ग्रीष्माच्या काहिलीने
आसमंत तप्त झाला
अति उष्णतेने धारित्रीस
कासावीस करून गेला ।। 1 ।।
भेगाळलेल्या जमिनी आणि
बंद पडलेली मोट
नाही आला पाऊस
तर कसं भरेल पोट? ।। 2 ।।
प्रत्येक जण प्रतीक्षेत
कधी येईल पाऊस
डोळ्यांतून पाणी येईपर्यंत
नको वाट बघायला लावूस ।। 3 ।।
पाण्याविना तडफडत होते
पशू, पक्षी, मानव
मग तो प्रासाद असो, इमारत असो,
शिवार असो वा अंगण ।। 4 ।।
गोठ्यात, जंगलात, चारा छावणीत
हंबरत होती गुरं ढोरं
निढळावर हात ठेवून बळीराजा
पावसाची करत होता आर्जवं ।। 5 ।।
इंद्राला रिझवण्यासाठी मोर
नाचत होते विसरून सारे भान
कोकीळ, पावश्या हाकारत होते
मेघांना, गाऊन सुंदर गान ।। 6 ।।
इंद्रदेवापर्यंत पोहोचल्या
लाखो मनांच्या आर्त हाका
वरुण राजाला धाडलं त्यानं
घेऊन ढगांच्या खूप साऱ्या लड्या।। 7 ।।
वाऱ्याला सोबत घेवून ढगांचे पुंजके
बागडू लागले आभाळभर
कुठं दाट कुठं विरळ
सैरावैरा धावाधाव माळरानावर ।। 8 ।।
विद्युल्लता पण सामील झाली
खेळायला पाठ शिवणीचा डाव
मग त्यांच्याही आनंदाला
राहिला नाही ठाव ।। 9 ।।
ढगुल्यांचा आणि विजुडीचा
खेळ आला रंगात
डफ-मृदंगाची जुगलबंदी
जमली जणू नभांगणात ।। 10 ।।
तहानलेली धरित्री आणि
तिची सारी लेकरं
पाहु लागली आभाळाकडे
विस्फारून त्यांची नेत्रं ।। 11 ।।
ढग कुजबुजले एकमेकांशी
हिरवे डोंगर अन् झाडे
दिसतील आपल्याला जिथं जिथं
बरसुया आपण फक्त तिथं तिथं ।। 12 ।।
बाकीच्या ओसाड प्रदेशाचं काय?
तिथंही चालू आहे आत्महत्यांचे सत्र
पाण्याविना
ते पण झालेत गलितगात्र ।। 13 ।।
चूक तर माणसांचीच आहे
वागावे लागेल सक्त
झाडे तोडून त्यांनीच तर केले
धरणीला या उजाड आणि रिक्त ।। 14 ।।
आता पावसाची मागणी करण्याचा
त्यांना राहिला नाही हक्क
त्यांच्याच पापाची शिक्षा मिळणार त्यांना
त्यासाठीच आहेत ते पात्र ।। 15 ।।
ढग झुकले थोडे खाली
झाले थोडे दक्ष
झाडांसाठी मानवांनी खोदलेल्या
खड्डयांकडे गेले त्यांचे लक्ष ।। 16 ।।
गावोगावी गावकऱ्यांनी
खोदले होते असंख्य चर
स्वच्छ करून ठेवल्या होत्या
कोरड्या विहिरी आणि हातपंप ।। 17 ।।
दारोदारी वाढवली होती
हजारो छोटी छोटी रोपं
मोठे विलक्षण आणि
आश्वासक होते ते दृश्य ।। 18 ।।
लहानथोरांची चालली होती लगबग
यावर्षी एकच होते सर्वांचे लक्ष्य
केला होता त्यांनी संकल्प
लावण्याचा कोटी कोटी वृक्ष ।। 19 ।।
हे पाहून आनंदाने मग
ढगांनी केली खूप दाटी
विजुताईच्या हातावर दिली
जोरदार टाळी ।। 20 ।।
आसमंतात वाजू लागला नगारा
सुटला भन्नाट वारा
होवू लागला ढगांचा गडगडाट
अन विजांचा लखलखाट ।। 21 ।।
बरसू लागल्या मग मेघांच्या
झिम्माड सरीवर सरी
थेंबांच्या टिपऱ्या वाजू लागल्या अंगणी
क्षणात पावसाने भिजली सारी धरित्री ।। 22 ।।
पावसाचा होताच धुवांधार वर्षाव
दरवळला तो मृदगंध आसमंतात
ओढे, नाले, नद्या, चर
आणि भरले सारे तलाव काठोकाठ ।। 23 ।।
कळून आली मानवाला
त्याची मोठ्ठी चूक
झाडे लावा झाडे जगवा
पाणी जिरवा, पाणी वाचवा
मंत्र अंगिकारला अचुक ।। 24 ।।
मोहरली ही अवनी
मग आनंदाने पानोपानी
सज्ज झाली नेसावयाला
हिरवी पैठणी……हिरवी पैठणी……।। 25 ।।
— मी सदाफुली
@ संध्या प्रकाश बापट
Leave a Reply