जय दुर्गे चंडिके
माते, हे दुर्गे चंडिके
तुझ्या वरदहस्ताविण, माते, जग ना चालुं शके ।।
तूं चामुंडा, काली माता
अंबा, ‘शेरोंवाली’ माता
वेगवेगळें रूप तुझें भक्तांच्या मनिं झळके ।।
रुंड चेचशी पायाखालीं
मुंडमालिका कंठीं घाली
शूल नि खड्गावरुन करींच्या खलशोणित टपके ।।
तुझ्या कृपेनें जीवन फळतें
विश्व तुझ्या इच्छेनें पळतें
आज्ञेनेच तुझ्या, रविशशिनें अंबर नित चमके ।।
जन्ममृत्युचें करसि नियंत्रण
तूंच काळचक्राचें कारण
काल-आज-अन्-उद्यापलिकडे तव अस्तित्व टिके ।।
तव गरिमा गातात सर्वजण
जगत् तुला करताहे वंदन
लक्ष देवदेवींचें मस्तक तुझियापुढे झुके ।।
नयनें उत्सुक करण्यां दर्शन
पदरज करो ललाटा पावन
अथक तुझें गुणगान गर्जुं दे सार्या भक्तमुखें ।।
पापांचें क्षालन कर माते
क्लेशांचा आतप हर माते
भर माते आमुच्या जीवनीं चिन्मय सर्व सुखें ।। – – –
– – –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply