पक्ष्यांचं किंवा प्राण्यांचं स्थलांतर सर्वज्ञात आहे. परंतु पक्षी किंवा प्राण्यांप्रमाणे अनेक सागरी जलचरही स्थलांतर करतात. यात लहान-मोठे मासे, कासवं यांपासून देवमाशांसारख्या सस्तन प्राण्यांचाही समावेश होतो. शार्क माशांचे काही प्रकार तर, अक्षरशः कित्येक हजार किलोमीटर प्रवास करणारे जलचर म्हणून प्रसिद्ध आहेत. या प्राण्यांचा हा प्रवास मोसमानुसार बदलणाऱ्या तापमानामुळे, अन्न मिळवण्यासाठी वा प्रजोत्पादनाच्या दृष्टीनं योग्य जागा मिळवण्यासाठी केला जातो. हे जलचर दरवर्षी असा मोठा प्रवास करून पुनः त्याच ठिकाणी येतात.
सन २००५ मध्ये असाच एक ‘ग्रेट व्हाइट शार्क’ या प्रकारचा शार्क मासा दक्षिण आफ्रिका ते ऑस्ट्रेलिया आणि तिथून पुनः दक्षिण आफ्रिका, असा सुमारे वीस हजार किलोमीटरचा प्रवास करून आल्याची नोंद केली गेली. शार्कचा हा प्रवास संशोधकांच्या दृष्टीनं लक्षवेधी ठरला होता. कारण या शार्क माशानं हा प्रवास जवळपास सरळ रेषेत केला होता. हा शार्क आपल्या प्रवासासाठी कोणता तरी संदर्भ वापरत असणार हे उघडच होतं. शार्क माशांकडे पृथ्वीचं चुंबकत्व ओळखण्याची क्षमता असते. मात्र या क्षमतेचा ते दिशा शोधण्यासाठी प्रत्यक्षात वापर करतात की नाही, याबाबतीत आतापर्यंत निश्चित संशोधन झालेलं नव्हतं. अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी या विद्यापीठाच्या ब्रायन केलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक चाचणी-यंत्रणा उभारून शार्क माशांवर प्रयोग केले आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
ब्रायन केलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रयोगासाठी ‘बॉनिटहेड शार्क’ या, शार्क माशांच्या छोट्या आकाराच्या प्रजातीचा वापर केला. फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ आढळणारे हे शार्क मासे, उन्हाळ्यात फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ मुक्काम ठोकतात आणि थंडीच्या काळात दक्षिणेकडे कूच करतात. बॉनिटहेड शार्क माशांचा हा दक्षिणेकडचा प्रवास, जाऊन-येऊन सुमारे एक हजार किलोमीटरचा असतो. ब्रायन केलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या प्रयोगात वापरलेले बॉनिटहेड शार्क हे फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळील टर्की पॉईंट शोल येथे पकडले होते. प्रयोगासाठी निवडलेल्या शार्क माशांची लांबी साठ सेंटिमीटरपेक्षाही कमी असल्यानं, मध्यम आकाराच्या टाकीत त्यांच्यावर प्रयोग करणं या संशोधकांना शक्य झालं. या माशांसाठी ब्रायन केलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे आठशे लीटर क्षमतेची टाकी तयार केली. त्यानंतर ही टाकी त्यांनी तांब्याच्या, विद्युतप्रवाह वाहून नेणाऱ्या तारांच्या वेटोळ्यांमध्ये ठेवली. टाकीत त्यांनी समुद्राचं पाणी भरलं. या टाकीत प्राणवायू खेळता ठेवून त्यात बॉनिटहेड शार्क सोडला. टाकीभोवतीच्या तांब्याच्या तारांतून विद्युतप्रवाह पाठवून चुंबकीय क्षेत्राची निर्मिती केली. या चुंबकत्वाची दिशा ही पृथ्वीच्या चुंबकत्वाच्या दिशेसमान ठेवली. विद्युतप्रवाहातील बदलाद्वारे या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बदलता येत होती.
या प्रयोगासाठी त्यांनी तीन वेगवेगळ्या तीव्रतेची चुंबकीय क्षेत्रं वापरली. त्यातील एक तीव्रता, मासे जिथे पकडले तिथल्या तीव्रतेइतकी होती. दुसरी तीव्रता या जागेपासून सुमारे सहाशे किलोमीटर दक्षिणेला असलेल्या एका जागेइतकी, तर तिसरी तीव्रता सहाशे किलोमीटर उत्तरेला असलेल्या एका जागेइतकी होती. मासे जिथे पकडले तिथल्या चुंबकीय तीव्रतेच्या तुलनेत, दक्षिणेकडची जागा ही कमी तीव्रतेची होती, तर उत्तरेकडची जागा ही अधिक तीव्रतेची होती. संशोधकांनी या तीव्रता, एकामागोमाग एक अशा, कोणताही विशिष्ट क्रम न ठेवता आलटून पालटून, बदलत्या ठेवल्या. या अनपेक्षित बदलांमुळे, या माशांच्या पोहण्याच्या मार्गात होणारे बदल त्यांनी अभ्यासले. एकूण वीस शार्क माशांवर दोन वर्षं प्रयोग करून, त्यातून निघालेले निष्कर्ष ब्रायन केलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अलीकडेच प्रसिद्ध केले आहेत.
ब्रायन केलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, हे मासे चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेतील बदलानुसार आपल्या मार्गात बदल करत असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. जेव्हा टाकीतली चुंबकीय तीव्रता ही फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळील तीव्रतेइतकी असे, तेव्हा टाकीतला मासा मुक्तपणे सर्व दिशांना वावरत असे. मात्र जेव्हा टाकीत दक्षिणेकडील ठिकाणाच्या तीव्रतेइतकी तीव्रता निर्माण केली गेली, तेव्हा हे मासे उत्तरेकडे (म्हणजे फ्लोरिडाच्या दिशेनं) जाऊ लागले. कारण परिचित असलेलं कमी तीव्रतेचं ठिकाण हे उत्तरेकडे असल्याचं त्यांना माहीत होतं. मात्र जेव्हा टाकीतली चुंबकीय तीव्रता फ्लोरिडाच्या उत्तरेकडील ठिकाणाच्या तीव्रतेइतकी असायची, तेव्हा हे मासे गोंधळलेले दिसायचे. ब्रायन केलर यांच्या मते, उत्तरेकडचं तीव्र चुंबकीय क्षेत्र हे या माशांच्या ओळखीचं नसल्यानं, त्यांना कोणत्या दिशेनं जावं हे कळत नव्हतं. या सर्व निरीक्षणांतून, माशांना चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेतील फक्त बदलच नव्हे तर, चुंबकीय क्षेत्राची दिशाही कळू शकत असल्याचं निश्चित झालं. यावरूनच ते आपल्या निवासाची जागा कुठल्या दिशेला आहे, हे ओळखू शकत होते. शार्क मासे हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर नकाशासारखा करू शकत असल्याचा हा पुरावा होता.
शार्कसारख्या माशांना चुंबकीय क्षेत्राची जाणीव असल्याचं, संशोधकांना पूर्वीच समजलं होतं. ही जाणीव त्यांच्या शरीरातील लोहयुक्त स्फटिकांद्वारे होत असते, हेही संशोधकांना कळलं होतं. परंतु या माशांना ही फक्त जाणीव असते की या जाणिवेचा दिशाज्ञानासाठी उपयोग केला जातो, हे शोधणं महत्त्वाचं असल्याचं मत संशोधक गेली पाच दशकं व्यक्त करीत होते. ब्रायन केलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनानं, शार्क मासे हे चुंबकीय क्षेत्राच्या बदलत्या तीव्रतेचा आणि दिशेचा नकाशासारखा वापर करून, आपल्या स्वतःच्या प्रवासाची दिशा नक्की करीत असल्याचं स्पष्ट झालं आहे. दिशाज्ञानासाठी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा उपयोग ज्या सजीवांकडून केला जात असल्याचं माहीत होतं, त्यात आता या शार्क माशांचीही भर पडली आहे. ब्रायन केलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रयोगानंतर, इतर अनेक सागरी जलचर प्राणी स्थलांतरासाठी पृथ्वीच्या चुंबकीय नकाशाचाच वापर करीत असल्याची, शक्यता व्यक्त केली आहे.
चित्रवाणीः https://www.youtube.com/embed/FI8p3ZR914A?rel=0
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य:
Leave a Reply