नवीन लेखन...

जेष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर

जेष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० गोव्यातील माशेल येथे झाला. मोहनदास सुखटणकर यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील हे त्या काळातील प्रख्यात वैद्य. मोहनदास यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण माशेल आणि म्हापसा येथे झाले. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले.

त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’. अभिनय येतो म्हणून नाही, तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून, आरोंदेकर मास्तरांनी त्या नाटुकलीत काम करायची त्यांना शिक्षा केली होती. त्या नाटुकल्याच्या निमित्ताने मोहनदास सुखटणकरांच्या गालाला जो पहिल्यांदा रंग लागला तो कायमचा. नाटुकलीत खोडकर बंडूची प्रमुख भूमिका करून ज्या वेळी त्यांनी बक्षीस पटकावले, त्या वेळी प्रेक्षकांनी त्यांच्या धिटाईचे कौतुक केले. या नाटुकलीमुळेच सुखटणकरांना नाटकाची गोडी लागली. त्या निमित्ताने आपल्याला मुळातच अभिनयाची आवड होती याची जाणीवही त्यांना झाली.पुढे गोव्यात ‘अँग्लो-पोर्तुगीज इन्स्टिटय़ूट’ या हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या वार्षिक संमेलनातून तीन ते चार वर्ष स्व-लिखित कोकणी प्रहसनांतून मोहनदासांनी विनोदी भूमिका साकारल्या व पारितोषिकेही मिळवली.

तेव्हा अभिनयात करिअर करायचे आहे, असे काही त्यांच्या मनात नव्हते. पण छंद म्हणूनच सुखटणकर सारे करीत होते. त्यांच्या गांधीवादी विचारांच्या मामांचे एक सांगणे असायचे, आयुष्यात छंद जोपासावेत, पण मुख्य कामाकडे दुर्लक्ष करून नाही. मामांचे विचार त्यांच्यावर बिंबले ते कायमचे. त्यामुळे अभिनयाचा छंद जोपासताना सुखटणकरांनी शाळेच्या अभ्यासाची कधीही हेळसांड केली नाही. गावी मॅट्रिकच्या परीक्षेचे केंद्र नसल्याने १९५० मध्ये ते परीक्षेसाठी मुंबईला आले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी नोकरीची शोधाशोध सुरू केली. ‘बर्मा शेल’ मध्ये लेखी परीक्षा व मुलाखतीत यशस्वी झाले, पण वैद्यकीय चाचणीत कमी वजन भरल्याने त्यांना नोकरी मिळाली नाही. बॅलार्डपिअर येथून चर्चगेटला चालत निघाले असताना मुंबईत राहून काय करायचे, पुन्हा गोव्याला जाऊ या असा विचार त्यांच्या मनात घोळायला लागला. फ्लोरा फाउंटनजवळ ते आले असता एक गाडी थांबली.

गाडीत ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे सहसंपादक डी. के. रांगणेकर होते. रांगणेकर कुटुंब मूळचे गोव्याचे असल्याने ते सुखटणकर कुटुंबीयांना ओळखत होते. विचारपूस झाल्यानंतर रांगणेकर यांनी त्यांना गाडीत बसायला सांगितले व त्यांना चष्म्याच्या काचा व फ्रेम बनविणाऱ्या ‘माँटेक्स कॉर्पोरेशन’ कंपनीच्या मालकांकडे घेऊन गेले. ‘याला नोकरी द्या’ अशी विनंती मालकाला केली. येथे ‘टंकलेखक’ म्हणून सुमारे सहा महिने त्यांनी नोकरी केली. १ एप्रिल १९५१ मध्ये ‘ओरिएन्टल इन्शुरन्स’ मध्ये ते ‘लिपिक’ म्हणून लागले आणि ३० नोव्हेंबर १९९० मध्ये महामंडळाच्या सेवेतून ‘प्रसिद्धी अधिकारी’ म्हणून निवृत्त झाले. नोकरी करत असताना ते जयहिंद महाविद्यालयातून ‘अर्थशास्त्र’ विषय घेऊन ‘बी.ए.’ झाले.

महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी डॉ. चारुशीला गुप्ते यांनी जयहिंद मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करून सुखटणकरांना सचिव बनवले. या वाङ्मय मंडळांतर्गत विविध कार्यक्रम झाले.. महाविद्यालयाच्या वसतिगृहासाठी ‘लग्नाची बेडी’ हे नाटक करून मंडळाने निधी जमा केला. त्यार नाटकात मोहनदास यांनी ‘गोकर्ण’ची भूमिका साकारली होती. आत्माराम भेंडे, आशा भेंडे, बबन प्रभू ही व्यावसायिक रंगभूमीवर काम करणारी माणसेही त्यात होती.

त्यानंतर सुखटणकर विविध एकांकिका स्पर्धांमधून भाग घेऊ लागले. त्यांनी एकांकिकांतून फक्त विनोदी भूमिकाच केल्या नाहीत, तर गंभीरही केल्या. ‘वहिनी’ या एकांकिकेत त्यांनी ‘वल्लभ’ची गंभीर भूमिका रमाकांत देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली.

‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या स्पध्रेत चारुशीला गुप्ते यांच्या ‘आम्ही सारेच वेडे’चा प्रयोग झाला. त्यात सुखटणकरांनी एका प्रौढाची विनोदी भूमिका वठवून उत्कृष्ट अभिनयासाठी असलेले पारितोषिक मिळवले. भारतीय विद्याभवनात ‘आंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा’ व्हायच्या. तिथे सुखटणकरांनी ‘भाऊबंदकी’त काम केले आणि. गंगाधर गाडगीळांच्या ‘वेडयांचा चौकोना’तही केले.. या दोन्ही नाटकांसाठी त्यांना बक्षीस मिळाले.१९५८ साली बी. ए. झाल्यावर मोहनदास सुखटणकर मुंबईतच ‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’मध्ये शिकू लागले.आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत या कॉलेजने सादर केलेल्या ‘बळी’ आणि ‘लाल गुलाबाची भेट’ या एकांकिकांसाठी त्यांना अभिनयाची प्रशस्तीपत्रके मिळाली. १९५९ साली महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत ‘इंडियन नॅशनल थिएटर’ने ‘अशीच एक रात्र येते’ हे प्रा. प्रभाकर ताम्हाणे यांचे नाटक सादर केले.

त्यात भय्यासाहेब वकील ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका मोहनदास सुखटणकरांनी वठवली. या नाटकात त्यांच्याबरोबर प्रसिद्ध लेखिका विजया पाटील यांनी काम केले होते, तर भय्यासाहेब वकिलाच्या मुलीची भूमिका मीनल मडकईकर यांनी केली होती. या नाटकाच्या प्रयोगाला ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’चे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी सुखटणकरांनाला गाठून ‘तू गोव्याचा. आमच्या संस्थेत तू असलंच पाहिजेस,’ वगैरे गोष्टी सुनावल्या, आणि त्यांना ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’मध्ये घेतले.

मोहनदास सुखटणकर यांच्या आयुष्यात आणि नाटय़ प्रवासात ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ‘कार्यकर्ता’ भूमिकेत वावरले. संस्थेच्या बहुतेक नाटकांमधून मोहनदास सुखटणकर यांनी कामं केलीत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात स्त्रीपात्र सोडून त्यांनी बहुतेक भूमिका साकारल्या. मोहनदास सुखटणकर यांनी चाळीस नाटकांमधून कामं केली आहेत. मत्स्यगंधा (चंडोल) , लेकुरे उदंड झाली (दासोपंत ), अखेरचा सवाल (हरिभाऊ), दुर्गी (मोरोबा नाडकर्णी), स्पर्श (नाटेकर), आभाळाचे रंग (आबा) ही काही त्यांची गाजलेली नाटकं.

नाटकांप्रमाणेच त्यांनी ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ आदी मराठी चित्रपटांतही काम केले आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रांवरील अनेक श्रुतिका, नभोनाटय़ यातही ते सहभागी झाले. मुंबई दूरदर्शन केंद्रावरील विविध नाटके, ‘गजरा’ या कार्यक्रमात ते होते. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या त्यांच्या निवडक मराठी मालिका तर ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदूी मालिका. पण दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकेत ते फारसे रमले नाहीत. नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचा निकटचा सहवास त्यांना लाभला. शिरवाडकर यांचे मोठे ऋण आपल्यावर असल्याचे ते मानतात.

शशी मेहता यांच्यासह सुखटणकर यांनी शिरवाडकर यांच्या नाटकातील स्वगते, कविता यांचा समावेश असलेला ‘शब्दकळा कुसमाग्रजांच्या’ हा कार्यक्रम सादर केला. कुसुमाग्रज यांच्या सूचनेवरूनच ‘गोवा हिंदू’ने गोव्यात १९८१ ‘स्नेहमंदिर’ वृद्धाश्रम उभारला. रामकृष्ण नायक यांच्याबरोबर सुखटणकर यांचेही या कामात योगदान आहे. साहित्य, सांस्कृतिक, नाटय़ क्षेत्रातील दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. पु. ल. देशपांडे, पं. भीमसेन जोशी, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शंकर वैद्य, सुधीर मोघे, वसंत कानेटकर, भास्कर चंदावरकर, जयवंत दळवी, व. पु. काळे आदी मंडळी या ना त्या निमित्ताने अनेकदा त्यांच्या घरी आली आहेत.

मोहनदास सुखटणकर यांना राजहंस प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘राजहंस पुरस्कार’ , नाट्यक्षेत्राची ५०हून अधिक वर्षे सेवा केल्याबद्दल मुंबईच्या ’आम्ही गोवेंकर’ या प्रतिष्ठित संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत.

संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..