इथिलीन ऑक्साइड व हायड्रोजन साइनाइड यांपासून अॅक्रिलोनायट्रिल बनते. त्यात स्टायरिन मिसळून स्टायनि अॅक्रिलोनायट्रिल बनवता येते. हे मिश्र प्लास्टिक पिवळसर असते. हे पूर्णपणे पारदर्शक असते.
त्याचा पृष्ठभाग कडक व ओरखडे न उठणारा असतो. यात रसायनांना विरोध करण्याची आणि हवेत टिकून राहण्याची शक्ती असते.
स्टायरिन अॅक्रिलोनायट्रिल फक्त ०.२ ते १०.३ टक्के एवढेच पाणी शोषून घेत असल्याने त्याचे विद्युत गुणधर्मही उत्तम आहेत. क्षीण आम्ले, क्षीण आणि तीव्र अल्कली यांचा स्टायरिन अॅक्रिलोनायट्रिलवर काही परिणाम होत नाही. हे मिश्र प्लास्टिक पेले, कप, टाईपरायटरच्या चाव्या, फ्रीजचे भाग यासाठी वापरतात. उच्च ताण सहन करण्याच्या गुणामुळे हे प्लास्टिक स्वयंपाकघरातील डिशवॉशर, भांडी, मिक्सरचे भांडे यासाठी वापरले जाते.
अॅक्रिलोनायट्रिल ब्यूटाडाइन स्टायरिन हे मिश्र प्लास्टिक १९४८ मध्ये शोधले गेले. यामधील अॅक्रिलोनायट्रिलमुळे त्यात उच्च ताण सहन करण्याची शक्ती, उष्णतेला टिकून राहण्याची शक्ती, रसायनांना विरोध करण्याची ताकद प्राप्त
होते. यामध्ये असलेल्या ब्यूटाडाइन रबरामुळे या मिश्र प्लास्टिकची आघात सहन करण्याची ताकद व मजबुती वाढते. स्टायरिन या घटक द्रव्यामुळे हे प्लास्टिक अधिक चकचकीत बनते आणि त्यापासून वस्तू बनवणे सोपे जाते. ब्यूटाडाइन अल्कोहोल पेट्रोलियम अथवा पदार्थांपासून बनवतात.
प्लास्टिकचा आणखी एका प्रकार म्हणजे ए.बी.एस. प्लास्टिक. हे प्लास्टिक विविध प्रतीत मिळते. उच्च आघात सहन करणारी प्रत, साच्यांसाठी लागणारी प्रत, उच्च तापमान सहन करणारी प्रत, ज्वलनाला विरोध करणारी प्रत, प्लेटिंगसाठी वापरण्यात येणारी प्रत, काचतंतू घातलेली प्रत इत्यादी. ते कमी पाणी शोषून घेत असल्याने या प्लास्टिकचे विद्युत गुणधर्म चांगले असतात. या प्लास्टिकवर क्षीण आम्ले आणि अल्कलीचा परिणाम होत नाही. मोटारी, घरगुती व ऑफिसची ‘उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणे, दूरध्वनी, फर्निचर, बांधकाम, प्रवासी साहित्य यात या प्लास्टिकचा उपयोग होतो.
-अ. पां. देशपांडे, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
Leave a Reply