नवीन लेखन...

मोद भरल्या कौमुदीने मोद बहरो जगभरी….

सा-या  भूतलावर शरदाचे चांदणे  बरसवीत येते आश्विन पौर्णिमा. या पौर्णिमेला  आपण “कोजागिरी” पौणिमा असे म्हणतो.

सर्वाना आनंद वाटणा-या या रात्रीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व जाणून घेऊया….

कोजागरी, कौमुदी जागर, दीपदान जागर अशा विविध नावांनी ही रात्र ओळखली जाते.

काही ग्रंथ कोजागरीला कौमुदी  महोत्सव असे संबोधतात. हा उत्सव विशाखादत्त रचित मुद्राराक्षस नाटकात उल्लेखिलेला आहे.  पण अभ्यासकांच्या मते कौमुदी महोत्सव हा कार्तिक महिन्यात साजरा केला जातो.

वैदिक साहित्यात-

यज्ञसंस्था प्रचलित असताना आश्वयुजिकर्म हे आश्विन पौर्णिमेला संपन्न केले जात असे. यावेळी इंद्र, आश्विनीदेव आणि पशुपती या देवतांना उद्देशून यज्ञात प्रार्थना केली जात असे.आश्विन पौर्णिमेला वरी, जवस या धान्यांची अग्नीत आहुती द्यावी. त्याखेरीज हे धान्य खायला सुरुवात करू नये. शेतातील हाती आलेले धान्य प्रथम देवास अर्पण करण्यामागे कृतज्ञतेची भावना आहे.

काठक गृह्यसूत्र नावाच्या ग्रंथात ;  या रात्री घरातील पशुधनाला स्नान घालणे, सजविणे,  उत्तम अन्न देणे असा उत्सवाचा भाग असल्याचे नोंदविले आहे. विजयादशमीच्या नंतर येणारी ही रात्र असल्याने तिलाही उत्सवी रूप दिले गेले असावे असे अभ्यासक नोंदवतात.

याच दिवशी रात्री कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ अपत्याला ओवाळण्याची पद्धतीही प्रचलित आहे.

पौराणिक साहित्य व निबंध ग्रंथात-

पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि कोण जागे आहे? म्हणजेच को जागर्ती?? अशी हाक देते. जी व्यक्ती जागी असेल तिला लक्ष्मी धनधान्य समृद्धी बहाल करते अशी आख्यायिका प्रचलित आहे.  लिंग पुराण , वामन पुराण , पद्म पुराण, स्कंद पुराण, कालविवेक, वर्षक्रियाकौमुदी , व्रत कौमुदी, तिथीतत्व, कृत्यतत्व , अशा ग्रंथात कोजागरीचे धार्मिक महत्व, व्रत पालन याविषयी माहिती दिलेली आहे.

अन्य साहित्यात – युवक – युवतींच्या मनाला आल्हाद देणारा कौमुदी महोत्सव , भगवान कृष्णाची रासलीला, अशीही या रात्रीची ओळख आहे. उन्मादयंती जातक , वात्स्यायनाचे कामसूत्र,  यामध्ये या रात्रीचे उत्सवी वर्णन केलेले दिसून येते.

कृषी आधारित जीवनशैली-

कृषी संस्कृती मध्ये शारदीय नवरात्री उत्सवाचे महत्व विशेष आहे. खरीप पिकांचे स्वागत करून सुखावलेला बळीराजा कोजागरीच्या रात्री पत्नीसह आणि कुटुंबासह लक्ष्मीची पूजा करतो.

आई लक्ष्मी आली, सोन्याच्या पावलांनं, कणगी पेवाला लागुनिया, जोतं चढील डवलानं ।। या शब्दात लोकगीतात महिला समृद्धीचे वर्णन करतात.

व्रताचे स्वरूप –

आश्विनी पौर्णिमेच्या रात्री घर,रस्ते  यांची स्वछता केली जाते. दिवसभर उपवास करून रात्री घराच्या दारात अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते. लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राचे पूजन केले जाते.तांदळाच्या छोट्या राशींवर देवतांची स्थापना करणे हे शेतीतील समृद्धीचे प्रतीक मानले जाते.  ज्यांच्याकडे घरात गाई- गुरे आहेत त्यांनी वरूण देवतेची पूजा करावी असे सांगितले आहे. लक्ष्मीचे पूजन झाल्यावर देव आणि पितर यांना नारळ, पोहे आणि चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखविला जातो.

ब्राह्मणांना आमंत्रण दिले जाते आणि त्यांना दान दिले जाते. त्यांना खिरीचे भोजन दिले जाते.

या रात्री दीपदान करण्याचे विशेष पुण्य मानले जाते.

नारळाचे पाणी पिऊन त्यानंतर खेळली जाणारी द्युतक्रीडा हा या रात्रीचा विशेष उत्सवी भाग मानला जातो.

घरावर ध्वज लावणे, पताका लावणे, पुष्पमाला लावून घर सजविणे, नृत्य गायनाच्या मैफिली करीत रात्र  आनंदात घालविणे आणि मनाला उत्साह देणे असे या रात्रीचे आल्हाददायक स्वरूप आहे.

प्रांतीय वैविध्य-

कुंजरास-

आश्विनी पौर्णिमा ही वैष्णव संप्रदायाच्या दृष्टीनेही महत्वाची मानली जाते. या रात्री  श्रीकृष्णाने गोपिकांसह रासनृत्य केले होते अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यामुळे व्रज प्रांतात या रात्रीचे महत्व मनोरंजनात्मक आहे. या रात्री स्त्री आणि पुरुष एकत्रितपणे वाद्यांच्या गजरात नृत्याचा आनंद घेतात.

राजस्थानातील महिला या रात्री शुभ्र पांढरे कपडे घालून आणि चांदीचे दागिने घालून चंद्राची पूजा करतात.

भारताच्या उत्तर प्रांतात नव्याने तयार झालेल्या भाताची गायीच्या दुधातील आटीव खीर तयार करतात. तिला दूध पौवा असे म्हटले जाते. या खिरीचा नैवेद्य चंद्राला आणि लक्ष्मीला अर्पण केला जातो आणि त्यानंतर सर्वजण प्रसाद म्हणून ती खीर सेवन करतात.

माणेकथरी पौर्णिमा- पावसाळा संपत आलेल्या काळात स्वाती नक्षत्रावर पावसाचे थेंब शिंपल्यात पडून मोती तयार होतो अशी एक लालित्यपूर्ण समजूत दिसून येते. म्हणून या पौर्णिमेला माणेकथरी पौर्णिमा असेही म्हटले जाते.

आयुर्वेद शास्त्रातील महत्व-

पित्तशामक असलेले प्रवाळ पिष्टी हे औषध तयार करण्यासाठी आश्विनी पौर्णिमा हा महत्वाचा दिवस मानला जातो. शारंगधर संहिता या ग्रंथात सांगितले  आहे की आश्विनी पौर्णिमेला रात्रभर चंद्रप्रकाशात प्रवाळाचे चूर्ण गुलाब पाण्यात एकत्र करून खलावे.

वरील सर्व संदर्भ वाचल्यावर हे जाणवेल की भारतीय समाजमन उत्सवप्रिय आहे. ऋतूचक्रावर आधारित जीवनशैली आणि कृषी हा जीवनाचा मुख्य आधार. त्यामुळे हाती आलेली समृद्धी कृतज्ञता बुद्धीने देवाला अर्पण करणे हा व्रताचा भाग म्हणून आश्विन पौर्णिमेशी जोडला गेला आहे.

 

शरद ऋतूतील आल्हाददायक वातावरण हे युवक युवतीच्या मनाला उत्साह देणारे आहे त्यामुळे शीतल चांदण्यात प्रेमीजनांना उपकारक असा हा शृंगाराचा महोत्सव म्हणूनही त्याचे महत्व विशेष आहे.

जीवनातील आनंद वाढविणारा शरद ऋतू कोजागरीच्या पाठोपाठ दीपावलीचा तेजोमय उल्हास घेऊन येतो. ज्या काळात शेतीवर आधारित आयुष्य समाज अनुभवीत होता त्या काळात कष्टतून हाती आलेल्या समृद्धीची कृतार्थता अनुभविणे , तिची कृतज्ञता ईश्वराला अर्पण करणे आणि शेतीच्या पुढील हंगामात कष्ट करण्यापूर्वी विश्रांती घेत;  कुटुंबीय आणि आप्त-स्नेहीजनांच्या सह उत्सवाचा आनंद घेत, शरीर मन उत्साही करण्याची ही रात्र.

आधुनिक काळात आटीव दुधाचा आस्वाद घेत रंगलेल्या गप्पांच्या मैफिलीत कोजागरीचे हे  प्राचीन संदर्भ आठविणेही रंजक आणि उत्साहवर्धक ठरावे ही शुभेच्छा !

— आर्या आशुतोष जोशी

Avatar
About आर्या आशुतोष जोशी 21 Articles
संस्कृत विषयातील विद्यावाचस्पती पदवी. हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, इतिहास या विषयातील संशोधन आणि लेखन, व्याख्याने आणि शोधनिबंध

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..