जनावरांच्या फार्म्सबरोबर केलेल्या अशा व्यवहारामधे त्यांना लहान पिल्ले पुरवणं (कुक्कुटपालन आणि वराहपालन), त्यांना पशुवैद्यकीय सहाय्य तसंच संतुलित खाद्य पुरवणं आणि शेवटी त्यांचं सारं उत्पादन एकहाती विकत घेणं, हा ठरावीक साचा असतो. अशा करारांवर आधारित उत्पादनाची सुरुवात झाली १९६० च्या दशकात, जेंव्हा मोठमोठ्या पशुखाद्य बनवणार्या कंपन्यांनी कुक्कुटपालनाच्या क्षेत्रामधे या प्रकारच्या उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवली. मांस उत्पादनाच्या क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांनी हीच संकल्पना १९७० च्या दशकामधे गोमांस उत्पादन करणार्या (बीफ) जनावरांच्या क्षेत्रात आणि १९९० च्या दशकात वराहपालनाच्या क्षेत्रात आणली.
प्रचंड मोठ्या संख्येने एकत्रित केलेल्या जनावरांना पोसणारे फार्मस् (Concentrated Animal Feeding Operations – CAFO) म्हणजे शेतीच्या/पशुपालनाच्या औद्योगीकरणाची अंतिम पायरी ! ठरावीक प्रकारच्या पशु पक्षांच्या उत्पादनातील एखादा ठरावीक टप्पाच या ठिकाणी पार पाडला जातो. त्यामुळे प्रत्येक CAFO चे बांधकाम, सुविधा, विविध उपकरणे, जनावरांच्या ठरावीक जाती – प्रजाती, ठरावीक पद्धतीचे खाद्य, औषधे, कार्यपद्धती हे सारे साचेबंद होऊन जाते. हा साचेबंदपणा एवढ्या टोकाचा होऊन जातो की सारी कामे तंत्रज्ञानाच्या आणि यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने सहज सोपी होऊन जातात. शेती किंवा पशुपालन ही कला न रहाता त्याचे विज्ञान आणि गणित होऊन जाते. निसर्गाचे आविष्कार, भूमातेची काळजीपूर्वक केलेली मशागत, पावसाच्या नक्षत्रांची आतुरतेने पाहिलेली वाट, ऋतुंचा खेळ, निढळाच्या घामाने शिंपलेली जमीन आणि सरतेशेवटी सार्या कष्टांना विसरायला लावणारी तरारून आलेली सोनसळी शेतं किंवा कुरणांत हुंदडणारी वासरं, ह्या सार्या भाबड्या कवी कल्पना पुसल्या जाऊन त्याजागी केवळ रुक्ष, कोरडा व्यवहार उरतो. थोडक्यात, आजचे CAFO हे पशुपालनाचे फार्म्स न रहाता, मोठमोठ्या व्यावसायिक कंपन्यांच्या नियंत्रणाखालचे मांस उत्पादन करणारे कारखाने होत चालले आहेत.
अर्थात औद्योगीकरणाची तत्वप्रणाली इतर अनेक क्षेत्रांना लागू होत असली तरी शेती व्यवसायात तिचे तंतोतंत पालन होणे अवघड आहे. कारण शेती किंवा पशुपालन म्हणजे काही रासायनिक फॅक्टरी किंवा मोटारी बनवायचा कारखाना नव्हे. जैविक प्रक्रियांनी औद्योगिक उत्पादनाची समीकरणे पाळावीत ही अपेक्षाच बाळगणे चुकीचे आहे. त्यामुळे शेती व्यवसायाच्या औद्योगीकरणाच्या प्रक्रियेचा वेगच मंदगती आहे असे नसून, त्यातून होणारे आर्थिक फायदे कमी तर सामाजिक उलथापालथ आणि पर्यावरणाचे दुष्परिणाम जबरदस्त आहेत.
डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply