नवीन लेखन...

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग १३

Modern American Agriculture and Animal Farming - Part-13

फार्म्सची घटत जाणारी संख्या हा कल (trend) दुसर्‍या महायुद्धापासून चालू आहे. परंतु फार्म्सच्या संख्येचा विचार करताना एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, या उद्योगात नव्याने प्रवेश करणार्‍या आणि या उद्योगातून बाहेर पडणार्‍या फार्म्समुळे, हा एक सतत प्रवाही असा आलेखपट झालेला आहे. २००२ – २००७ च्या दरम्यान जवळ जवळ ३००,००० फार्म्स बंद झाले, तर २२५,००० नवे फार्म्स सुरु झाले. म्हणजे २००२ च्या तुलनेत २००७ साली, प्रत्यक्षात ७५,००० फार्म्सचीच संख्या कमी झाली आहे. अधिक बारकाईने बघितल्यास एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सर्वसाधारण अमेरिकन फार्म्सच्या तुलनेत हे नव्याने सुरू झालेले फार्म्स आकारमानाने तसेच उत्पादनाच्या दृष्टीने देखील लहान आहेत. सर्वसाधारण अमेरिकन फार्म्सचे सरासरी क्षेत्रफळ आहे ४१८ एकर्स, तर या नवीन फार्म्सचे सरासरी क्षेत्रफळ आहे केवळ २०० एकर्स. त्याचप्रमाणे सर्वसाधारण अमेरिकन फार्म्सचे सरासरी वार्षिक उत्पन्न आहे १३५,००० डॉलर्स तर या नवीन फार्म्सचे सरासरी उत्पन्न आहे फक्त ७०,००० डॉलर्स.

आणखी खोलात जाऊन बघितलं तर ही एका नवीन कलाची नांदी असावी असं वाटायला लागतं. एकीकडे मोठ्या माशाने लहान माशांना गिळंकृत करण्याप्रमाणे मोठमोठ्या फार्म्सच्या चढाओढीमधे लहान आणि मध्यम आकाराचे फार्म्स बंद होत चालले असतानाच दुसरीकडे मात्र अगदी छोट्या आणि पूर्णपणे वेगळ्या अशा फार्म्सची संख्या वाढायला लागली आहे. लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे हे नवे शेतकरी बहुदा सर्वसाधारण शेतकर्‍यापेक्षा वयाने तरूण असतात आणि बहुतांशी गोरे-तर असतात. या शेतकर्‍यांमधे मोठ्या प्रमाणात बायका असतात. मोठमोठ्या फार्म्सप्रमाणे या छोट्या फार्म्सचं उत्पादन, कुणा मोठ्या सायलोमधे साठवायला जात नाही किंवा लांबच लांब मालगाड्यांमधे भरून दूरवर वाहून नेलं जात नाही. या छोट्या फार्म्सवरची जनावरं, मोठमोठ्या औद्योगिक कत्तलखान्यात पाठवली जाऊन, शेवटी कुठल्यातरी दूरवरच्या ग्रोसरी स्टोअर्सच्या शेल्फवर जाऊन सुबक वेष्टनामधे गुंडाळलेले मांसाचे तुकडे होऊन रहात नाहीत.

यातले बरेचसे फार्म्स फक्त १०,२० किंवा ३० एकर्सचे असतात. यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते बहुदा मोठ्या शहरांच्या आसपास असतात. मोठमोठ्या औद्योगिक स्वरूपाच्या फार्म्सवर जनावरांना देण्यात येणार्‍या एँटीबायोटिक्स, हॉर्मोन्स किंवा पिकांवर मारण्यात येणार्‍या जंतुनाशक फवार्‍यांचा वापर करण्यास या फार्म्सची तयारी नसते. त्यांना आपली पिकं किंवा आपली जनावरं नैसर्गिक पद्धतीने वाढवायची असतात. रासायनिक खताऐवजी शेणखत वापरणे, compost किंवा गांडूळांचा वापर करणे, रोगराईला प्रतिकार करू शकतील अशा प्रकारच्या प्रजातींची लागवड करणे, रासायनिक जंतुनाशकांऐवजी जैविक (biological pest management) साधनांचा वापर करणे, अशा गोष्टींना या फार्मस्‌वर प्राधान्य दिले जाते. सध्या बर्‍याच आरोग्यविषयक जागृक ग्राहकांची अशा प्रकारच्या नैसर्गिक अन्नाबद्दल मागणी असते, आणि त्या मागणीची काळजी हे organic फार्मस्‌ घेतात. मोठ्या शहरांच्या जवळपास असल्यामुळे त्यांना अशा शहरांमधल्या फार्मर्स मार्केट्समधे आपला ताजा भाजीपाला फळं घेऊन जाता येतं. काही चोखंदळ ग्राहक तर सुपर मार्केटमधे जाऊन अंडी किंवा मांस खरेदी करण्या ऐवजी शहराच्या बाहेर थोडंसं ड्राईव्ह करून एखाद्या छोट्या फार्मवर जाऊन ताजी अंडी किंवा ताजं बीफ/पोर्क विकत घेणं पसंत करतात.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..