दसरा संपला तसा मोरू जागा झाला.
मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘ ऊठ लेका, जागा हो, तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे, त्यांना म्हणावे, हे आमचे सर्वसामान्यांचे अपेक्षापत्र आहे. ते वाचण्याची कृपा करावी. तत्पूर्वी तूही ते नजरेखालून घालावेस, हे बरे. म्हणजे वादविवाद नामक प्रेमळ संवादासाठी तुला तयारी करता येईल.’
मोरूने आज्ञाधारकपणे मान तुकवली, आणि कागदावर नजर टाकली
१ : मूल जन्माला आल्यापासून ते जितके शिक्षण घेईल त्यासगळ्याचे शुल्क (फी) भरावे लागणार नाही, अशी व्यवस्था करावी.अर्थात यात ते मूल एकेका इयत्तेत वा वर्गात कितीही वर्षे नापास झाले तरीही फी भरावी लागणार नाही, हे अध्याहृत आहे.
२ : त्यामुलाचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न, त्याचा वाढणारा कुटुंबकबिला यासगळ्याचा खर्च आणि बेकार भत्ता, म्हातारपणाचा भत्ता, (यात लिंगभेद, धर्मभेद, जातीभेद करू नये ) व वयोगटानुसार प्रत्येकाला, लायकी असो वा नसो, भरघोस पेन्शन देण्यात यावी, ती करमुक्त असावी.
३ : केवळ शेतकरीच नव्हे तर महाराष्ट्रातील नोकरदार, छोटेमोठे व्यावसायिक, अनधिकृत व्यवसाय करणारे (उदा. चहाच्या टपरी, चायनीज गाड्या, आईस्क्रीमच्या गाड्या ) यासर्वाना कोणताही कर लागू करू नये.
४ : रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, विमानतळ, रेल्वेस्टेशन, बसस्टँड अशा सर्वच सार्वजनिक ठिकाणी मोफत नाश्ता सेंटर, मोफत भोजनालये, ओपन जिम, मोफत दारूविक्री केंद्रे सुरू करावीत, त्यात कुणी विक्री करताना आढळला तर जबरी शिक्षा द्यावी.
५ : राज्यात सर्वत्र विनामूल्य औषधकेंद्रे, मोफत रुग्णालये, मोफत चिकित्सालये उघडावीत. ऑपरेशन मोफत, अवयव मोफत, रक्त मोफत असं सर्वत्र असावं.
६ : राज्यातील सर्व गुंड सर्वांची अब्रू लुटत असतील तर फारसे मनावर घेण्यात येऊ नये.
७ : सर्व प्रकारच्या आस्थापनांमध्ये, संस्थांमध्ये, किमान सहा आकडी पगार, भरपगारी लागतील तेव्हढ्या रजा देण्यात याव्यात. काम करायला हवेच, अशी क्षुल्लक अट घालणाऱ्यांना त्वरित निलंबित करावे.
८ : बिल्डरांनी कुठेही अनधिकृत इमारती उभाराव्यात आणि त्या सरकारने विकत घेऊन मोफत निवाऱ्याची सोय सरकारने करावी.
९ : चंद्र आणि मंगळवर प्लॉट पाडुन गरजुंचा निवाऱ्याचा प्रश्न सोडवावा. त्यासाठी आपल्या राज्यात अनेक तज्ज्ञ उपलब्ध आहेत.
१० : सर्व प्रकारची वाहतूक, पर्यटन, स्थलदर्शन सरकारने मोफत करावी.
११ : जे जे म्हणून गरजेचे आहे, ते ते सरकारने कर्तव्य भावनेतून विनामूल्य, तात्काळ उपलब्ध करून द्यावे.
१२ : परतफेड करण्याची अट नसणारे कर्ज देण्यात यावे, प्रत्येक कुटुंबाला,लोकसंख्येच्या समप्रमाणात मोफत पेट्रोल वा डिझेल विनामूल्य देण्यात यावे.
१३ : जनतेला हवी तेव्हा सर्व प्रकारची करमणूक विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावी.
१४ : सर्व प्रकारचे ( गरम, थंडगार, सौम्य, ) फिल्टर्ड पाणी, स्वच्छ हवा सरकारने मोफत द्यावी.
१५ : सार्वजनिक आणि घरगुती स्वच्छता सरकारने करावयाची आहे तीही विनामूल्य याची हमी द्यावी.त्यात आळस झाल्यास वा कुचराई झाल्यास होणाऱ्या रोषास सरकारने तोंड द्यावे.
१६ : आंदोलने केली जातील, ती हिंसक असतील आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाईल त्याची भरपाई सरकारने करावयाची आहे. ती जबाबदारी आंदोलकांवर टाकून हात वर करू नये.
कागदाची चळत वाचता वाचता मोरू थकला आणि पुन्हा गाढ झोपी गेला.
— मोरूच्या बापाने ते पाहिले, त्यास खूपच राग आला, तो म्हणाला ;
…’ मोरू, मोऱ्या ऊठ, लेका दसरा संपला काल, अजून तू झोपलेला ? आणि झोपेत काय बडबडत होतास ? मी ऐकलेय सगळे, आता तोंड खंगाळ आणि जा बाहेर. हे पैसे घे आणि शिक्षण, मालमत्ता, वाहन, रस्ता, दैनंदिन गरजेच्या वस्तू, हे आणि सरकारने लादलेले इतर सगळे कर भरून ये. तू झोपेत जे बडबडत होतास ते सगळे सरकारने, विनामूल्य आणि मोफत द्यायला हवे असेल तर आपल्यासारख्या प्रामाणिक करदात्यांनी कर भरल्याशिवाय सरकारला शक्य नाही. जा ऊठ आणि आदर्श नागरिक म्हणून, सरकारकडून कुठल्याही विनामूल्य गोष्टींची अपेक्षा न ठेवता, कर भरून ये !!! ‘
मोरू उठला आणि बापाच्या आदर्श तत्वज्ञानाला नमस्कार करून, पैसे घेऊन, कर भरायला बाहेर पडला…
— डॉ. श्रीकृष्ण जोशी
रत्नागिरी.
९४२३८७५८०६
Leave a Reply