सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ लुई पाश्चर जन्म २७ डिसेंबर १८२२ रोजी फ्रान्समध्ये झाला.
१८६० साली ‘माणसाला सूक्ष्मजंतूंमुळे रोग होतो आणि त्याचा प्रसार लसीकरणामुळे खुंटतो’ असा शोध लुईने लावला. लुई पाश्चरला काही उद्योजकांनी ‘तुमच्या विज्ञानाचा आमच्या साखर आणि मद्य उत्पादनात सुधारणा करण्यासाठी काही तरी उपयोग करून दाखवा, मग आम्हीही तुम्हाला हवी ती मदत करू’ असं सांगितलं.पाश्चरनं कारखान्यातून चांगल्या दर्जाच्या आणि खराब झालेल्या मद्यचे नमुने गोळा करून त्यांचं सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केलं. त्यातल्या चांगल्या मद्याच्या थेंबांमध्ये त्याला ‘यीस्ट’ या बुरशीचे कण आणि त्यांच्याभोवती सूक्ष्मजीव वळवळताना दिसले. दारू तयार होताना काहीतरी चुकीचे घडायचे व दारू बिघडायची, याला हवेतून येणारे जंतू कारणीभूत आहेत, हे डॉ. लुई पाश्चरने सप्रमाण सिद्ध केले होते. त्या काळात या शोधनिबंधाने मोठीच खळबळ उडवून दिली. लुई पाश्चर आणि रॉबर्ट कॉच यांच्या मूलभूत कामगिरीमुळे जगाला ‘जर्म थिअरी’ची ओळख झाली. म्हणजेच आपल्या डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या सूक्ष्मजीवांमुळे माणूस आजारी पडू शकतो, त्याला रोग होऊ शकतात, तसंच तो मरूसुद्धा शकतो या गोष्टींवर लोकांचा प्रथमच विश्वास बसला! रॉबर्ट कॉचनं सूक्ष्मजीव माणसांना रोग कसे देतात हे शोधण्यात लुई पाश्चरवर मात केल्यामुळे पाश्चरला काही तरी वेगळं करून दाखवावंसं वाटत होतं. त्यामुळे आणखी काही शोधांनंतर अचानक पाश्चरनं आपलं लक्ष रेबीज या रोगाकडे वळवलं.
रेबीज झाल्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा जबडा पाश्चरचे दोन नोकर दोन्ही बाजूंनी फाकवून धरायचे, आणि पाश्चर त्या कुत्र्याच्या तोंडात काचेची पोकळ नळी खुपसायचा. त्यात त्या कुत्र्याची लाळ जमा व्हायची. हे अतिशय धाडसी आणि धोकादायक काम असलं तरी पाश्चर अतिशय निश्चयी स्वभावानं ते करायचाच. अगदी त्याच्या लग्नाच्या दिवशीही तो प्रयोगच करत होता. चर्चमध्ये सर्व वर्हारडी नवर्याय मुलाची, पाश्चरची वाट पाहत होते, पण पाश्चरचा पत्ताच नव्हता. तो प्रयोगशाळेत नाही तर आणखी कुठे सापडणार? असा विचार करून त्याचा मित्र प्रयोगशाळेत पोहोचला. तिथे पाश्चर महाशय एका प्रयोगात बुडून गेले होते. मित्राने विचारलं, “आज तुझं लग्न आहे हे तू विसरलास का?” पाश्चर उत्तरले, “छे, छे, अजिबात विसरलो नाहीये. पण त्यासाठी माझा प्रयोग अर्ध्यावरच सोडून येऊ की काय?”
रेबीजमुळे मेलेल्या सशाच्या पाठीच्या कण्याचा एक तुकडा कापून चौदा दिवस एका र्निजतुक केलेल्या बाटलीत ठेवला. नंतर त्यानं त्याचे बारीक कण काही निरोगी कुत्र्यांच्या मेंदूंत टोचले, तर त्या कुत्र्यांना अजिबात काही इजा झाली नाही. नंतर त्यानं दोन कुत्र्यांना चौदा दिवसांपूर्वीचा, मग तेरा दिवसांपूर्वीचा, मग बारा दिवसांपूर्वीचा, असं करत करत अगदी ‘ताजा‘ नमुना टोचला. तसंच आणखी दोन कुत्र्यांना त्यानं आधीच्या सगळ्या पायऱ्या वगळून पिसाळलेल्या कुत्र्याची फक्त एकदम ताजी लाळ टोचली. एका महिन्यानंतर ज्या दोन कुत्र्यांना पाश्चरनं दररोज वाढत गेलेल्या ताकदीचे लाळीचे डोस दिले होते ती एकदम टुणटुणीत होती, पण ज्या दोन कुत्र्यांना त्यानं एकदम शेवटी एकदाच पिसाळलेल्या कुत्र्याची लाळ टोचली होती ती दोन्ही कुत्री मेली होती! पाश्चरनं रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंवर मात करण्याचा मार्ग शोधून काढला होता! यामुळेच पूर्वी पिसाळलेलं कुत्रं चावलं की त्या माणसाला चौदा इंजेक्शनं घ्यावी लागायची. याचं कारण म्हणजे पाश्चरच्या अगदी सुरुवातीच्या पद्धतीनं पिसाळलेल्या कुत्र्याची अगदी सौम्य लाळ टोचणं, मग दुसऱ्या दिवशी त्याहून जरा जास्त विषाणू असलेली लाळ टोचायची, असं करत करत चौदा दिवस उलटायचे. पण नंतर या प्रकारात सुधारणा होऊन पिसाळलेल्या कुत्र्याच्या लाळेसारखी वेगवेगळी मिश्रणं एकत्र करून आता एक-दोन इंजेक्शन्सवरच भागतं! १८८५ सालच्या जुलै महिन्यात पाश्चरनं पिसाळलेला कुत्रा चावलेल्या एका लहान मुलावर आपल्या उपायाचा पहिला प्रयोग करून बघितला आणि तो एकदम यशस्वी ठरला! गंमत म्हणजे १८८४ साली आपल्या लग्नाचा वाढदिवस पाश्चर विसरला. तेव्हा त्याच्या बायकोनं वैतागून आपल्या मुलीला ‘मला याची गेली ३५ वर्षे सवयच झाली आहे’ अशा अर्थानं एक पत्र लिहिलं.
दूध अल्प काळानंतर नाशवंत होणारे आहे. ते दीर्घकाळ टिकवण्यासाठी पाश्चरायझेशन करण्याच्या पर्यायाचा शोध पाश्चात्त्य संशोधक लुई पाश्चर यांनी लावला. त्यामुळे दूध टिकण्याचा कालावधी वाढला. यात दूध सुमारे ८० अंश सेल्सिअसपर्यंत तापवणे व एकदम थंड करणे. झाले पाश्चराईज. हे तंत्र लुई पाश्चरने शोधुन काढल्याने त्या प्रक्रियेस “पाश्चरायझेशन” म्हटले जाते. अतिश्रमांमुळे पाश्चरला या सुमारास मेंदूत रक्तस्त्राव झाला, आणि तो मरता मरता वाचला. त्याच्या शरीराची एक बाजू पूर्णपणे अधू झाली. पण त्यानं जोमानं आपलं काम सुरूच ठेवलं.नंतर त्यानं देशभक्तीच्या एका झटक्यापायी फ्रेंच बियर जर्मन बियरपेक्षा चांगल्या दर्जाची बनवण्याच्या उद्देशानं जंग जंग पछाडलं.
सूक्ष्मजीव-शास्त्राचा पाया पाश्चरनं घातला.या मूळ कल्पनांमधूनच काही काळानं सजीवांच्या शरीरातल्या पेशी आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या विषाणूंविषयीचं संशोधन पुढे जाणार होतं. लुईच्या या सूक्ष्मजंतू सिद्धांताला अखेर विश्व मान्यता लाभली. त्यानंतर जगातील नगरांमध्ये पेयजलाची आणि सांडपाण्याचा निचरा करणारी प्रभावी यंत्रणा उभारण्यात आली. त्यामुळे पेयजल व सांडपाणी मिसळले जाण्याची शक्यता दुरावली. रुग्णालये चांगल्या त-हेने र्निजतुक करण्यात आली. यानंतर विख्यात रोगचिकित्सक व शल्यविशारद जोसेफ लिस्टर यांनी ‘र्निजतुकीकरण’ (ऑन्टिसेप्टिक) करणारे औषध शोधले. त्यामुळे संसर्गप्रमाण कमी झाले. कारण शस्त्रक्रियेच्या आरंभी ते औषध वापरण्याची दक्षता घेण्यात येऊ लागली. त्यानंतरच्या विविध रोगास कारणीभूत होणा-या विशिष्ट जंतूंविषयी संशोधने झाली. अशा तऱ्हेने संबंधित रोगांचा प्रसार नियंत्रित झाल्यामुळे माणसाची आयुमर्यादा एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी पंचवीस होती, ती आता एकविसाव्या शतकाच्या आरंभी सत्तरीकडे आली. म्हणजे सुमारे तिपटीने वाढली. याचे श्रेय हे लुई पाश्चरने सूक्ष्मजंतूबाबत केलेल्या प्राथमिक संशोधनाला जाते.
लुई पाश्चर यांचे २८ सप्टेंबर १८९५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply