नवीन लेखन...

सनी देओलचा ‘मोहल्ला अस्सी’

मोहल्ला अस्सी – ” विश्वेश्वरा ” तुझ्यावरील श्रद्धेचे बुरुज ढासळताहेत !

१९८८-१९९८ या काळातील वाराणशी आणि अस्सी घाटवासीयांचे जीवन दाखविणारा हा चित्रपट आपोआप हाती लागला. राम जन्म भूमी, तत्कालीन राजकारण ढवळून टाकणारे सर्वपक्षीय नेते यांचे उल्लेख, घाटावरील संसद टपरी आणि त्यांत चालणारे हमरी-तुमरीवरचे वाद ! सगळं जुनं जिवंत करणारं.

सोबर पांडेच्या रूपातील “ढाइ किलोवाला ” सनी देओल आणि त्याच्या पुढे (सर्व बाबतीत) दोन पावले असणारी साक्षी तन्वर या जोडीने क्षणोक्षणी पडदा जिवंत ठेवलाय. सनी आपल्या प्रतिमेच्या अगदी ३६० अंशातून वेगळा-सप्पक, किंचित बुळा पण धर्मनिष्ठेमुळे आतून कणखर ! ” मंदिर वही बनायेंगे ” च्या कारसेवेत पोलिसांची गोळी पायावर झेलणारा ! साक्षी ठाम आणि ” रोज रामचरित मानस मी ऐहिक काही हवं आहे म्हणून वाचत नाही तर त्यातून जीवनसंगराशी झुंझण्याचं बळ मिळावं म्हणून रामाला प्रार्थना करीत असते. चला , उठा आणि जीवनाशी दोन हात करू या ” असं म्हणत मोडू पाहणाऱ्या नवऱ्याला उभं करण्याचं काम करते. पाश्चिमात्त्यांच्या वावटळीमध्ये हात धुवून घेणारे रवी किशन सारखे असंख्य लोक सनीच्या श्रद्धांची मूळं हलवीत अस्सी घाटाच्या अर्थी उचलायला निघालेले ! तिथपर्यंत जिवाच्या निकराने सनी श्रद्धेचा किल्ला लढवत असतो आणि त्याच्या परीने होणारे हल्ले परतवीत असतो.

पण एका क्षणी दैनंदिन जीवनाच्या गरजांनी तो ढेपाळतो. पत्नी, आणि मुलांनी किती दिवस “किमान ” गरजांवर आयुष्य काढत राहायचं असा त्याला प्रश्न पडतो. घाटावरील व्यवसाय डबघाईला, संस्कृत शिकवणीकडे मुलांची पाठ, हातात अर्थार्जनाची कामे नाहीत म्हणून तो गांजतो आणि प्रवाहपतित होतो. एका पाश्चात्य स्त्रीला पेइंग गेस्ट ( त्याद्वारे आकर्षक मासिक उत्पन्नाचे साधन) म्हणून घरी आणण्याचा प्रस्ताव स्वीकारतो. इतरवेळी सतत पर्यायी उत्पन्नाच्या स्रोतांबद्दल त्याच्या मागे भूण भूण लावणारी पत्नी (आणि ते निमूटपणे सनीगिरी विसरणारे देओल) आता मुळापासून हादरते. घरात आणि आयुष्यात होणाऱ्या बदलांच्या चाहुलींनी भयभीत होते. भावी विध्वंसक घंटा तिच्या कानी वाजू लागतात.

त्यासाठी घरातील पूजेची शंकराची पिंड ( वाराणसीच्या घराघरांचे रक्षण करणारी देवता) हलवावी लागते आणि त्याचवेळी नेमकी ती भंगते. या अपशकुनाने दोघांचे सश्रद्ध बुरुज ढासळतात. ओल्या डोळ्यांनी ते पिंडीचे शांत गंगेत विसर्जन करतात. दोघांनाही अन्न पाणी गोड लागत नाही.

” माझ्या किरकोळ गरजा जीवनातील श्रद्धास्थानांपेक्षा आणि नीती मूल्यांपेक्षा मोठ्या झाल्यात का गं ? किती तडजोड करायची मी ? ” असं सनी पत्नीला विचारतो, तेव्हा आपलेही डोळे ओले होतात. सगळीकडे तत्वहीन तडजोडी करणाऱ्या जमाती (विशेषतः राजकारणी ) प्रत्यही आपण बघतोय पण पांडेजी तरी या मंझधार मध्ये मुळांनिशी टिकून राहावेत असं मात्र आपल्याला आतून वाटत राहतं. इकडे श्रद्धाळू पत्नी घाटावरील शंकरवेश धारी माणसाच्याही पाया पडते. गल्लीतील सगळी मंडळी मोठ्या मिरवणुकीने आपापल्या घरातील शिवाच्या पिंडी घाटावर आणतात आणि मनाविरुद्धच्या उच्छादाला, तडजोडींना रान (की घर) मोकळे सोडतात. आता तिथे अभक्ष्य भक्षण आणि पाश्चात्त्यांच्या “लीला ” सुरु व्हायला जणू परवाना मिळतो.

घाटावरील एक सांगकाम्या काही दिवसांनी “बाबा ” बनून परततो आणि सगळ्यांना मिरवणुकीने “ग्यान ” वाटत फिरत असतो. काशी क्षेत्राचा चहू बाजूने चाललेला हा ऱ्हास चित्रपटातील सुज्ञांना जसा खटकत असतो तसाच आपल्यालाही !

मध्येच “सो कॉल्ड ” धर्मसंसद राम विरुद्ध महादेव असा निवाडा करताना दिसते. त्यांतील चर्चेत अयोध्या डोकावते, जाती पाती चर्चिल्या जातात. तसेच टपरीवरल्या संसदेत तावातावाने चालणाऱ्या वादांमध्ये एक स्थानिक मुस्लिम कारागीर येऊन आपली बाजू मांडतो आणि ” मीही तुमच्यापैकीच एक आहे ” अशी शांतवणारी ग्वाही देऊन जातो.

नवी शंकराची पिंड घरी घेऊन आलेला सनी आपल्या पत्नीच्या डोळ्यांमध्ये आनंदाची निरांजने पेटवतो. नव्या जुन्यांची जुळणी होते. आपल्याही डोळ्यांना शांत वाटते. ” धरम “च्या ( पंकज कपूरचा) तोडीचा हा चित्रपट ! दोन्ही वाराणशीतील – एक धर्म चाचपतो, दुसरा श्रद्धा बळकट करतो.

कल्याणी ताई आमच्या एका व्याख्यानात म्हणाल्या होत्या- ” देव आपली परीक्षा पाहात असतो. ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत तो मदतीला येत नाही, पण (भक्तांचे) १२ ही वाजू देत नाही.”

अस्सी घाटावर शांतपणे दिवे सोडणाऱ्या सनी -साक्षी बरोबर आम्हां पती-पत्नीलाही त्यावेळी कल्याणी ताईंच्या वाक्यामागे साक्षात काशी विश्वेश्वर उभा असलेला जाणवला.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..