बँक म्हटले की खूप किस्से आले… त्यातल्या त्यात तुम्ही शाखेत असाल तर रोज माणसांचे नवीन नमुने मिळतात…
मी कुर्ला शाखेत असतानाचा एक किस्सा.. मी नुकतीच बँकेत लागले होते, प्रोबेशन काळात संपात सहभागी होता येत नाही…अश्याच एका संपाच्या दिवशी मी, कॅशियर आणि एक वरिष्ठ अधिकारी एवढेच लोक उपस्थित होतो. फक्त रोख रकमेचे व्यवहार चालू होते म्हणून तुरळक गर्दी होती, ह्या शाखेत एक पेट्रोल पंपाचे खाते होते. रोज 2-3 खात्यात प्रत्येकी 15 ते 20 लाख रक्कम जमा व्हायची…तशी त्या दिवशी पण झाली आज कॅशियर पण निवांत होता…पेट्रोल पंप सरदार कुटुंबांचा होता त्यातला एक जण माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटायला आला, बोलता बोलता त्यांनी खात्याचा तपशील मागितला मग त्यांच्या लक्षात आले एका खात्यात कमी रक्कम भरली गेली आहे. पहिले त्यांनी आमच्या कॅशियरला बोल लावले, पण तो ठाम राहिला की एवढीच रक्कम आली. दोनदा-तीनदा तपासल्यावर ते त्यांच्या ऑफिसला गेले… नंतर त्या कुटुंबातले ज्येष्ठ सदस्य आले आणि आमच्या अधिकाऱ्यांना किस्सा सांगितला. त्यांच्याकडे गेली 25 वर्षेपर्यंत काम करणारा माणूस जो रोज पैसे भरायला यायचा त्याने शर्टात पैसे लपवले होते… दरडावून विचारल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. त्या कुटुंबातल्या तरूण मुलांनी खूप मारले त्याला पण मोठेमध्ये पडले आणि केवळ 25 वर्षे काम केले म्हणून पोलिसात तक्रार केली गेली नाही. त्यांनी आमची सुद्धा माफी मागितली आणि प्रकरणावर पडदा पडला. पण पैसा हा कसा कुणाला कधी भुरळ पाडेल आणि गुन्हेगारी कृत्ये करायला भाग पडेल ह्याचे जागते उदाहरण बघायला मिळाले.. तसेच मोठ्या व्यवहारांमध्ये कसा कुणावरही विश्वास ठेवू नये ह्याचा मोठाच धडा आम्हाला मिळाला…!
-नेहा तळवेलकर
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply