अमेरिकन खाद्य संस्कृतीचे औद्योगीकरण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी सुरू झाले. याचा प्रारंभ झाला मांसोत्पादनाच्या उद्योगापासून (Meat Packing Industry). मांसोत्पादनाच्या साखळीतला, कत्तलखाना हा एक मोठा महत्वाचा दुवा आहे. सुरवातीला स्थानिक पातळीवर किरकोळ स्वरूपाचा व्यवसाय करणारे कत्तलखाने, मोठे होता होता आपले स्वरूपदेखील बदलू लागले. त्यामुळे कत्तलखान्यांना जसजसं संघटीत व व्यावसायिक रूप येत गेलं, तसतसं त्या साखळीतला केवळ एक दुवा बनून रहाण्यापेक्षा, संपूर्ण साखळीच आपल्या नियंत्रणाखाली आणणे हे कत्तलखान्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरू लागले. मांसोत्पादनाच्या उद्योगामधे, विक्रीसाठी परीपूर्ण वाढ झालेली जनावरे गोळा करणे, त्यांना ट्रक्समधून, रेल्वेगाड्यांमधून मोठमोठ्या औद्योगिक स्वरूपाच्या आधुनिक कत्तलखान्यांमधे आणणे, त्यांच्या कत्तलीनंतर अत्याधुनिक साधनांनी त्यांच्या मांसाचे भाग करणे, शीतगृहामधे त्या मांसाची काळजीपूर्वक साठवणी करणे, वातानुकुलित ट्रक्स आणि रेल्वे गाड्यांमधून त्या मांसाची देशभर आणि विमानातून किंवा बोटीतून परदेशात पाठवणी करणे, असा हा मोठा पसारा असतो. जसजसा मांसोत्पादनाचा उद्योग वाढू लागला तसतशा, हा संपूर्ण पसारा सांभाळणार्या सर्वसमावेशक अशा कंपन्या उदयास येऊ लागल्या. थोडक्यात म्हणजे एका टोकाला जनावरांच्या स्वरूपातला कच्चा माल उचलण्यासाठी हजारो फार्म्स आणि दुसर्या टोकाला ग्राहकांना प्रिय असे बीफ, पोर्क, बेकन, चिकनचे वेगवेगळे भाग (कट्स) सुबक, आकर्षक वेष्टनात मांडून ठेवणार्या, देशाच्या कानाकोपर्यात पोहोचलेल्या सुपर मार्केटच्या साखळ्या, यांच्यामधला लांबच लांब सेतू म्हणजे या मांसोत्पादन करणार्या कंपन्या.
जसजशा या कंपन्या आकारमानाने वाढू लागल्या तसतसा त्यांचा कारभार देखील अधिकाधिक मनमानी होऊ लागला. शेवटी परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाऊ नये म्हणून, सरकारने १९२१ साली कायदेशीररित्या हा सारा मांसोत्पादनाचा उद्योग आपल्या नियंत्रणाखाली आणला. पुढील काही दशके हा मांसोत्पादनाचा उद्योग सरकारी निर्बंधाखाली बर्याच अंशी सुनियंत्रितपणे चालला होता. परंतु १९७० च्या दशकापासून या उद्योगावरची सरकारची पकड ढिली पडू लागली. त्यामुळे १९८० सालापासून पुन्हा एकदा या कंपन्यांचा अनिर्बंध कारभार सुरू झाला. त्या सुमारास, अमेरिकेतील सर्वात मोठ्या चार मांसोत्पादन करणार्या कंपन्यांमधे मिळून ३६% गाईगुरांची कत्तल व्हायची. त्यानंतर पुढच्या २५ वर्षांत या कंपन्यांनी लहान व मध्यम आकाराच्या इतर कंपन्यांना गिळंकृत करून स्वत:चे आकारमान एवढे वाढवले की, २००५ साली अमेरिकेत कत्तल झालेल्या एकूण गाई गुरांपैकी तब्बल ८०% जनावरे या चार कंपन्यांच्या मालकीच्या कत्तलखान्यांमधे मारली गेली होती. आज केवळ मांसोत्पादनच नव्हे तर खाद्यनिर्मितीशी निगडीत अशा कुठल्याही क्षेत्रामधे काही मोजक्याच कंपन्यांचे राज्य दिसते.
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply