Specialization चं पुढचं पाऊल म्हणजे फार्म्स, एकाच प्रकारच्या जनावरांचे, त्यांच्या जन्मापासून ते कत्तलखान्यात जाईपर्यंत संगोपन करण्याऐवजी, त्या संपूर्ण प्रक्रियेतला केवळ एखादाच टप्पा करतात. त्यामुळे वय किंवा वजनाच्या एकेका टप्प्यानुसार, या वाढणार्या जनावरांची रवानगी वेगवेगळ्या specialized फार्मसवर केली जाते. डेअरी फार्म्सवर हा प्रकार कमी दिसतो. बहुतेक डेअरी फार्म्सवर स्वत:च्या फार्मवर पैदा झालेल्या कालवडी वाढवल्या जातात, भविष्यकालीन गायी म्हणून त्यांची काळजी घेतली जाते. बहुतेक डेअरी फार्म्सवर स्वत:पुरतं थोडंफार तरी धान्य स्वत:च्या जमिनीवर उगवलं जातं आणि फार्मवरचं दूध किंवा निरुपयोगी जनावरं विकायचं काम देखील स्वत:च केलं जातं. परंतु बीफ, वराहपालन आणि पोल्ट्रीच्या व्यवसायात मात्र, जनावरांच्या/पक्षांच्या वाढीच्या/वयाच्या टप्प्यानुसार, वेगवेगळ्या फार्म्सवर केलं जाणारं संगोपन, ही अगदी नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे एखाद्या फॅक्टरीतल्या conveyor belt वरून सरकणार्या मालाप्रमाणे, ही जनावरे एका फार्मवरून दुसर्या फार्मवर पाठवली जातात.
जस जसे फार्म्स मोठे होऊ लागतात आणि त्यांची उत्पादकता वाढू लागते, तसंतसं त्यांचा दर एकका (unit) मागचा उत्पादन खर्च कमी होऊ लागतो. त्यामुळे मोठ्या फार्म्सना अधिक मोठं होण्यासाठी उत्तेजनच मिळतं. या उलट, लहान फार्म्स या मोठ्या फार्म्सच्या तुलनेत आपला उत्पादन खर्च तेवढा कमी करू शकत नाहीत. ही आर्थिक विषमता वाढतच जाते आणि मग छोट्या फार्म्सना एक तर या उद्योगातून बाहेर पडावं लागतं किंवा एखाद्या खास वैशिष्ट्य असलेल्या मार्केट (niche market) चा शोध घ्यावा लागतो. असाच एक जाणवण्यासारखा फरक म्हणजे, जरी बहुतांशी फार्म्स कौटुंबिक मालकी हक्काचे असले तरी, वाढत जाणार्या फार्म्सच्या आकारमानामुळे आणि तरूण पिढी शेती/ पशुपालनापासून दुरावत चालल्यामुळे, फार्म्सवर काम करण्यासाठी घरातील माणसांऐवजी पैसे देऊन बाहेरून मदत घेणं वाढत चाललं आहे.
एकंदरीत पशुसंवर्धनाच्या क्षेत्राला एका मोठ्या जाळ्याचं (network) रूप येत चाललं आहे. “एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ” हे ब्रीदवाक्य इथे लागू पडल्यासारखं वाटतं. पूर्णपणे स्वावलंबी फार्मची संकल्पना मागे पडून, परस्परांना पूरक असे फार्म्स, एकमेकांच्या सहाय्याने आपापल्या वाटणीचा कार्यभाग पार पाडताना दिसतात. जनावरांसाठी धान्य उगवणारे फार्म्स, पशूखाद्य बनवणार्या कंपन्या, जनावरांची ने आण करणार्या ट्रक्सच्या कंपन्या, वेगवेगळ्या वयोगटातील जनावरांचे संगोपन करण्यात विशिष्ट नैपुण्य मिळवलेले फार्म्स, जनावरांची विक्री – लिलाव करणारी केंद्रे, कत्तलखाने, या सार्यांचे पाय एकमेकात गुंतलेले असतात. फार्म्सच्या वाढलेल्या आकारामुळे प्रत्येक घटकाची जबाबदारी आणि आर्थिक गुंतवणूक देखील खूपच मोठी असते. त्यामुळे एकंदर सारा कारभार परस्परांमधल्या स्नेहसंबंधांपेक्षा, रुक्ष आणि कोरड्या करार मदारांवर (contracts and agreements) आधारलेला असतो.
डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply