नवीन लेखन...

⁠⁠⁠गणपतीसाठी मोदक प्रिय म्हणूनच नैवद्याला मोदक करतात का?

Modak - Why is it made for Naivedya and Prasad?

उत्तर. नाही…  यामागे फक्त गणेशाला प्रिय एवढेच त्याचे महत्त्व नाही.

भाद्रपद महिना हा वास्तविक पावसाळ्याचा जोर संपत येत शरद ऋतूतील ऊष्म्याकडे घेऊन जाणारा काळ. लवकरच अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र येईल आणि त्याच बरोबर शरदाचे कडक ऊन ज्याला सर्वसामान्य भाषेत ‘अॉक्टोबर हीट’ असे म्हणतात तो काळ सुरू होईल. किंबहुना यंदा पाऊस कमी झाल्याने ऊन्हाचा जोर वाढलेला आत्ताच जाणवत आहे. या ऊष्म्याने पित्ताचा प्रकोप होतो. त्यातच वर्षाऋतूत वातही वाढलेला असतो. पावसाळ्यात अग्निही मंद होतो. अशा मंद अग्निसाठीच लंघनरूपी वेगवेगळी व्रते सांगितली आहेत. या व्रतांच्या निमित्ताने चातुर्मासातील देवपूजनाचे फळ मिळतेच, तसेच उपवासाने पोटास आराम मिळून पचनही बिघडत नाही. व्रते नसताना मात्र हवे तसे सण साजरे करा वा जड पक्वान्ने खा असा संदेश मात्र मुळीच नाहीये. उलट या वाढलेल्या वात-पित्ताला काबूत ठेवण्यासाठीच नारळ-खोबरे-तांंदूळ-गहू-साखर-गूळ-साजूक तूप असे आहारातील नेहमीचेच घटक, लाभदायक तरीही पौष्टिक, तृप्तीकारक पदार्थांचे सेवन करावे असे सांगितले आहे. गौरीसाठी घावन-घाटले हेही तांदूळपिठी, गूळ, खोबरे यांचाच संयोग.

मोदकाचे घटक, त्यांचे उकडणे वा तळणे हे संस्कार हे सर्व देशापरत्वे बदलते. किनारपट्टीला उष्णता असते पण हवा दमट असते, तसेच नारळाचा मुबलक वापर असतो – अशावेळी आहारात दुसऱ्या स्नेहाची फार आवश्यक आहे असे नाही आणि म्हणूनच किनारपट्टीपर तळणीचे पदार्थ कमीच व उकडून करायचे पदार्थ जास्त. पीठा, मोदक, कोळकटै हे पदार्थ सागरी किनारपट्टीवरचेच.

याउलट – देशावर – रूक्षता जास्त म्हणून स्नेहाचे प्रमाण आहारात जास्त असावे लागते यासाठीच तळणीचे पदार्थ व जेवणात तेलबियांच्या वापराचे प्रमाणही जास्त. म्हणूनच तळणीचे मोदक व गौरीसाठी पोट भरायला फराळाचे पदार्थ हेही त्याचसाठी.

वर्षभर या ना त्या कारणांनी, निमित्तानी, सणा-समारंभाला वा कोणताही आनंद साजरा करायला गोड पदार्थांचे नियोजन केले जातेच. श्रीखंड, गुलाबजाम, पुरणपोळी याखेरीज पनीर पासून बनविलेले पदार्थ यांची मोठी चलती आहे. भरीसभर व लगेच उपलब्ध, सर्वांना आवडतात म्हणून केक व पेस्ट्रीज्ची नवी नवी दुकानेही उघडत आहेत व बरकतीत चालतच आहेत. या सगळ्यात आपण आपल्या परंपरा त्याजून वा सोयीस्करपणे बाजूला सारून आपलेच नुकसान करत असतो.

तेव्हा नेवैद्य ना मग तो कोणताही गोड पदार्थ असे आपण सोयीचे करून घेतले असले तरीसुद्धा इतर कोणतेही पक्वान्न असताना निदान गणपतीत तरी मोदकांची उणीव भासतेच, कितीही विकतचे मोदक आणले तरी किमान एक दिवसतरी घरी मोदकांचा घाट घातला जातोच आणि तो घालायलाच हवा.. स्वतःसाठी आणि घरातील सर्वांच्या-आमंत्रितांच्या तब्येतीसाठीही.

अशा या मोदकांनी आपले वात-पित्त आटोक्यात आले असतील, रूक्षता-कोरडेपणा, अतिरिक्त उष्णता कमी केली असेल, रसादि सात धातूंचे पोषण करून, शरीरास आवश्यक स्निग्धता, तृप्ती दिली असेल, बळ दिले असेल, पौष्टिक असूनही वजन वाढवले नसेल असा विश्वास मला आहेच. तुम्हांलाही साजूक तुपाची धार मोदकांवरून घेताना व मनापासून त्यांचा आस्वाद घेताना फक्त Calories, fats, proteins, etc. etc. चे आकडे डोळ्यापुढे न दिसता – व कोणतीही बोच वा खंत वा अपराधी न वाटता आपल्या पूर्वजांना आजच्या नित्य-नूतन संशोधनातून विचार बदलणाऱ्या Dieticians पेक्षा जास्त बुद्धि-प्रज्ञा व मानवाची-त्यांच्या येऊ घातलेल्या पिढ्यांची जास्त काळजी होती हा विश्वास वाटून त्यांचे मनापासून आभार मानावेसे वाटले तरच हे मोदकपुराण पचले असे म्हणेन मी. आत्तापर्यंतच्या पिढ्यांनी त्या प्रथा-संकेत विश्वासाने आपल्या पिढी पर्यंत पोचवले यासाठी त्या पिढ्यांचे-पूर्वजांचे आभार मानू या.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संदर्भ – वैद्य तनुजा गोखले

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..