सकाळी एका अमृततुल्य मध्ये चहा घेत असताना शेजारच्या पोलवर एक कागद चिकटवला होता- ” हरवले आहेत.” खाली एका आजोबांचा फोटो -स्वेटर वगैरे घातलेला. सुन्न चेहेरा, अधांतरी नजर लागलेली. खाली नातेवाईकांचे काँटॅक्ट डिटेल्स ! पूर्वीच्या अशा पोस्टर्स ची आठवण उसळी मारून पृष्ठभागावर आली . लहान मुलगा अथवा एखादा तरुण घरातून पळून गेला असेल किंवा खरंच हरवला असेल तर खाली इमोशनल ब्लॅकमेलिंग असायचे आणि शोधून देणाऱ्याला इनाम इ. इ.
अशी हरवलेली मंडळी खरंच सापडतात का? असतील तर त्याचे पोस्टर का लागत नाही ?- ” सापडले “म्हणून ! शोधाशोध थांबली याचा आनंद नको का? एक वर्तुळ पूर्ण झाले.
माणसे मुळात हरवतात का? ती हरवतात म्हणजे नेमके काय होत असते? आणि हरवण्याच्या (जगाच्या दृष्टीने) कालावधीत ही मंडळी कोठे असतात आणि काय करीत असतात?
लहानपणी जळगांवला बळीराम पेठेत मामांच्या घरी गेलो असता, त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या घरमालकांच्या (दाणी मास्तरांच्या) घरातील बल्ब मी बॉल मारून फोडला होता. खूप वर्षांनी जळगांवला गेलो असता, त्यांच्या सुनेने कौतुकाने ही आठवण माझ्यासमोर सांगितली.
माझ्या विश्वातून हा प्रसंग हरवला आहे. शोधूनही मला सापडत नाहीए. पण त्या म्हणताहेत म्हणजे ते खरे असेल.
काही वर्षांपूर्वी मित्राच्या घराच्या वास्तुशांतीसाठी मी नाशिकला गेलो होतो. तेथे त्याचे सासू-सासरे मला भेटले. आपुलकीच्या गप्पा झाल्या. एकदम काहीतरी आठवून त्यांनी मला पाठीवर थाप मारून एक विधान केले – ” अरे,तू खूप पूर्वी एक सुंदर पत्र आम्हांला पाठविले होतेस. ते आम्ही अजूनही जपून ठेवले आहे.”
हे पत्र माझ्या स्मृतीतून हरवले आहे. पण ते उभयता पती-पत्नी माझ्याशी खोटं कशाला बोलतील?
असे कितीतरी प्रसंग, घटना, व्यक्ती रोजच्या रोज हरवत आहेत. एका घरातील मंडळी रोजच्या रोज एकमेकांशेजारी बसून समोरच्या भ्रमणध्वनीच्या पडद्यासमोर हरवलेल्या असतात. तसेच टीव्ही च्या पडद्यासमोरही हरवलेल्या असतात. आणि कालच्या पेपरमध्ये आलंय म्हणे- ” स्क्रीन टाइम मुळे आपल्यावर होणारे परिणाम अतिशय भयानक असतात आणि त्यातील बरेचसे आपल्याला माहीतही नसतात. ”
हरवणं चा एक अर्थ समाधी, दंग होणे असाही होतो. एका अर्थाने ते चांगलं असतं. पण आजोबांचा तो फोटो म्हणजे ते स्वतःच कोठेतरी हरवून बसलेले असा दिसत होता. आणि पोस्टरवर “ते”हरवले आहेत असा उल्लेख होता. खरंतर आजोबा त्यांच्या एकाकीपणाबरोबर हरवले असावेत.
शाळा सुटल्यावर गल्बला करीत मुलं बाहेर पडतात, घंटेचा स्वर विरायच्या आत ! आणि काही मिनिटांतच शाळेची इमारत मूक होते. माझ्याही मनातील गल्बला असाच वाढला आहे – जुन्या स्मृतींचा ! आपल्यालाही शाळेच्या इमारतीसारखं मूक होता आलं पाहिजे.
धन्यवाद आजोबा, सकाळच्या या धड्याबद्दल !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply