गुलाबी थंडीला सुरवात झाल्यावर काही दिवसातच अलिबागमध्ये एक वेगळेच वातावरण निर्मित होत असते. तोंडलीचे हिरवेगार मांडव उभे राहिलेले दिसतात. शेतात पेरलेल्या वालाना पांढरी फुले आलेली असतात तर कुठे कुठे हिरव्यागार शेंगा लागलेल्या दिसतात. ओसाड शेतात भात कापून राहिलेल्या चुडाना हिरवे हिरवे कोंब फुटलेले दिसतात. तर काही शेतात रांगेत उभी असलेली पांढऱ्या कांद्याची रोपे दिसत असतात. आंब्याच्या हिरव्या गर्द पानांच्या शेंड्या मधून लहान लहान कोंब बाहेर यायला लागतात. जसं जशी थंडी वाढायला लागते तसं तसे हे कोंब, ऊबदार गोधडीतुन सकाळी सकाळी घड्याळात किती वाजलेत हे बघण्यासाठी हळूच डोकं बाहेर काढून बघावे तसे हे कोंब हिरव्या पानांच्या शेंड्या बाहेर डोकवयाला सुरवात करतात. प्रत्येक क्षणा क्षणाला कणा कणाने वाढणारे हे कोंब हळू हळू फुगायला लागतात. फुगून फुगून तट्ट झाल्यावर त्यातून बाहेर पडणारे तुरे हसत हसत बाहेर पडतात की काय असे वाटायला लागते. याच तुऱ्यांचे पुढे मोहोरात रूपांतर होते.
जमिनीत बियाणे रुजले की त्याच्यातुन अत्यंत नाजूक असे कोवळे अंकुर बाहेर येतात. त्याच अंकुरांचे हळू हळू मोठ्या झाडात रूपांतर होते. याच झाडावर पुन्हा मोहोराच्या रूपाने नाजूक आणि कोवळे अंकुर झाडावर हिरव्या गर्द पाना पानातुन बहरून यायला सुरवात होते.
काही झाडांवर तुरळक तर काही झाडांवर पान सुद्धा दिसत नाही एवढा भरगच्च मोहोर येतो. हिरव्या गर्द आंब्याच्या झाडावर येणारा मोहोर जसं जसे दिवस वाढत जातात तसं तसा रंग बदलत जातो. सुरवातीला दिसणारे पोपटी किंवा तांबूस कोंब बहरल्यावर हिरवे दिसतात नंतर चॉकलेेटी किंवा ब्राऊन होत जातात आणि मोहोर फुलल्यावर थोडेसे पांढरे दिसल्या सारखे भासतात. आमच्या मामाकडे मांडव्याला शेतावर असणारा विहीरी वरचा आंबा, कलमाचा आंबा, गोडांबा आणि भिकन्या आंबा असे कितीतरी प्रकारचे आंबे आहेत प्रत्येकाची चव आणि लज्जत वेगवेगळी तसेच मोहोर आल्यावर त्यांच्या खाली गेल्यावर येणारा सुगंध सुद्धा अप्रतिमच. लहान असताना याच झाडांवर चढायला आणि सुरपारंब्या खेळायला मिळायचे. चढताना उतरताना हात आणि मांड्या सोलून निघायच्या पण झाडावर चढू नका म्हणून कोणी बोलायचे नाही की पडल्यावर कोणी ओरडायचे नाही.
हल्ली पिकनिक आणि मौज मजा करण्यासाठी येणाऱ्या अलिबाग बाहेरील लोकांना अलिबागच्या या अनोख्या निसर्गाची आणि सृष्टीची किमया आणि किंमत दोन्हीही कळणार नाही.
सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर अशा मोहोरलेल्या आंब्याच्या झाडांजवळून जाताना एक आल्हाददायक सुगंध दरवळत असतो. कोप्रोली पासून मांडवा, आवास फाटा, झिराड, चोंढी पुढे कार्ले खिंड आणि पेझारी पर्यंत. तसेच चरी, कोपर, खिडकी पासून हशीवरे आणि रेवस पर्यंत याच मोहोरलेल्या सुगंधाने संपूर्ण अलिबाग तालुका मंतरलेला आहे की काय असे वाटते.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply