अज्ञात दिवा मी मिणमिणणारा
संकटाचे येऊ देत वादळी वारे
वावटळही ती येऊ दे
आणि अंगावर येऊ देत सारे
पण मी विझणार नाही
मी जागृत रहाणार आहे
पेटूनऽ….
पेटून, पेटवून मी प्रज्वलित होणार आहे
जरी मला ज्ञात आहे
गेल्यावर मी, फक्त….
दप्तरी नोंद होणार आहे
विस्मृती मला घेरणार आहे
पण कर्तव्य माझे मी पार पाडणार आहे
जन्म-जीवन माझे मरण्यासाठी
मरण माझे माझ्या देशासाठी
खेचून विजयश्री मी आणणार आहे
रणधुमाळीतच मी विसावणार आहे
नसेन मी….
नसेन मी भव्य स्मारकावर
जागृत जनस्मृतीवर
फळ्या-फलकांवर
इतिहासाच्या अन्
भव्य – सोनेरी पानांवर
बलिदानातच मला
मान माझा गवसणार आहे
धडाडणाऱ्या तोफांना मी धडकणार आहे
मातीसाठी माझ्याच, मी मरणार आहे
या मातीची, या देशाची आणि विजयाची
इमारत जेव्हा उभी रहाणार आहे
लक्षात ठेवा.
पाया तिचा तो मीच असणार आहे
तो पाया मीच, मजबूतीही मीच
आणि पहा
पसरलेला तो… गडद लाल रंग
शाईचा-इतिहासाच्या पानापानातील
त्यातही तर मीच असणार आहे
मातेच्या विजयाचा कणन्-कण
मीच तर तो असणार आहे
नाही…
नाही मी विसरला जाणार….
मी मरणार नाही
मी अमर होणार आहे
देशभक्तीचे प्रिय अमृत प्राशून
मी मृत्युंजय होणार आहे
— यतीन सामंत
Leave a Reply