अमेरिकन शेतीउत्पादनाचा पशुसंवर्धन हा अविभाज्य घटक आहे. याची चार मुख्य अंगे म्हणजे – बीफ (गोमांस) उत्पादन, दुग्धउत्पादन, वराहपालन आणि कुक्कुटपालन.
अमेरिकन आहारातल्या प्रथिन (protein) घटकांचा विचार केला तर त्यात अव्वल नंबरावर आहे बीफ (गोमांस). अमेरिकन लोकांचे स्टेक आणि हॅंबर्गर्सचे वेड तर काही विचारायलाच नको. त्यामुळे बीफ उत्पादनासाठी विशिष्ट प्रजातीच्या गाई गुरांचं संगोपन, हा अमेरिकन शेतीमधला सर्वात मोठा घटक असावा यात काही नवल नाही. २००० सालच्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील एकूण फार्म्सपैकी तब्बल ३१% फार्म्स हे बीफ संगोपन करणारे आहेत. बीफ संगोपनाचा हा उद्योग (industry), १० लाखांहून अधिक घटक फार्म्स आणि रॅंचेसचा मिळून झालेला आहे. या बीफ फार्म्सचे वैशिष्ट्य म्हणजे, या १० लाख फार्म्सपैकी तब्बल ९७% फार्म्स हे घरगुती स्वरूपाचे आणि छोटेखानी आहेत. यापैकी बहुतेक (७९% ) फार्म्सवर, ५० किंवा त्याहून कमी जनावरे असतात. अर्थात भारतीय संदर्भात असे फार्म्स मोठे समजले जात असले, तरी अमेरिकन फार्म्सच्या तुलनेत त्यांना छोटेच म्हणायला हवे. नवरा बायको, वडील मुलगा, भाऊ भाऊ, अशा घरगुती साच्यांमधे हे फार्म्स चालवले जातात. बीफ फार्म्सची ही कौटुंबिक पार्श्वभूमी खूप जुनी आहे आणि बहुतेक फार्म्स हे पिढ्यान पिढ्या एकेका घराण्यात चालत आलेले असतात.
२००९ साली अमेरिकेमधे सुमारे ९४.५ दशलक्ष (94.5 million) बीफ गाई गुरे होती. २००८ साली ३४.४ दशलक्ष बीफ जनावरांची रवानगी कत्तलखान्यात करण्यात आली आणि त्यापासून २६.६ अब्ज पाउंड्स (26.6 billion pounds) एवढ्या गोमांसाचे उत्पादन करण्यात आले. २००८ साली अमेरिकन ग्राहकांनी बीफवर ७६ अब्ज डॉलर्स खर्च केले. त्यासाली अमेरिकन माणसांनी दरडोई ५९.९ पाउंड बीफ खाल्ले तर ५९.२ पाउंड चिकन !
१९६० साली ३.९ दशलक्ष बीफ फार्म्स १८३ दशलक्ष लोकसंख्येला बीफ पुरवठा करत होते, तर २००७ साली २.२ दशलक्ष फार्म्स सुमारे ३०० दशलक्ष लोकसंख्येला बीफ पुरवत होते. म्हणजेच या ४७ वर्षांत, बीफ फार्म्सची संख्या १.७ दशलक्षांनी घटली, परंतु याच कालावधीमधे अमेरिकन लोकसंख्या मात्र ६४% वाढली. १९६० च्या दशकामधे बीफ फार्म्सचे सरासरी आकारमान २९७ एकर्स होते, ते वाढत वाढत २००७ साली ४१८ एकर्स एवढे झाले होते. बीफ फार्म्सच्या वाढणार्या आकारमानाबरोबरच, पशुसंगोपन, पशुआहारशास्त्र यांतील वैज्ञानिक प्रगतीमुळे, बीफ जनावरांची उत्पादन क्षमता वाढून ती अधिकाधिक धष्टपुष्ट होऊ लागली आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर १९९० च्या दशकात, एका बीफ जनावरापासून सरासरी ४०० पाउंड बीफ मिळत होतं, तर २००८ साली, एका बीफ जनावरापासून ६३७ पाउंड बीफ मिळू लागलं आहे.
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply