दि. २५ एप्रिल २०१६ रोजी मराठीसृष्टीवर लिहिलेल्या `मुंबईतील पुतळे – हलवलेले आणि हरवलेले – हर हायनेस क्वीन व्हिक्टोरीया‘ या लेखानंतर झालेल्या घडामोडींवर आधारित हा नवा लेख..
चर्चगेटच्या ‘सीटीओ’च्या मागे असलेल्या टेलिकम्युनिकेशन बिल्डींगच्या जागी, ब्रिटीश काळात ‘हर हायनेस क्विन व्हिक्टोरीया’चा ४० फुट उंच कलाकुसर केलेल्या संगमरवरी मखरात बसवलेला देखणा पुतळा होता. स्वातंत्र्योत्तर काळात हा पुतळा राणीच्या बागेतील ‘भाऊ दाजी लाड’ वस्तू संग्रहात हलवला गेला आणि तो आजही तिथेच आहे. परंतू त्या पुतळ्याच्या मखराचा काही शोध लागत नव्हता.
मध्यंतरी हे मखर विजयपत सिंघानियांच्या जुहूच्या बंगल्याच्या आवारात असल्याची माहिती मिळाली होती. मी आणि माझे मित्र श्री. मुसा शेख गेल्याच रविवारी जुहूला सिंघानीयांच्या बंगल्यात शोध घेऊन आलो, मात्र ते मखर तिथून हलवलं असल्याची माहिती मिळाली.
माझ्यापूर्वी काही लोकांनी या मखराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला होता. त्यातील काहींना त्या शोधात यशही मिळालं होतं. परंतू मला काही तो अद्याप सापडला नव्हता.
पण मनापासून शोधलं की देवही सापडतो म्हणतात, तसं काहीसं माझं झालं. पंधरा दिवसांपूर्वीच मी राणीचा पुतळा आणि ते मखर याची माहिती देणारा माझा जुना लेख फेसबुकवर पुन्हा पोस्ट केला होता. नुकताच तो मखर शोधण्यासाठी जुहुलाही जाऊन आलो.
या सर्व शोधकार्याचा ‘प्रसाद’ म्हणून मला माझे फेसबुक मित्र श्री. मंगश खोत यांचा प्रतिसाद आला आणि तो मखर नेमका कुठे आहे त्याची माहिती त्यांनी मला कळवली. नविन काही मिळालं, की लगेच तिकडे धावायचं या माझ्या उतावळ्या स्वभावानुसार मी तिकडे निघालो. पण हा आनंद एकट्याने का उपभोगायचा, म्हणून माझा मुंबईवर प्रेम करणारा मित्र चंदन विचारेला फोन केला आणि सोबत येतोस का म्हणून विचारलं. तो लगेच तयार झाला आणि आम्ही मंगेशने सांगीतलेल्या ठिकाणावर पोचलो आणि काय आनंद वर्णावा, क्विन व्हिक्टोरीयाचा तो संगमरवरी मखर साक्षात आमच्या समोर उभा होता..मखरावर मराठीत काहीतरी लिहिलेलंही आहे. आम्ही त्याचे फोटो काढले मात्र रात्र झाल्यामुळे मखराचे आणि त्यावरील त्या लिखाणाचे फोटो नीट्से आले नाहीत..बहुतेक या रविवारी सकाळा पुन्हा तिकडे जायचा विचार करतोय..
हे मखर कुठे आहे?
महालक्ष्मीच्या भुलाभाई देसाई रोजवर ब्रिच कॅन्डी हाॅस्पिटल आहे. या हाॅस्पिटलच्या समोरच्या उंचं इमारतीत ‘रेमंड्स’चं मोठं शोरुम आहे. ही इमारत म्हणजे रेमंड्सच्या सिंघानीयांचं नवं घर. या इमारतीच्या दर्शनी भागावरच हे मखर आणि त्यात एक पुतळा बसवलेला पाहायला मिळेल.अगदी हमरस्त्यावर आणि सहज दिसेल अशा ठिकाणी हे मखर आहे. इच्छुकांनी जाऊन जरूर बघून यावं.
— ©नितीन साळुंखे
9321811091
मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा लेखमाला
Leave a Reply