लाल ओढणी डोक्यावर ओढते,
लोलक कानांतले तरी डोकावू देते
हलकासा लायनर,
लिपस्टीक ओठांवर,
शेड, त्याच्या आवडीची लावते.
केसांच्याही चार बटा, सवयीने
कपाळाच्या बाजूने क्लिप करते.
थोडासा परफ्यूम तिथेही लावते..
थोडासा परफ्यूम तिथेही लावते,
बाकी कपड्यांवर शिंपडताना..
तो धुंद धुंद झाला पाहीजे..
मागाहून आठवणींत रमताना..
तीन-चार गिरक्या घेते मन
आरशात निरखून बघते जेंव्हा,
बावरी राधा शरमून जाते मग;
कान्हा प्रतिबिंबातून हसतो तेंव्हा!
चित्तचोर सखा तो आला आला
म्हणून सावरू लागते जशी,
हृदयाची धडधड सांगू लागते
“आंतच वाकून पाहा ना सखी!
जीवा-शिवाचे ऐक्य गं अपुले
तू नको शोधू मज बाहेरी
शृंगार तुझ्यावर मीच चढवितो
पाहातो तुझ्याच डोळ्यांतुनी.
सखे, राधे, तुला नित्य गं,
पाहातो मी तुझ्याच डोळ्यांनी.”
— प्रज्ञा वझे घारपुरे
Leave a Reply