नवीन लेखन...

आधुनिक भास्कराचार्य विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे

आधुनिक भास्कराचार्य विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे यांचा जन्म १६ मे १८२५ रोजी अलिबाग तालुक्यातल्या नागाव येथे झाला.

१९ व्या शतकात जन्म घेऊन आपल्या कर्तबगारीनं कीर्तिमान झालेल्या प्रभावळीत प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे निस्सीम उपासक केरुनाना छत्रे यांचे नाव घेणं भाग आहे. आई-वडिलांना बालपणीच अंतरल्यानं त्यांना शिक्षणासाठी मुंबईस चुलत्याकडं यावं लागलं. त्यांच्यामुळंच केरुनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडं वस्तुनिष्ठ दृष्टीनं पाहण्याची सवय लागली. उत्तरायुष्यात केरुनानांनी गणितात संपादन केलेल्या लौकिकाची चाहूल त्यांच्या विद्यार्थी जीवनातच दिसू लागली होती. विशेषत: गणित, खगोल आणि पदार्थविज्ञानासारख्या कठीण शास्त्रात त्यांना पुढं जी गती प्राप्त झाली, त्याचे मूळ त्यांना एल्फिन्स्टन इन्स्टिटय़ूटमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर व प्रो. आर्लिबार या व्यासंगी गुरूंकडून मिळालेल्या मूलभूत ज्ञानात सापडते. त्याच्या जोरावर केरुनानांनी प्रगल्भ ग्रंथांचे परिशीलन करून या विषयांवर घट्ट पकड बसण्याएवढे त्यातले प्रगत ज्ञान प्राप्त केले. याच्या जोडीला त्यांची असाधारण बुद्धिमत्ता लक्षात घेतली की, पुढे त्यांनी दाखवलेले अध्यापन कौशल्य आणि सरकारदरबारी त्यांना मिळालेल्या मानाच्या जागा यांचे आश्चर्य वाटत नाही.

मुंबईस कुलाबा दांडीवर अंतरिक्ष चमत्कार व लोहचुंबक यांचे अनुभव घेण्यासाठी १८४० मध्ये प्रो. आर्लिबार यांनी एक वेधशाळा काढली. तिथे केरुनानांची असिस्टंटच्या जागी नेमणूक करण्यात आली. अवघ्या १५ व्या वर्षी द.म. ५० रु. पगारावर मिळालेल्या या नोकरीत नानांनी पुढली १० वर्ष जागरुकपणे हवामानशास्त्राचे प्रशिक्षणच घेतलं, असं म्हणता येईल. पुढील आयुष्यात कोणतंही तत्त्व अथवा संकल्पना सिद्ध होऊन पडताळा आल्याशिवाय ते स्वीकारीत नसत, याचं मूळ या नोकरीत आढळतं.. १८५१ पासून मात्र पुणे कॉलेजचे नॉर्मल स्कूल, पुढे ट्रेनिंग कॉलेज आणि अहमदनगरच्या इंग्रजी शाळेचे हेडमास्तर अशा सरकारी संस्थांतून त्यांच्या बदल्या झाल्या. या प्रत्येक ठिकाणी गणित, सृष्टिशास्त्र व पदार्थविज्ञान हेच विषय ते जरुरीप्रमाणे इंग्रजी व मराठीत सराईतपणे शिकवीत असत. दरम्यान, त्यांनी इंजिनीअरिंग कॉलेजातसुद्धा सृष्टिशास्त्रावर व्याख्याने दिली. मात्र १८६५ पासून सेवानिवृत्तीपर्यंत केरुनाना पुण्याच्या डेक्कन कॉलेजात स्थिरपणे होते. प्रोफेसर व शेवटी हंगामी प्राचार्य म्हणून जागोजागी जबाबदारीची पदे सांभाळूनसुद्धा आपल्या अध्यापनात कधी त्यांनी हयगय केली नाही की खंड पडू दिला नाही. मुलांना समजेल अशा सोप्या रीतीने शिकविण्याची त्यांची हातोटी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी वाखाणलेली आहे. गणिताशिवाय विद्यार्थ्यांना इतर शास्त्रांचे थोडेबहुत ज्ञान देण्यावर त्यांचा कटाक्ष असे. विद्यार्थ्यांने केव्हाही- कुठेही शंका विचारली तरी ते हसत-खेळत हरप्रयत्नाने तिची उकल करीत असत.

चिपळूणकर,आगरकर या केरुनानांच्या नामवंत शिष्यांच्या चरित्रात व ते दिवंगत झाल्यावर खुद्द आगरकरांनी लिहिलेल्या मृत्युलेखात त्यांचे विद्याव्यासंग, अध्यापन कौशल्य, स्वभावातील सौजन्य तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आसरा देणे, प्रसंगी फी-पुस्तकांची त्यांची नड भागवणे, या गुणांचे प्रामुख्याने उल्लेखआलेले आहेत. त्यांनी केलेल्या आर्थिक मदतींचे ठळक उदाहरण म्हणजे, पहिल्या वर्षांच्या परीक्षेची फी भरायला आगरकरांजवळ पैसे नव्हते म्हणून एक नाटक लिहून ते, ती उभी करणार असल्याचं कळल्यावर केरुनानांनी नाटकाचे कागद काढून घेऊन त्यांची फी भरून टाकली.

मेजर कँडीच्या मराठीतून शाळेय पुस्तकं तयार करण्याच्या उपक्रमात केरुनानांनी सुबोध भाषेत लिहिलेली पुस्तकं लोकप्रिय झाली. अंकगणितात मूलभूत क्रियांबरोबर कर्जव्यवहार, रोखे, सुतार व गवंडी यांच्या कामाची आकारणी इत्यादी व्यावहारिक उदाहरणे घातली आहेत. तर पदार्थविज्ञानात आजूबाजूच्या सृष्टीत घडणारे व्यापार, निसर्ग चमत्कार व पदार्थाचे गुणधर्म यांच्या परिचयाबरोबर प्रयोगासाठी लागणाऱ्या वस्तू व त्यांच्या किमती पुस्तकाच्या परिशिष्टात दिल्या आहेत. कधी कधी या पुस्तकात त्यांनी संवादाचे माध्यमही वापरले आहे. शास्त्रीय ज्ञान स्वभाषेत व्यक्त करण्यासाठी मुंबईत स्थापन झालेल्या, ‘ज्ञान प्रसारक सभे’च्या व्यासपीठावरून केरोपंतांनी ‘हवा’, भरतीओहोटी, कालज्ञान, सूर्यावरील डाग आणि पर्जन्यवृष्टी यांचा संबंध असे विविध विषयांवर १७ निबंध वाचले. त्यापैकी भरती-ओहोटीच्या निबंधात, भरती अंतराच्या घनाच्या प्रमाणात कमी होते असे कलनाच्या मदतीने त्यांनी दाखवलं आहे. केरुनानांनी लक्ष घातलेला आणखी एक विषय म्हणजे पंचांग शुद्धीकरणाचा. आपल्या सूक्ष्म अभ्यासाने त्यांच्या असं लक्षात आलं की, परंपरागत पंचांगात केलेलं अशुद्ध गणित व घेतलेली ग्रहस्थितींची स्थूलमाने या चुकांमुळं ऋतुकाल तसंच पंचांगात दाखवलेल्या ग्रहस्थितीचा प्रत्यक्षातल्या ग्रहस्थितीशी मेळ बसत नाही वेधशाळेतील नोकरीमुळे ग्रहांचे वेध घेण्याची कला त्यांना अवगत होती. तेव्हा ही विसंगती दूर करण्यासाठी त्यांनी पंचांग सुधारण्याचे जे प्रयत्न केले त्याच्या तपशिलात न जाता एवढं म्हणणं पुरेसं ठरेल की, केरुनानांनी या कामी बरेच दिवस आपला बहुमोल वेळ खर्च केला. पण त्यांच्या हयातीत हा उद्योग पूर्णत्वास गेला नाही. मात्र लो. टिळकांसारख्या त्यांच्या नामवंत शिष्यानं राजकारणाच्या धकाधकीतही गुरुऋण जाणून व स्वत:स त्यात असलेला रस म्हणूनही ही चळवळ पुढं नेली. केरुनानांच्या पुरोगामी विचारसरणीचे द्योतक म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेस त्यांचा पाठिंबा होता. शिवाय ते मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापक मंडळावर होते, श्रीमती रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेने भरणाऱ्या स्त्रियांच्या सभांना हजर राहून त्यांचे शिक्षण करत. स्त्रियांना जड विषयांऐवजी गृहजीवनोपयोगी शिक्षण देण्याच्या मताचे ते होते. मात्र गहन विषयांच्या व्यासंगात गढलेल्या केरुनानांना शास्त्रीय संगीत, संगीत नाटके व स्वत: पियानो वाजवण्याची आवड होती. शिवाय किर्लोस्कर नाटक मंडळीत त्यांचा राबता होता. फार काय नाटकांच्या तालमींना हजर राहून ते मोरोबा वाघोलीकर आणि बाळकोबा नाटेकर या गायक नटांना गाण्याच्या अतिरेकानं नाटकाचा रसभंग होतो, असा सल्ला देत असत. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊन अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले ‘सौभद्र’ हे नाटक त्यांना अर्पण केलेलं आहे. केरुनाना छत्रे यांच्याविषयी लिहिताना ‘टाइम्स’नं म्हटलं होतं, ‘‘प्रो. छत्रे यांना युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळालं असतं तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते.’’

केरुनाना छत्रे यांचे निधन १९ मार्च १८८४ रोजी झाले. केरुनाना छत्रे यांना आपल्या समूहाकडुन आदरांजली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..