लिओनार्दो दा व्हिंचीने चितारलेले ‘मोना लिसा’ हे चित्र दीर्घकाळ चर्चेत राहिलेले चित्र आहे. या चित्राचे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केले आहे. यात वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. अलीकडेच केल्या गेलेल्या आणखी एका वैद्यकीय विश्लेषणामुळे मोना लिसाच्या वैशिष्ट्यांत आणखी एका शक्यतेची भर पडली आहे. त्या शक्यतेचा हा आढावा…
मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील अंजली कुलकर्णी यांचा हा पूर्वप्रकाशित लेख
लिओनार्दो दा व्हिंचीच्या ‘मोना लिसा’ या सुप्रसिद्ध चित्राबद्दल ऐकलं-वाचलं नाही, अशी व्यक्ती विरळाच. जगातील सर्वांत प्रसिद्ध चित्रांपैकी असलेलं हे एक चित्र. लिओनार्दो दा व्हिंची ह्या कलाकाराची ही, त्याला अजरामर करणारी कलाकृती. पाच शतकांपूर्वी रेखाटलेलं हे तैलचित्र फ्रान्समधील पॅरिस शहरातील लूव्र, ह्या जगातील सर्वांत मोठ्या कलासंग्रहालयात सन १७९७पासून ठेवलेलं आहे. मात्र लिओनार्दो दा व्हिंची (१४५२-१५१९) ह्या असामान्य कलाकाराचा आवाका फक्त चित्रकलेपुरताच मर्यादित नव्हता. शिल्पकला, विज्ञान, संगीत, साहित्य, जीवाश्मशास्त्र अशा अनेक विषयांचा त्याचा गाढा अभ्यास होता. तंत्रज्ञानाबद्दलच्या कामात त्याला प्रचंड गती होती. त्या काळात लिओनार्दोनं उडणाऱ्या, हेलिकॉप्टरसदृश यंत्राची रेखाचित्रं काढलेली आढळतात. त्या रेखाकृतींवरून, भविष्यातील कित्येक शतकं पुढं जाऊन विचार करणारी त्याची दूरदृष्टी दिसते. लिओनार्दो दा व्हिंचीला मानवी शरीरशास्त्राच्या अभ्यासाचाही दांडगा व्यासंग होता. लिओनार्दोनं १५०६ साली, मृत्युमुखी पडलेल्या एका शंभर वर्षं वयाच्या व्यक्तीचं, शवविच्छेदन केल्याची नोंद आहे. शरीरशास्त्राच्या सखोल अभ्यासाचं प्रतिबिंब त्याच्या प्रत्येक कलाकृतीतून दिसून येतं. मोना लिसा ही कलाकृतीही त्याला अपवाद नाही. आपल्या कलाकृतीत परिपूर्णता येण्याच्या दृष्टीनं, एखाद्या विषयाच्या व्यासंगाची गाठली गेलेली ही परिसीमा असावी, अशी लिओनार्दोनं चितारलेली मोना लिसा ही कलाकृती आहे. ही मोना लिसा अनेक कारणांनी चर्चेत राहिली आहे. या मोना लिसानं गेली पाच शतकं कलाकार, वैज्ञानिक, एवढंच काय अगदी चोरांनासुद्धा आकर्षित केलं आहे. १९११ साली ह्या तैलचित्राची चोरी झाली आणि प्रसार-माध्यमांमुळं मोना लिसाबद्दलची चर्चा कलाजगतात आणखीनच पसरली. ( सुमारे दोन वर्षांनंतर हे चित्र परत मिळालं. )
मोना लिसा हे तैलचित्र आहे तरी काय? ‘मोना लिसा’ हे गडद रंगाचे कपडे घातलेल्या, एका आभूषणविरहित साध्या स्त्रीचं अतिशय वास्तववादी चित्र आहे. मोना लिसा म्हणजे लिसा घेरार्दिनी, इटलीतील फ्लोरेन्स शहरातील श्रीमंत व्यापारी फ्रान्सिस्को डेल जिओकॅन्डो ह्याची पत्नी. आंद्रिया ह्या त्यांच्या दुसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर, जिओकॅन्डोनं आपल्या पत्नीचं चित्र काढायला लिओनार्दोला पाचारण केलं. लिओनार्दोनं १५०३ साली हे चित्र चितारण्यास सुरुवात केली. हे चित्र १५९६ साली फ्रान्सला नेल्यानंतर लिओनार्दोनं त्यावर अखेरचा हात फिरवला.
हे तैलचित्र चित्रकलेच्या वेगवेगळ्या बाबींसाठी वाखाणण्यात येतं. मोना लिसाच्या चेहऱ्यावरच्या प्रकाश- छायेचा प्रभाव, चेहऱ्याच्या मुख्यतः कपाळाच्या हाडांची ठेवण, ह्या बाबी चित्राला अगदी जिवंत करतात. पण मुख्यत्वे करून मोना लिसाची खोलवरचा वेध घेणारी दृष्टी आणि तिचं गूढ स्मितहास्य, ह्या गोष्टी अधिक चर्चिल्या जातात. पास्कल कोत ह्या फ्रेंच इंजिनिअरनं, या चित्राच्या तब्बल तीन हजार तासांच्या अथक निरीक्षणानंतर बऱ्याचशा नवीन गोष्टींचीही नोंद केली आहे.
एखाद्या चित्रातील तपशिलावरून, त्याबद्दल वेगवेगळे निष्कर्ष काढणं, अनेक वेळा शक्य होतं. लिओनार्दोच्या या चित्रात मोना लिसानं डोक्यावरून तलम अशा पातळ कापडाचा पदर घेतला आहे. हे चित्र काढलं गेलं त्या काळातल्या बाळंतपणात, डोक्यावरून तलम
कापडाचा पदर घेण्याची पद्धत होती. त्यावरून मोना लिसा (म्हणजे मोना घेरार्दिनी) ही, ह्या चित्रीकरणाच्या वेळेस नुकतीच प्रसूतीतून उठली असल्याचं म्हटलं जातं.
मोना लिसाच्या चित्राच्या विविध विश्लेषकांत वैद्यकीय तज्ज्ञांचाही समावेश आहे! कलेच्या माध्यमातून, अगदी जिवंत चित्रण झालं असलं, तर त्याद्वारे त्या व्यक्तीला असणाऱ्या आजारांच्या लक्षणांचा अंदाज अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञाला नक्कीच येतो. मोना लिसाचा चेहरा, डोळे, मान, कपाळ, कपाळावरचे केस, हाताची बोटं, ह्यांचं अगदी तंतोतंत चित्रण ह्या तैलचित्रात असल्यानं, वैद्यकीय तज्ज्ञांना मोना लिसाच्या चित्रावरून वैद्यकीय दृष्टिकोनातून मोना लिसाच्या प्रकृतीबद्दल अंदाज व्यक्त करणं शक्य झालं आहे. २००४ साली बेल्जियममधील जे. डेककेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आपले निष्कर्ष एका वैद्यकीय नियतकालिकात शोधनिबंधाद्वारे प्रसिद्ध केले. या तज्ज्ञांनी मोना लिसाला, इसेन्शिअल हा रक्तातील स्निग्ध पदार्थांच्या विकार होणार हायपरलिपिडेमि अतिप्रमाणामुळे व अॅथेरोस्क्लेरॉसिस हा रक्तवाहिन्यांचा विकार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. या विकारांमुळे मोना लिसा वयाच्या सदतिसाव्या वर्षी मरण पावली, अशी नोंद त्यांच्या लेखात आहे.
परंतु, अलीकडेच अमेरिकेतील बोस्टन येथील हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील वैद्यकतज्ज्ञ मनदीप मेहेरा आणि सान्ता बार्बरा कॅलिफोर्निआ विद्यापीठातील वैद्यकतज्ज्ञ हिलरी कॅप्पबेल यांनी याबाबतचं आपलं विश्लेषण प्रसिद्ध केलं आहे. मनदीप मेहेरा आणि हिलरी कॅम्पबेल यांनी आपल्या विश्लेषणाद्वारे वेगळे निष्कर्ष काढले आहेत. या वैद्यकतज्ज्ञांच्या शोधनिबंधा-नुसार, मोना लिसा ही ६३ वर्षं जगली. जर तिला रक्तवाहिन्यांचा आजार असता, तर त्या काळातील औषधोपचारांच्या मर्यादा लक्षात घेता, ती इतकी जगलीच नसती. डॉ. मनदीप मेहेरांनी, आपल्या निरीक्षणातून, मोना लिसाला हायपोथायरॉइडिझमचा आजार असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
मोना लिसाच्या डोक्यावरील तलम पारदर्शी कापडाखालून तिचे विरळ झालेले केस दिसतात. केस विरळ झाल्यामुळे केसांची डोक्यावरची रेषही मागं गेलेली दिसते. त्यामुळं तिचे मोठे दिसत असलेलं कपाळ लगेच लक्षात येतं. प्रकर्षानं जाणवणारी आणखी एक गोष्ट. ती म्हणजे मोना लिसाच्या भुवया. सर्वसामान्यपणे डोळ्याच्या वर असलेली भुवयांची कमान या चित्रात चक्क दिसतच नाही! म्हणजे, सामान्य नजरेनं पाहिल्यास भुवयांना केस नाहीत. अशा प्रकारची लक्षणं थायरॉइड ह्या संप्रेरकाच्या (हॉर्मोन) कमतरतेनं दिसून येतात. अशा विविध लक्षणांमुळं मोना लिसा हिला ‘हायपोथायरॉइडिझम’ हा आजार असावा, असा अंदाज या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ह्या दाव्याला सबळ ठरवणारी काही इतर लक्षणंही ह्या चित्रात जाणवतात. मोना लिसाच्या मानेचा पुढील भाग फुगीर आहे. मानेचा हा फुगीरपणा थायरॉइड ग्रंथीच्या वाढीमुळे येतो. त्याला गलगंड (गॉइटर) असं म्हणतात. हायपोथायरॉइडिझममध्ये थायरॉइड संप्रेरकांच्या कमतरतेमुळं थायरॉइड ग्रंथीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. असा त्रास विशेषतः बाळंतपणात जाणवू शकतो.
सन १९५९ साली ब्रिटिश वैद्यकतज्ज्ञ केनेथ कील यांनीही मोना लिसाच्या चित्रातील, मानेच्या फुगीर भागाबद्दल उल्लेख करून तिला गलगंड असण्याची शक्यता नोंदवली होती. विशेष म्हणजे, मोना लिसाचं चित्र ज्या काळात काढलं गेलं, त्या काळातल्या इतर अनेक कलाकृतींमधील व्यक्तींच्या मानेचा भाग फुगीर झालेला दाखवला गेला आहे. तीन वर्षांपूर्वी रोम येथील सॅपिएन्झा विद्यापीठातील ए.व्ही. स्टरपीटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात, चौदाव्या ते सतराव्या शतकातल्या, इटलीतील कलेच्या पुनरुज्जीवनाच्या काळातील (रेनिसन्स) सुमारे सहाशे कलाकृतींचा अभ्यास केला. या कलाकृतींपैकी सत्तर चित्रांत आणि दहा शिल्पांमध्येही थायरॉइडच्या ग्रंथींवर सूज असल्याचं म्हणजे गलगंड असल्याचं निदर्शनास आलं आहे. ह्याबद्दल कारणमीमांसा केल्यास असं आढळतं, की ह्या काळात, इटलीतील खाद्यसंस्कृती मुख्यत्वे करून शाकाहारी होती. या शाकाहाराच्या काळातील, १३७५ ते १७९१ ह्या सुमारे चारशे वर्षांत धान्याचं उत्पादन कमी आणि दुष्काळ जास्त असल्याच्या नोंदी आढळतात. या दीर्घ काळात फक्त सोळा वर्षं पिकं पुरेशी आली. या दुष्काळी परिस्थितीमुळं निर्माण झालेली खाद्यपदार्थांतील आयोडीनची कमतरता व खाण्याच्या विशिष्ट सवयी या गलगंडाला कारणीभूत ठरल्या असाव्यात. मोना लिसालाही हा आजार असण्याची शक्यता चित्रावरून दिसून येते.
मोना लिसाच्या डाव्या डोळ्याजवळच्या भागाकडे काळजीपूर्वक पाहिल्यास आणखी एक गोष्ट आढळून येते. ती म्हणजे, नाकाची बाजू आणि डोळ्याचा कोपरा यांच्यामध्ये दिसणारा लहानसा उंचवटा. ह्याला ‘झॅन्थेल्समा’ असं म्हणतात. झॅन्थेल्समा म्हणजे चरबीच्या पेशींचा लहानसा फुगवटा. झॅन्थेल्समाचा संबंध काही आजारांशी असतो हे सिद्ध झालं आहे. रक्तातील चरबीचं प्रमाण वाढणं, हृदयविकाराची शक्यता बळावणं, ह्यांसारख्या गोष्टी झॅन्थेल्समा असलेल्या व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. मात्र, ह्याशिवाय हायपोथायरॉइडिझम ह्या आजारातही रक्तातील चरबीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. मोना लिसाला असलेल्या झॅन्थेल्समाचं कारण हे असू शकतं.
चित्रामध्ये मोना लिसाचा उजवा हात डाव्या हातावर ठेवलेला आहे. पण त्यात तिची लांबसडक बोटं आणि मनगट मात्र सुजल्यासारखं दिसतं. तिच्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटाच्या, म्हणजे तर्जनीच्या खाली लहानसा उंचवटाही दिसतो. ही गोष्टसुद्धा मोना लिसाला वैद्यकीय भाषेत झॅन्थेल्समा किंवा लायपोमा असण्याची शक्यता दर्शवते. लायपोमा म्हणजे त्वचेच्या खालच्या थराजवळ चरबीच्या गाठी तयार होणं. ह्या सर्व गोष्टी लिओनार्दोनं मोना लिसाच्या चित्रात बारकाईनं चितारल्या आहेत.
मोना लिसाच्या चित्रात, तिच्या त्वचेच्या रंगात पिवळसर छटा आहे. हायपोथायरॉइडिझम मध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाच्या चयापचयात काही बदल होतात. त्यामुळं बीटा कॅरोटीन ह्या पदार्थाचं रक्तातील प्रमाण वाढतं आणि त्वचेच्या सर्वांत बाहेरच्या आवरणाखाली या पिवळसर नारिंगी रंगाच्या बीटा कॅरोटीनचा थर जमतो. या बीटा कॅरोटिनमुळं त्वचेला पिवळट झाक येते. त्यामुळंच मोना लिसाच्या चित्रातही लिओनार्दोनं ही पिवळसर छटा ठेवली असावी असा अंदाज आहे. हायपोथायरॉइडिझम ह्या व्याधीमध्ये शरीराला एक प्रकारची सूज व जडत्व आलेलं असतं. मोना लिसाचे जाडसर हात, हा प्रकार मोना लिसाच्या बाबतीत झाला असल्याचं सुचवतात.
आणि आता ‘ते’ मोनालिसाचे बहुचर्चित, किंचितसं अस्फुट हास्य! ‘मोना लिसाचं स्मित’ हा शतकानुशतकं विश्लेषणाचा विषय झालेला आहे. त्या हास्यामागं अनेक शक्याशक्यतांची भर पडली आहे. तिच्या ओठांच्या अर्धवट स्मितरेषेत सौंदर्याच्या शोधासोबत काही आजारांचीही शक्यता पूर्वीपासूनच विचारात घेतली गेली आहे. तिच्या ओठांची ठेवण, तिच्याकडे बघण्याच्या कोनाप्रमाणे बदलते, चित्राला न्याहाळण्याच्या अंतरानुसारही स्मितरेषेत बदल होतो; त्यामुळं त्या हास्यासोबतच्या भावनाही बदलतात. ह्या गूढ हास्यामागं काही वैद्यकीय कारण आहे का, असा प्रश्न तज्ज्ञांनी चर्चिलेला आहे.
सन १९५९ साली केनिथ किल यांनी, मोना लिसाचं हास्य हे एका आजारामुळं अशा प्रकारचं असल्याचं मत व्यक्त केलं होतं. ‘बेल्स पाल्सी’ हे त्या आजाराचं नाव! ह्या आजारात चेहऱ्याचा भाग काही प्रमाणात अधू व कमजोर होतो. त्यामुळं ओठ दोन्ही बाजूंना सारख्याच प्रमाणात बंद होत नाहीत. चेहऱ्याच्या काही स्नायूंचा भाग नियंत्रित करणारी, मेंदूतून निघणारी ‘सातव्या क्रमांका’ची नस जर काही प्रमाणात अधू झाली असली, तरीही ओठ पूर्णपणे मिटू शकत नाहीत. त्यामुळं हे हास्य अर्धवट आहे, असा संशोधकांचा दावा आहे. गर्भारपणातही नसांना अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. आता तर डॉ. मनदीप मेहेरा आणि हिलेरी कॅप्पबेल यांनी, इतर सर्व लक्षणांप्रमाणेच हे अर्धवट हास्यदेखील हायपोथायरॉइडिझमचंच लक्षण असल्याचं मत व्यक्त केलं आहे. हायपोथायरॉइडिझमच्या व्याधीतसुद्धा स्नायू क्षीण होतात व हालचालीही मंदावतात. एकूण काय… तर मोना लिसाचं स्मितहास्य हे पूर्णपणे फुललेलं हास्य नसावं! वैद्यकीय तज्ज्ञांचे हे सर्व अंदाज बघता, लिओनार्दोला खरंच अर्धवट स्मितहास्य करणारी मोना लिसा चित्रित करायची होती, की तिच्या गूढ स्मिताद्वारे, बघणाऱ्याची कल्पनाशक्ती जागृत करायची होती, हा प्रश्न निर्माण होतो.
वरील वैद्यकीय विश्लेषण हे त्या तज्ज्ञांना, चित्रातील जाणवलेल्या लक्षणांवर आधारित आहे. त्यामुळं चित्र पाहून केलेल्या या विश्लेषणाला असलेल्या मर्यादा डॉ. मनदीप मेहेरा स्वतःच स्पष्ट करतात. त्या काळातील प्रचलित पद्धतीप्रमाणे मोना लिसानं भुवयांचे केस कदाचित जाणीवपूर्वकही काढलेले असू शकण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्वचेच्या रंगाबद्दलही तसंच… पाचशे वर्षं जुन्या कलाकृतीच्या रंगछटेवरून, आजाराचं निदान करणं अशक्य नाही; परंतु चित्राचे मूळ रंग अजूनही तसेच टिकून राहिले आहेत का, की चित्रावरील वॉर्निश वा चित्रातील रासायनिक पदार्थांच्या रंगांत बदल झाल्यामुळं त्वचेला ही पिवळसर छटा आली आहे, हा मुद्दाही त्यांच्या मते लक्षात घेतला पाहिजे. अशा प्रकारची रंगछटा ही कदाचित लिओनार्दो दा व्हिंचीच्या, रंगछटा एकमेकांत मिसळण्याच्या ‘स्फुमाटो’ या शैलीचाही भाग असू शकतो.
मोना लिसा… लिओनार्दोचं अप्रतिम वास्तववादी चित्रीकरण, हा या चित्राचा मुख्य गाभा. कित्येक शतकं अनेकविध कारणांनी चर्चेत राहिलेली ही कलाकृती कलाजगतातील रसिकांसाठी अमूल्य ठेव आहे. मोना लिसाच्या चित्राच्या बाबतीत अनेक मुद्दे चर्चिले जात आहेत. ह्या व अशा अनेक कारणांनी मोना लिसा व तिला चितारणारा लिओनार्दो दा व्हिंची हे सदैव आठवणीत राहतील हे नक्की!
— अंजली कुलकर्णी
मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख
Leave a Reply