भूमध्य समुद्रात असंख्य लहान मोठी बेटे दिसत होती. अत्यंत आकर्षक दिसणारी बेटे मागे टाकून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनिजवळ पोचलो होतो. उत्तर अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र यांना जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने जोडले आहे. रॉक ऑफ जिब्राल्टर म्हणजे एक खडक नसून महाकाय डोंगरच आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच समजले. जिब्राल्टर ला लागून उत्तरेला स्पेन आणि दक्षिणेला समुद्रधुनीच्या दुसऱ्या किनाऱ्याला सुद्धा स्पेनचाच काहीसा भाग आहे. जिब्राल्टर हेसुद्धा ब्रिटिशांनीच व्यापारीदृष्ट्या वसवलेले आणि विकसित केलेलं अत्यंत महत्वाचे बंदर आहे. भूमध्य समुद्रातून काळा समुद्र, तसेच सुएझ कालव्यातून अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात जाणारी जहाजे जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडूनच जातात त्यामुळे कंपनीकडून जिब्राल्टर येथे क्रु चेंज, इंधन भरण्यासाठी, खाण्यापिण्याचे प्रोविजन तसेच स्पेयर पार्टस पोचवले जातात. शक्यतो बहुतेक जहाज जिब्राल्टर ला थांबा घेतल्याशिवाय पुढे निघत नाहीत. इंधन, प्रोविजन आणि जहाजाला लागणाऱ्या इतर आवश्यक वस्तू पुरवून उत्पन्नाचे साधन म्हणून ब्रिटिशांनी या बंदराची निर्मिती केली आणि अजूनही त्यावर वर्चस्व ठेवलं आहे. आम्ही सुद्धा इंधन भरून पुढे निघालो होतो. उत्तर अटलांटिक महासागरात प्रवेश केल्यावर जहाज हेलकवायला सुरवात झाली होती. जस जसे बे ऑफ बिस्की जवळ येत होतो तस तस समुद्र आणि वारा आपआपलं रुद्र रूप धारण करत असल्याचा अंदाज येऊ लागला होता. जहाजाचे हेलकावणे वाढलं होत. उंचच उंच लाटा उसळत होत्या जहाजाची रोलिंग सह पिचिंग सुद्धा चालू झाली होती. पिचिंग मध्ये समोरून येणाऱ्या मोठ्या लाटेवर जहाजाचा पुढला भाग वर उचलला जातो मग लाट जसजशी पुढे येईल तसतस जहाजाचा मधला आणि मागचा भाग वर होत जातो त्याचवेळेस दोन लाटांच्या मधल्या पोकळीत जहाजाचा पुढला भाग जोरात खाली आदळतो. जहाज उजवीकडून डावीकडे रोल करत असताना डोकं जड झाल्यासारखं वाटत खूप भूक लागते पण खायची इच्छा होत नाही एवढी प्रचंड झोप येत असते. रोलिंगमुळे बेडवर पडून राहणेसुद्धा कठीण होऊन जातो. जोरात रोलिंग झालं आणि बेडवर हाताने पकडलं नसेल तर बेडवरून खाली पडण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. खुर्च्या टेबल ला बांधून ठेवाव्या लागतात नाहीतर त्या पण इकडून तिकडे सरकत असतात. इतर सर्व वस्तू ड्रॉवर किंवा कपाटात लॉक करून ठेवायला लागतात. पिचिंगच्या वेळेला तर पोटात गोळाच उठतो. आपल्याला कोणीतरी खूप उंच उचलून धरलय आणि अचानक एकदम तेवढ्या उंचावरून खाली सोडून देतोय असा भास होतो. जत्रेतल्या आकाशपाळण्यात बसल्यावर पाळणा खाली येताना जसा पोटात गोळा येतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त भीती जहाज लाटेवर वरून खाली आदळतं त्या वेळेस वाटत असते.
बे ऑफ बिस्की येण्याच्या अगोदरच जेवण बनवले जाते आणि प्रत्येक जण जेवून घेतो. पुढील एक किंवा दोन दिवस जेवण बनवता तरी येईल की नाही याची शाश्वती नसते. जहाजावर धड उभ राहता येत नाही अशा वेळी जेवण शिजणारी भांडी कोण पकडून ठेवणार. जेवण बनवण्यासाठी एकच कुक आणि त्याला मदत करायला एक स्टिवर्ड एवढाच स्टाफ 30 ते 32 लोकांचं नाश्त्यासह दोन्ही जेवणाचा स्वयंपाक दोघेच जण करत असतात.
दोघे असले तरी हेलकावणाऱ्या जहाजात जेवण बनवणे म्हणजे अशक्यच. बे ऑफ बिस्कीचा खवळलेला समुद्र कधी एकदा ओलांडला जातो अस प्रत्येकाला वाटत असतं. बे ऑफ बेंगोल म्हणजेच बंगालचा उपसागर हा सुद्धा काहीसा अशांतच असतो. पण बे ऑफ बिस्की केवळ अशांत नसतोच तो तर पार खवळलेला असतो. एवढा खवळलेला असतो की आम्हा सर्वांना उपाशी ठेवून तर ठेवून झोप सुद्धा लागू देत नाही. कधी कधी तर ल्युब ऑइल किंवा इंधन इकडून तिकडे हेलकावत असल्याने जहाजाचे इंजिन, इंधनाच्या टाक्या आणि इतर माशीनेरीचे हाय किंवा लो ऑइल लेव्हल चे अलार्म वर अलार्म वाजत राहतात. अशावेळी मी इंजिन रूम मध्ये सगळ्यात खालच्या प्लॅटफॉर्म जाऊन प्रोपेलर शाफ्टच्या जवळ जाऊन बसायचो. प्रोपेलर शाफ्ट जहाजाच्या बरोबर मधोमध आणि इंजिन रुम मध्ये सगळ्यात खाली असल्याने तिथे रोलिंग आणि पिचिंगच्या त्रास कमी जाणवतो. प्रोपेलर शाफ्ट ची घरघर असह्य असल्याने तिथे पण जास्त वेळ थांबता येत नसे. रोलिंग आणि पिचिंगमुळे जहाज जोरजोरात हलायला लागलं की कुठल्या कुठे शिपिंग मध्ये आलो अस वाटायला लागतं. पावसाळ्यात रस्ते खराब झाले की त्या खड्ड्यांवर गाडी कमी हिंदकळण्यासाठी गाडीचा वेग तरी कमी करता येतो. खवळलेल्या समुद्रात जहाज थांबवा, हळू चालवा की जोरात चालवा, उसळणाऱ्या उंचच उंच लाटा जहाजाला जोरजोरात हेलकावून सोडल्याशिवाय सोडत नाहीत. तसं हवामान खराब होणार असल्याच्या सूचना अगोदर पासूनच मिळत असतात त्या अनुषंगाने तयारी केलेली असते. जहाजावर सगळ्या वस्तू व्यवस्थित लॅशिंग म्हणजेच बांधून ठेवल्या जातात. सर्व दरवाजे आणि वॉटरटाईट डोअर्स व्यवस्थित लॉक केले जातात. डेकवर तर कोणीही बाहेर पडत नाही. उंच लाटांचे पाणी डेकवर येऊन असेल नसेल त्या वस्तूला समुद्रात खेचून नेते. युरोप मध्ये तर पाण्याचे तापमान उणे 10 अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. कधी एकदा खवळलेला समुद्र शांत होतो अस सगळ्यांना होऊन जातं. एकदा का बे ऑफ बिस्की क्रॉस झालं की मग इंग्लिश खाडी जवळ यायला लागते. इंग्लिश खाडीमध्ये पण हवामानाचा लहरीपणा अनुभवायला मिळतो. या खाडीमधून जात असताना इंग्लंड आणि फ्रान्स या देशात चालणाऱ्या फेरी तसेच रोरो म्हणजे वाहनं वाहून नेणाऱ्या लहान मोठ्या बोटी इकडून तिकडे येताना आणि जाताना दिसतात. एका बाजूला इंग्लंड चा किनारा दुसऱ्या बाजूला फ्रान्सचा किनारा. या देशांना आपल्या भारतापेक्षा लहान किनारपट्टी लाभली तरीपण भारतासह अनेक देशांवर राज्य केले त्यांनी. या दोन्ही देशांचा भूभाग एकमेकांपासून फक्त काही मैलांच्या खाडीमुळे विभागला गेला. इंग्लिश खाडी पार करायला जहाजाला फक्त काही तासच लागतात. आम्ही अँटवर्प च्या बंदरात कार्गो घेऊन चाललो होतो. अँटवर्प बंदरात कार्गो डीसचार्जिंग करून आम्ही इंग्लंड मधील बंदरात लोड करण्यासाठी निघालो होतो. युरोप मधील थंडगार वारा आणि ढगाळ वातावरणात जहाज बंदराच्या जस जसे जवळ येत होते तसे तसं समुद्र किनाऱ्यालागतच्या लहान मोठ्या टेकड्या दिसायला लागल्या. गर्द हिरव्या रंगाच्या टेकड्या आणि त्यावर शांतपणे चरणारी रंगीबेरंगी गुरे ढोरे दिसत होती आजूबाजूने मासेमारी करणाऱ्या बोटी बंदराच्या दिशेने ये जा करत होत्या. सगळ्या मासेमारी बोटींचा रंग पांढराच दिसत होता नॅशनल जिओग्राफी चॅनलवर किंवा डिस्कवरी चॅनेल मध्ये दाखवतात तशाच मासेमारी बोटी पाहून गम्मत वाटत होती. कुठे खडकाळ तर कुठे हिरव्यागार टेकड्या आणि त्यांच्या मधून वाहणाऱ्या खाडीमध्ये जहाज घुसल होतं बंदराचे नाव मिल्फोर्ड हेवन होतं नावाला साजेसच अस बंदर होतं. शांत निसर्गरम्य आणि स्वर्गासारखं सुंदर.
या बंदरात माझा रिलिव्हर येणार होता. एक कॅडेट आणि थर्ड मेट यासह एक ज्युनियर इंजिनीयर माझ्यासह भारतात परतणार होतो. ज्युनियर इंजिनीयर मागच्या बंदरात जॉईन झाला होता पण 2 दिवसातच त्याला समुद्र जीवन मानवणार नाही याची कल्पना आल्याने चौथ्या दिवशी कॅप्टन ला जाऊन सांगून बसला कि मला घरी पाठवा पुढच्या बंदरात नाहीतर समुद्रात उडी मारेन. त्या बिचाऱ्याला आपापल्या परीने सगळ्यांनी समजावलं आणि 7 व्या दिवशी तो ज्युनियर इंजिनीयर जहाजवरून हसत हसत उतरला. जहाज जॉईन करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून ट्रेनिंग घेऊन आलेला ज्युनियर इंजिनीयर दोनच दिवसात समुद्र जीवनाला घाबरला होता. आम्हाला लंडन हिथ्रो विमानतळावर जाण्यासाठी 4 तास गाडीचा प्रवास करायचा होता. गाडीचा ड्रायवर ब्रिटिश होता. गाडीत सगळ्यांच्या बॅगा भरताना त्याने त्याच्या गाडीत बसल्यावर काही खाता येणार नाही असे सांगून पाणी प्यायला हरकत नसल्याचे सुद्धा स्पष्ट केले. खाण्यासाठी किंवा प्रसाधनासाठी हायवेवरच्या फूड जॉइन्ट्सवर गाडी थांबवण्यात येईल असे नम्रपणे सांगितले. चार तासांच्या प्रवासात इंग्लंडचे निसर्ग सौंदर्य तिथले रस्ते व इतर पायाभूत सुविधा पाहातांना प्रवासातील चार तास कसे संपले तेच कळलं नाही. हिथ्रो विमानतळावरून जेट एयरवेजच्या विमानाने मुंबईत परतणार होतो.
प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनीयर
कोन, भिवंडी, ठाणे
Leave a Reply