Mimicry या शब्दाचा मराठीत अर्थ अनुकृती , नक्कल , सोंग किंवा करमणूक म्हणून केलेली नक्कल असा आहे.
आपल्याकडे पूर्वीपासून अनेक Mimicry कलाकार होऊन गेले. आणि अगदी आजही अनेक कलाकार विविध कार्यक्रमांतून आपली ही कला सादर करत आहेत. पूर्वी वाद्यवृंदाच्या कार्यक्रमामध्ये मुख्य गायक वादकांना अल्प विश्रांती मिळावी आणि कार्यक्रम सुरू रहावा या हेतूने Mimicry कलाकार आपली कला सादर करत असत. पुढे स्वतंत्र Mimicry शोज होऊ लागले. हळुहळु या कलेला स्थिरपणा आला आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या नकला , Mimicry यांचे पूर्ण कार्यक्रम सादर करू लागल्या. अर्थात सध्या हे मी मराठी वाहिन्यांपुरतच बोलतोय हे स्पष्ट करतो. सुरवातीला या कार्यक्रमात छोटी नाटुकली , गंमती जंमतीतून नवीन येणारे चित्रपट , नाटकं यावरील विडंबनं सादर होऊ लागली. पाहायला ऐकायला ते छान वाटत होतं कारण ते या विडंबन सादर करताना दर्जा कुठेही सुटत नव्हता. हल्ली आपल्या स्वतःच्या कलागुणांतून स्वतःच काही निर्माण न करता मूळ रसिकमान्य कलाकृतींमध्ये काही बदल करून आपलं म्हणून लोकांच्या माथी मारण्याचं फॅड वाढलं आहे म्हणा. अगदी नव्या वर्षाचे कार्यक्रमही यामधून सुटलेले नाहीत. तर हळुहळु प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळू लागल्यावर कलाकारांचा आत्मविश्वास नको इतका वाढू लागला. या कलाकारांमध्ये काही प्रतिभाच नाही असं मी नाही म्हणणार. पुढे नवीन येणारी नाटकं , चित्रपट याचं प्रमोशन करण्यासाठी या शोजचा वापर होऊ लागला. पुरुष कलाकारांना स्त्रिवेषात सादर करत राहण्याचा अट्टाहास वाढत गेला. आणि एक चांगला कार्यक्रम भरकटायला सुरवात झाली. त्यातला उत्स्फूर्त विनोद संपला आणि अत्यंत टुकार विनोदाला कार्यक्रमात येणारी अतिथी मंडळी खो खो हसू लागली. त्यांचं हसणं पाहून तरी घरोघरी प्रेक्षक हसतील अशी काहीतरी कल्पना असावी. अर्थात रिमोट आपल्याच हातात असतो म्हणा.
माझा आक्षेप आहे , ज्यांनी आपल्या संपूर्ण अभिनयसंपन्न कारकिर्दीमध्ये प्रेक्षकांना मनसोक्त हसवलं , रडवलं आणि एक चतुरस्त्र अभिनेते म्हणून त्यांच्या हृदयात स्थान मिळवलं अशा दिग्गज अभिनेत्यांची इथे वारंवार अगदी सहजपणे नावं घेऊन त्यांची नक्कल केली जाऊ लागली. हे वारंवार पाहायला ऐकायला फारच त्रासदायक होतं. त्या कलाकारांनी कुणाचीही नक्कल न करता अभिनयाचे मापदंड उभे केले. तुम्हीही स्वतःची काही original निर्मिती करून हसवा ना प्रेक्षकांना. तुम्हाला कुणी अडवलय ?. की ते शक्यच नाही म्हणून त्या थोर कलाकारांचा आधार घ्यावा लागतोय तुम्हाला ?. बरं ! तुमची अभिनय कारकीर्द अशी काय बहरलीय ? तर ती त्या कार्यक्रमापुरती किंवा इतर फुटकळ भुमिकांपुरती. तुम्हाला काय अधिकार पोहोचतो , वारंवार त्या महान कलाकारांची सवंग पद्धतीने नक्कल करण्याचा ? बरं हळुहळु या नक्कल करण्यात इतकी सवंगता येऊ लागली की अमुक कलाकाराचा आवाज या प्राण्यासारखा आहे असं म्हणून तसं बोलून दाखवलं जाऊ लागलं. आणि यावर कुणालाच काहीही आक्षेप नव्हता तर प्रेक्षक त्याचा आनंद घेत असतात. अर्थात कित्येक प्रेक्षकांना हे नक्कीच आवडलं नसणार.
एके काळी पुल सादर करत असलेला ‘ असा मी असा मी ‘ हा एकपात्री कार्यक्रम कुणालाही न दुखवणाऱ्या विनोदामुळे आजही तितकाच आपला वाटतो. अशा अनेक कार्यक्रमाची नावं घेता येतील. त्याच त्याच प्रकारचे थिल्लर विनोद आणि कुणाला तरी लक्ष्य करणं हे किती दिवस सहन करायचं. छोट्या छोट्या skit चा एक विनोदी कार्यक्रम एका वाहिनीवरून प्रसारित होत असतो . लहान लहान कथावस्तू घेऊन त्याभोवती नाटुकलं गुंफलं जातं आणि सादर केलं जातं. मनमुराद हसवणारा हा कार्यक्रम हास्याची जत्राच उभी करतो.
आम्हाला B&W दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील अनेक कार्यक्रमांची आठवण आजही येते हेच आजच्या कार्यक्रमाचं अपयश आहे. त्या काळी अनेक अडचणींवर मात करत सुजाण निर्माते आणि अभिरूचीसंपन्न व्यासंगी दिग्दर्शकांनी आम्हाला अनेक सुखद, दर्जेदार, यादगार आणि नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी दिली. आज सगळ्या सुविधा , साधनं आणि स्पॉन्सर दिमतीला असूनही मग….. अभिरुचीच उथळ झालीय की काय असा प्रश्न मनात उभा रहातो. अर्थात याला आम्ही प्रेक्षकही तितकेच जबाबदार आहोत हे नक्कीच. हे पाहण्यापेक्षा आज अनेक नावीन्यपूर्ण विषयांवर येणारे मराठी चित्रपट आपण का पाहू नये ?
आपल्याला काय वाटतं यावर ? प्रतिक्रिया नक्की मांडा.
प्रासादिक म्हणे
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply