्याच्या दिशेने मी देखील वाट मिळेल तसा, कसाही वाहू लागलो.
पूर्वी मी आलो की, सगळी तरुणाई पावसात भिजायला आतुर असायची. भुशी डॅम, लोणावळा, खंडाळा, माळशेजला गर्दी उसळायची. गरम गरम वडापाव व मक्याची कणसं खायला झुंबड उडायची. दिवसभर वारंवार पावसात भिजून, अंगावरच सर्वांची कपडे सुकून जायची.
आता तुम्ही विकऐंडला कधीही वाॅटरपार्कला जाऊन कृत्रिम पावसाच्या आनंदावर समाधान मानू लागलात. निसर्गापासून दूर दूर जाऊ लागलात… बदलत्या जीवनशैलीमुळे आता तुम्ही मागच्या पिढीसारखे कणखर राहिलाच नाहीत.
जितकं वय, तेवढे पावसाळे पाहिले, असं म्हणणारी पिढी आता नामशेष होऊ लागलेली आहे.. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा सोसण्याची ताकद आताच्या पिढीत राहिलेली नाहीये. पावसात भिजल्यावर सर्दी, खोकल्याची भीती दाखवून औषधी कंपन्यानी मात्र, आपला बाजार मांडलाय.
अजूनही वेळ गेलेली नाही, भेटत जा अधूनमधून… त्यासाठी मला तुझ्याकडून पैसा नको आहे. मला तू पूर्वीचाच, न बदललेला हवा आहेस.
मित्रा, आयुष्य खूप छोटं आहे…मी तोच आहे, तू मात्र बदलला आहेस…’
‘अहो, झोपलात की काय? हा घ्या चहा..’ मला ही जागं करीत होती.. तासभर पाऊस पडून, आता उघडीप झाली होती. मी आता फिरायला बाहेर पडण्याचा विचार करीत वाफाळलेल्या आल्याच्या चहाचा आस्वाद घेऊ लागलो…
© – सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
११-६-२१.
Leave a Reply