विसाव्या शतकामधे अमेरिकन शेती व्यवसाय आणि एकंदरीतच ग्रामीण जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. विसाव्या शतकाच्या सुरवातीस अमेरिकेची एकूण लोकसंख्या होती ७६ दशलक्ष. या पैकी निम्याहून अधिक वस्ती ही ग्रामीण भागातच एकवटलेली होती. त्यावेळी शेती व्यवसाय हा प्रामुख्याने, प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या लहान लहान फार्म्सवर व्हायचा. (अमेरिकन शेतीच्या संदर्भात, ‘फार्मिंग’ ही संज्ञा किंवा संकल्पना लवचिकपणे वापरायची आहे. धान्योत्पादन आणि पशुपालन हे परस्परांशी संलग्न किंवा पूरक उद्योग असल्यामुळे बरेच फार्म्स हे संमिश्र स्वरूपाचे असतात. त्यामुळे ह्या दोन्ही क्षेत्रांशी निगडीत अशा उत्पादनाला ‘फार्मिंग’ अशा ढोबळ संज्ञेने संबोधले जाते). विसाव्या शतकाच्या सुरवातीस शेती आणि ग्रामीण भागाची अजोड अशी सांगड होती. एकंदर काम करणार्या लोकांपैकी ४०% लोक शेती व्यवसायात होते. या प्रचंड मनुष्यबळाला, शेतांवर राबणार्या सुमारे २२ दशलक्ष जनावरांची (मुख्यत्वे घोडे, खेचरं, बैल) जोड होती. बहुतेक फार्म्सवर त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार काही धान्यं, कुठे तेलबिया, कुठे फळं, भाजीपाला, जोडीला वराहपालन, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, अशा चार पांच तरी वैविध्यपूर्ण गोष्टींचे संमिश्र उत्पादन व्हायचे.
याच्या उलट विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून, शेती व्यवसाय हा दिवसेंदिवस संख्येने कमी, परंतु आकारमानाने मोठमोठ्या अशा फार्म्सवर एकवटत चालला आहे. फार्म्सचे संमिश्र उत्पादनाचे स्वरूप लोप पावत चालले आहे आणि त्यांना एका ठरावीक साच्याच्या, यांत्रिक उत्पादन करणार्या कारखान्याचे रूप येत चालले आहे. फार्म्सची उत्पादकता कैक पटींनी वाढली आहे. मनुष्य आणि पशुबळाच्या जागी यांत्रिकीकरणाने आपले हात पाय पसरले आहेत. एकविसाव्या शतकातल्या एकूण काम करणार्या लोकांपैकी आज केवळ २% लोक शेतीव्यवसायात आहेत. हे मर्यादित मनुष्यबळ सुमारे ५ दशलक्ष ट्रॅक्टर्सच्या मदतीने, पूर्वी जे काम २२ दशलक्ष घोडे, खेचरं आणि बैल करत होते, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आणि कमी वेळात करत आहेत. दिवसेंदिवस तरूण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे आणि ग्रामीण भागातून, उच्च शिक्षणासाठी, नोकरी व्यवसाया निमित्त शहराकडे जाणार्यांचा ओघ वाढतच चालला आहे. याचाच परिणाम म्हणजे, एकेकाळी मुख्यत्वे ग्रामीण स्वरूपाच्या असलेल्या अमेरिकेत आज ग्रामीण भागात जेमतेम २०% लोक उरले आहेत. एके काळी ग्रामीण भागातील बहुतेक सर्व जिल्हे (counties) हे मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायावर अवलंबून असायचे. परंतु २००० साली, एकूण ग्रामीण, निम-ग्रामीण जिल्ह्यांपैकी केवळ २०% जिल्हे मुख्यत्वे शेतीवर अवलंबून होते.
एक गोष्ट निर्विवाद आहे ती म्हणजे अमेरिका हा दानशूर देश आहे. दुसर्या महायुद्धापासून, जगाच्या कान्याकोपर्यात नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, उपासमारी सारखी संकटे जिथे जिथे उद्भवली आहेत, तिथे तिथे अमेरिकेएवढी सातत्याने सढळ हाताने मदत फारच कमी देशांनी केलेली आहे. यामागील राजकारण, अर्थकारण, व्यापारी वृत्ती, युध्दपिपासू भूमिका, वगैरे छटांचा विचार बाजूला ठेवला तर सामान्य अमेरिकन माणसाच्या दानीपणाबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही. अर्थात अमेरिकन माणसाचे खिसे जगातील इतर अनेक सामान्य माणसांच्या खिशापेक्षा गरम आहेत ही गोष्ट खरी. परंतु केवळ खिशात पैसे असून चालत नाही; सत्कारणी दान देण्यासाठी तशी वृत्ती देखील लागते आणि ती सामान्य अमेरिकन माणसात निश्चितच आहे.
दुसर्या महायुद्धाच्या पूर्वी ही मदत मुख्यत्वे सर्व सामान्य नागरिकांकडून होत असे. महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या युरोपियन देशांना मदत करण्यासाठी, राष्ट्राध्यक्ष ट्रुमन यांच्या प्रशासनाला, एखाद्या मोठ्या केंद्रवर्ती संस्थेची गरज भासू लागली. त्यावेळी गाजलेल्या ‘मार्शल प्लॅन’ अंतर्गत, अमेरिकेने युरोपला तब्बल १३ अब्ज डॉलर्सची मदत केली. पुढे याच ‘मार्शल प्लॅन’च्या धर्तीवर परंतु लहान प्रमाणात, आफ्रिका, एशिया आणि मध्य व दक्षिण अमेरिकेतील गरीब देशांना मदत पुरवण्याचा उपक्रम जारी करण्यात आला. त्यानंतर आलेल्या विविध राष्ट्राध्यक्षांच्या प्रशासनांनी देखील हा मदतीचा ओघ अव्याहत चालू राखण्याची काळजी घेतली. या मदतीमधे आर्थिक पाठबळ आणि तंत्रज्ञानाबरोबरच अन्नपदार्थांचा देखील मोठाच वाटा असायचा.
अमेरिकेत नैसर्गिक साधन संपत्तीची काही कमतरता नाही. अफाट पसरलेली सुपीक जमीन, मुबलक पाणी, पोषक हवामान, आधुनिक वैज्ञानिक संशोधनाचे भक्कम पाठबळ आणि एकंदरीत कृषी / पशुपालनाचे कित्येक दशकांपासून होत आलेले यांत्रिकीकरण, यामुळे अमेरिकेने कृषी / पशुपालनाच्या क्षेत्रांमधे जगामधे अव्वल स्थान पटकवावे यात काही नवल नाही. या अफाट कृषी उत्पादनाच्या जोरावर अमेरिका जणू काही जगाचे धान्य कोठारच बनून गेली. त्यामुळे जगाला मदत पुरवण्याच्या भव्य – दिव्य योजनांमधे, अमेरिकन शेतकर्यांनी उगवलेल्या धान्य आणि पशुजन्य अन्नपदार्थानी सिंहाचा वाटा उचलावा ही गोष्ट ओघाने आलीच. गेल्या ५०-६० वर्षांत या मूळ कल्पनेचा गाभा जरी तोच राहिला असला तरी त्यात फरक हा झाला आहे की, १९६० साली एक अमेरिकन शेतकरी जगातील सुमारे २६ लोकांना खाऊ घालत होता तर २००८ सालचा एक अमेरिकन शेतकरी जगातील सुमारे १४४ लोकांना पुरेल एवढं अन्न उत्पादन करत आहे.
Leave a Reply