तीन वर्षांपूर्वी माझ्या षष्ठ्याब्दीपूर्तीच्या निमित्ताने बाप्पावर केलेली कविता.
काल रात्री स्वप्नात,
एन्ट्री घेतली बाप्पाने.
ठोके दिले बाराचे,
त्याचक्षणी घड्याळाने.
सोंड हलवत, मस्त झुलत –
माझ्याजवळ आला,
काय पहातोय मी?
विश्वासच बसेना झाला.
एकसष्ट मोदकांचं तबक –
होतं हाती त्याच्या,
बाप्पाच्या हातचे मोदक –
वाट्याला येणार कुणाच्या?
झटक्यात संपूर्ण ताटच त्याने –
माझ्यासमोर धरलं,
हातात घेऊन हात मला –
जिवेत शरदः शतम् म्हटलं.
खडबडून झालो जागा,
घामेजलं कपाळ पुसलं.
बाप्पाही झाला नाहीसा,
स्वप्नही तिथेच संपलं.
चटकन उठून स्नान करून –
पटकन सारं आवरलं.
एकसष्ट मोदकांचं ताट स्वप्नीचं –
हळुच मनात डोकावलं.
मनापासून हात जोडले –
Thank you म्हटलं त्याला.
आपत्तीपासून सांऱ्या बाप्पा –
निर्विघ्न कर तू आम्हाला.
तू सुखकर्ता, दुःखहर्ता तू –
बुद्धीची तू देवता,
भान हरपते नजर न हटते,
तुझे मुख पाहता.
स्तुती केली बाप्पाची अन-
खूप छान वाटलं,
साठ मोदकांनी भरलेलं ताट –
बाप्पासमोर ठेवलं.
डोळे मिटून हात जोडले –
अन नजर गेली चेहऱ्यावर,
चिकटलेले कण मोदकांचे –
दिसले त्याच्या तोंडावर.
-प्रसाद कुलकर्णी
Leave a Reply