गणपतीबाप्पाबद्दल कुतुहल आणि त्यातून येणार्या बर्याच अनुत्तरीत प्रश्नांची उकल करणारे हे नवे सदर….
मोरया माझा – ११ :
दचकलात ना प्रश्न वाचून? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का? तर त्याचे उत्तर, होय हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर, नाही हेच आहे. श्री गणेश शिवपुत्र नाहीत.
भगवान श्री गणेशांनी शंकर-पार्वतीच्या घरी अनेक अवतार घेतले असल्याने तसा उल्लेख आपल्याला सापडेल पण ते पूर्णवास्तव नाही.
उलट वास्तव हे आहे की त्रिपुरासुराच्या वधाचा वेळी भगवान शंकर आणि देवी पार्वतीने मिळून गणेश उपासना केली असे प्रत्यक्ष शिवपुराणच सांगते. त्यानंतर निर्माण झालेले क्षेत्र आहे श्री क्षेत्र रांजणगाव.
दुसरीकडे आपल्या पोटी श्री गणेश पुत्र रूपात यावे यासाठी देवी पार्वतीने लेण्याद्रीला गणेश उपासना केली हे आपण सर्वजण जाणतो.
मग जर भगवान गणेश केवळ शिवपुत्र, पार्वती नंदन असते तर यांना उपासना करण्याची गरज काय होती?
केवळ शंकर किंवा पार्वतीनेच नव्हे तर भगवान श्रीविष्णूंनी सिद्धटेकला, श्री ब्रह्मदेवांनी थेऊरला, श्रीसूर्यांनी काशीला, देवराज इंद्राने कळंबला, चंद्राने गंगामसलेला, मंगळाने पारनेरला, यमाने नामलगावला, शनीने पैठणला, श्री दत्तात्रेयांनी राक्षस भुवनला, शेषाने पद्मालयाला श्रीगणेश उपासना केल्याचे उल्लेख आहेत.
श्रीरामांनी कळंबला तर श्रीकृष्णांनी सुपे आणि दारव्याला गणेश स्थापना केली आहे.
याचाच अर्थ भगवान श्रीगणेश सर्वापूज्य, सर्वादिपूज्य, निर्गुण, निराकार, परब्रह्म, ॐकार रूप आहेत.
जय गजानन.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply