नवीन लेखन...

मृगजळ

” सरप्राइज……” अश्या आवाजाने किचन मध्ये संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीत असलेली कविता एकदम दचकली, आणि पाठी मागून कोणी तरी तिचे डोळे हाताच्या पंजाने झाकले .

” अहो ! तुम्ही आज लवकर कसे काय आलात? ” सरप्राइज देणारी व्यक्ती कोण आहे हे ठाऊक असल्याने तिने विचारले ” अगं काय हे? .. तू तर लगेच ओळखलस, निदान खोटं खोटं तरी ओळखायचा प्रयत्न करायचा ना ! ”

खट्टू होत राकेश ने लाडिक तक्रार केली . ” अहो अठरा वर्षांचा संसार झालाय म्हटलं आपला, आता कसलं सरप्राइज आलंय? पावलांच्या चाहुली वरून ही समजत आता, घरात काय चाललंय आणि काय नाही ” हसत हसत कविता ने राकेश ला एक टोमणा मारला आणि पुन्हा कामात व्यग्र झाली. ” बरोबर आहे ग ! तू आहेस म्हणून हे घर आहे, घरातील प्रत्येकाची एव्हढी काळजी घेणं, कुणाला काय हवं, काय नको बघणं .. हे तूच करू जाणे ” राकेश थोडंसं गहिवरून म्हणाला .

” एनी वें… हे तुझ्या साठी खास बर्थ डे गिफ्ट ” असं म्हणत त्याने एक बॉक्स तिच्या हातात ठेवला .

” काय आणलत? ” कुतूहलाने तिने विचारले आणि बॉक्स उघडायला सुरुवात केली . त्यात एक नवीन स्मार्ट फोन होता . ” हे मात्र खरंच सरप्राइज आहे, पण अहो कशाला उगाच वायफळ खर्च करत बसलात? याची काय गरज होती? तुम्हीपण ना .. ” तिला मध्येच थांबवत राकेश म्हणाला ” अगं असू दे ग, आज तुझा वाढ दिवस आहे ना .. मग जास्त विचार नको करू ” ” अहो पण माझा फोन चांगलाच आहे की हा . कशाला नवा आणायचा? ” कविता म्हणाली ” डोन्ट वरी अगं आता ई एम आय वर इझीली गोष्टी घेता येतात ” तिला समजावत राकेश म्हणाला ” अहो पण  … ” कविता पुढे काही बोलण्या आधी तो म्हणाला ” अगं हा नवीन मॉडेल चा स्मार्ट फोन आहे, यात फेसबुक, व्हॉटसअप वगैरे सुरू करून घे, तुझा मस्त टाईमपास होईल बघ ”

” इथे टाईम कोणाला मिळतोय, पास करायला? ” हे कविता म्हणाली पण अर्थातच मनातल्या मनात.

एका अर्थाने ते खरं ही होतं म्हणा, कारण रोज सकाळी सहा वाजता तिचा दिवस सुरू व्हायचा तोच मुळी दोन्ही मुलांच्या म्हणजे श्रुती आणि शिरीष यांच्या अनुक्रमे कॉलेज आणि शाळेच्या डब्या च्या तयारी ने, राकेश एम आय डी सी मध्ये एका ऑटोमोबाईल कंपनीत होता त्यामुळे त्याला वेग वेगळ्या शिफ्टस प्रमाणे जावं लागायचं, तेव्हा त्याचा डबा वेगळा, आर्थिक परिस्थिती यथा तथा च असल्याने सर्व घर काम तिच्यावरच होती,  त्यामुळे रात्री अंथरुणाला पाठ टेके पर्यंत तिचा कामाचा सपाटा सुरूच असायचा . थोड्या वेळात श्रुती क्लास हून आणि शिरीष शाळेतून आले, आणि राकेश ने जाहीर केले की आज संध्याकाळी आई च्या वाढदिवसा निमित्त आपण सगळे हॉटेल मध्ये जेवायला जाणार आहोत ” मुलं आनंदाने एकमेकाला टाळ्या देणार तेव्हढ्यात कविता म्हणाली ” काही तरीच काय? आपण घरीच जेवू, आता होईल माझा स्वयंपाक थोड्या वेळात ” ” अगं काय ग आई, असं काय करतेस आजचा दिवस असू दे ना ! आज तुझा बर्थ डे आहे ना ” इती शिरीष ” हो ना कविता चल ना जाऊ आज ”

राकेश ने आग्रह सुरू केला .

कविता शांतपणे म्हणाली ” आपण जाणार, मग आबांच काय करायचं? ”

एकदम सगळ्यांचे चेहरे उतरले . आबा म्हणजे कविताचे सासरे बरेच महिन्यांपासून पार्किन्सन आजारा मुळे घरीच होते, त्यांच्या दिमतीला कोणाला न कोणाला घरी थांबावच लागायचं .त्यांच्या दोन्ही वेळच्या गोळ्यांची वेळ कसोशी ने पाळावी लागायची . आणि ही जबाबदारी देखील कविता वरच होती. “चल आई तुला मी तुझ्या नवीन फोनवर फेसबुक आणि व्हॉटसअप सुरू करून देते ” विषय बदलत श्रुती म्हणाली .

” डोंबलाच फेसबुक !! .. मला त्यातलं काही समजत नाही बाई ” कविता ने प्रांजळ कबुली दिली ” अगं काही नाही सोपं असतं, तुझं अकाउंट तयार करू मग बघ तुला तुझ्या जुन्या मैत्रिणी वगैरे कश्या फटाफट सापडतील ” श्रुती ने आग्रह सुरूच ठेवला आणि अखेर तिला फेसबुक, व्हॉटसअप सुरू करून दिलं, सुरुवातीला काही काळ तिला त्यात फारसे काही स्वारस्य नव्हतं. एके दिवशी असच फेसबुक बघता बघता तिला एक चेहरा त्यात दिसला . तिने नीट निरखून पाहिलं, प्रोफाईल उघडून पाहिला ” अय्या हो.. रागिणी च आहे ही, रागिणी ठाकूर, रागिणी… तिची शाळेपासून ची मैत्रीण पण किती वेगळी दिसते ही ! ” तिनें पटकन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि मनोमन तिला जरा बरं वाटू लागलं, शाळा, कॉलेज, तिचं जुनं घर, सायकल हे सगळं आठवू लागलं .

कविता आणि रागिणी दोघी रघुनाथ विद्यालय इयत्ता पाचवी च्या पहिल्या दिवशी रोल नंबर नुसार एका बेंच वर ज्या बसल्या तेव्हा पासून अगदी कॉलेज च्या पदवी दान समारंभाच्या वेळे पर्यंत त्यांनी एकमेकी सोबत अनेक सुखाचे, दुःखाचे क्षण वाटले होते, प्रसंगी एकत्र अभ्यास, तर कधी शाळेतल्या शिक्षा देखील एकत्र भोगल्या होत्या . योगा योगाने दोघी ही एकाच चाळी वजा इमारतीत राहायच्या रागिणी पहिल्या पासून महत्त्वाकांक्षी होती, अभ्यासात फारशी रुची आणि गती नसली तरी व्यवहार चातुर्य आणि वाक् चातुर्य याच्या जोरावर ती नेहमी सर्वांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनून राही. त्या मानाने कविता शांत, आत्म् केंद्री आणि सोशिक .

” आपून इधर छोटे गाव में नही सडेगा, डायरेक्ट मुंबई नही तो फॉरेन ” फिल्मी शौकीन असलेली रागिणी बरेच वेळा असे डायलॉग कविता वर फेकायची, तिला छान छौकी आयुष्य, बंगले, गाड्या याचं प्रचंड आकर्षण . हे आठवून कविता मनातल्या मनात हसली आणि रागिणी च प्रोफाइल पाहू लागली . तिच्या लक्षात आलं की रागिणी खरोखर तिचं त्या काळातल स्वप्न प्रत्यक्ष जगत होती, तिच्या फोटोंमध्ये कविताला सिनेमात दाखवतात तसा मोठा बंगला, आलिशान मोटारी दिसत होत्या, रागिणी चे कपडे, दागिने तर प्रचंड सुंदर आणि आकर्षक दिसत होते, तिचं हे सर्व वैभव पाहून कविता चे डोळे दिपून गेले .

रात्र भर तिला रागिणी च्या विचारांनी झोप देखील लवकर लागली नाही. पहाटे पहाटे फेसबुक नोटिफिकेशन ची रिंग वाजली आणि कविताने अक्षरशः फोन वर झडप घालून तो घेतला . रागिणी ने तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली होती .थोड्याच वेळात तिने कविता ला स्वतः चा फोन नंबर पाठवला .

आता या जुन्या मैत्रीचं आधुनिक रूपांतरण फेसबुक वरून व्हॉटसअप वर आलं .

सगळे आप आपल्या कामावर गेल्या वर दोघी मैत्रिणी फोन वर मनसोक्त गप्पा मारू लागल्या, त्यांच्या गप्पांची गाडी सटासट वेगाने धावू लागली, जुनं घर, शेजारी, शाळा, कॉलेज इतर मित्र मैत्रिणी असे अनेक विषय पुनर्जीवित झाले .

” अग तुला ती ही आठवते का? ” किंवा आता तो कुठे असतो ग? अश्या पालुपदांनी चर्चा सुरू व्हायच्या आणि तासनतास दोघी हसत खिदळत राहायच्या . इतर सर्व विषय बोलून झाल्यावर काही दिवसांनी मग एक मेकींच्या सुख दुःखाची विचारपूस सुरू झाली.

आता कविता चा वेळ फोन वर जास्त जाऊ लागला, तिला रागिणी ची आणि तिच्या जीवन शैली ची प्रचंड भुरळ पडली होती, ती रोज कविता ला वेग वेगळे फोटो पाठवायची त्यातून तिचं ते श्रीमंत जग पाहून हळू हळू ती भुरळ हेव्या मध्ये कधी रुपांतरीत झाली तिला समजले नाही. आज ती कुठे आणि आपण कुठे या विचारांनी तिची चिडचिड होऊ लागली, एक प्रकारे घुसमट वाढू लागली. रागिणी ने किती वेळा आग्रह केला तरी तिला तिचं हे छोटंसं घर, त्यातले सामानाचे पसारे, जुनं फर्निचर या सर्वाचे फोटो शेअर करण्याची लाज वाटायची, ती अश्या वेळी विषय बदलून टाळायची, तिच्या वागण्यातला हा बदल राकेश ला आणि मुलांना जाणवू लागला.एव्हढ्या एवढ्यात तिचे राकेश सोबत खटके उडू लागले होते, पण कामाचा व्याप आणि वयानुसार शारीरिक बदल यामुळे असेल असे त्यांना वाटत होत अश्यात एके सकाळी तिचा व्हॉटसअप मेसेज वाजला ” गेस व्हॉट …सरप्राइज ! मी आज नाशिक ला येत्ये आहे तुझ्या घरी, मस्त धमाल करू, अॅड्रेस सेंड कर तुझा ” रागिणी चा मेसेज होता मेसेज वाचून तीला घामच फुटला, ‘ आता काय करायचं? तिला या खुराड्या सारख्या घरात कसं बोलवायचं? काय म्हणेल ती? आणि माझा हा रोजचा व्याप मी कुठे सोडू? ‘ या दडपणात तिच्या भिडस्त स्वभावा मुळे तिने चक्क खोटं लिहिल ” आज आम्ही सगळे एका लग्ना साठी गावाला चाललो आहोत ” आणि घाबरून फोन बंदच करून ठेवला.

थोडे दिवस गेले आणि रागिणी ने तिला फोन केला आणि सांगितलं की ” आपल्या कॉलेज गृप् च्या, रमा, वैशाली आणि इतर एक दोन जणी एक गेट टुगेदर करतोय शनिवारी मुंबईत, तू यायलाच पाहिजे ” कविता खूप खुश झाली, तिला गेट टुगेदर पेक्षा  रागिणी भेटणार, तिचा बंगला, ते वैभव पाहता येणार याचं जास्त अप्रूप होतं . पण प्रत्येक वेळेस आपल्या मना सारखं न होऊ देणं हा तर नशिबाचा आवडता खेळ,  तिने खूप वर्षानंतर मैत्रिणी भेटणार हे सांगून राकेश ची परवानगी देखील मिळवली खरी पण आता आपण मुंबईला कसं जाणार? इकडचे सगळे व्याप, सगळ्यांचे डबे , आबांच्या गोळ्या हे सगळं कोण करणार? हे यक्ष प्रश्न सोडवण्याच्या विचारात असताना, नेमक शुक्रवारी दुपारी आबांना श्र्वसनाचा त्रास होऊ लागला आणि सिटी हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करावं लागलं, आता मात्र आपण जाऊ शकणार नाही मुंबई ला याची तिला जाणीव झाली, पण इकडे रागिणी ऐकायला तयार नव्हती ” मी माझी गाडी आणि ड्रायव्हर पाठवते, पण तू यायलाच पाहिजे ” असा हट्ट तिने धरला, तिची ही घालमेल राकेश ने ओळखली आणि तिला सांगितलं ” तू जा कविता मुंबई ला, मी आहे इथे, होईल मॅनेज सगळं डोन्ट वरी ” अखेर द्विधा मनस्थितीत ती मुंबई साठी निघाली .

मुंबई…. माया नागरी आणि रागिणी या दोघी तिला स्वप्नवत वाटत होत्या .सगळ्या जुन्या मैत्रिणी भेटल्या मुळे कविता ला खूप बरं वाटतं होत, गप्पा, गमती जमती ना उधाण आलं होत, एका मोठ्या होटेल मध्ये सगळ्या भेटल्या होत्या, सगळा खर्च रागिणी ने केला होता, नंतर दुपारी कविता ला घेऊन रागिणी तिच्या बंगल्यावर गेली, फोटो मध्ये पाहिलेलं हे वैभव, संपत्ती, पोर्च मधल्या आलिशान गाड्या प्रत्यक्ष पाहताना तिचे डोळे दिपून गेले . रागिणी च्या बोलण्यातून तिला समजले की, तिचे पती एक मोठे उद्योगपती आहेत, मुंबई सोबत दुबई, सिंगापूर आणि मलेशिया मध्ये ही त्यांच्या व्यवसायाचा पसारा आहे, त्यामुळे अनेकदा ते परदेश दौऱ्यावरच असतात,  दोघी गप्पा मारत असताना आतून एक त पॉश कपड्यातील मॉडर्न तरुणी पर्स, गाडीची किल्ली सांभाळत आली,  ” मॉम मी लोणावळ्याला चालली आहे फ्रेंड्स सोबत, रात्री उशीर झाला तर तिकडेच स्टे करेन ” तिने रुक्ष पणे हे वाक्य फेकल ” मेघना अगं हो पण, …..” हे रागिणी च वाक्य तिने कानावर देखील घेतलं नाही आणि निघून गेली .

गेट मधून बाहेर पडणाऱ्या गाडीचा आवाज ऐकू आला आणि कविताने भानावर येत तिला विचारलं ” मॉम….?

म्हणजे तुझी मुलगी? ? एव्हढी मोठी कशी काय तुझी मुलगी? ” कवितांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते ” माझी नाही … शेखर ची मुलगी आहे ..माझ्या नवऱ्याची ” निर्विकार पणे रागिणी ने केलेल्या या वक्तव्याचा अर्थ लावण्या च्या प्रयत्नात असलेल्या कविता ला ” बस पाच मिनिट मी माझं ड्रिंक घेऊन येते ” असा अजुन एक धक्का देऊन रागिणी उठली आणि एक ड्रिंक बनवून पुन्हा सोफ्यावर येऊन बसली, आता तिच्या चेहऱ्यावर एक उद्विंगता, उदासी स्पष्ट दिसत होती,  ” रागिणी तू आणि ड्रिंक्स? अगं काय हे? आणि शेखर ची मुलगी म्हणजे?  मला काही समजलं नाही ! ” त्या वर रागिणी केवळ हसली, पण ते हास्य देखील भेसूर वाटलं कविता ला ” काय सांगू कविता? अगं हेच माझ आयुष्य आहे, ” अशी प्रस्तावना करून रागिणी बोलू लागली “आपलं कॉलेज च शिक्षण संपलं आणि घरी माझ्या लग्ना साठी गडबड सुरू झाली . पण मला मुंबई गाठायची होती, एका मॉडेलिंग च्या असाईनमेंट च्या निमित्ताने मी कोणाला ही न सांगता घर सोडलं आणि इथे आले .या माया नगरीत कायमची हरवून गेले,  असाईनमेंट च्या नावाखाली माझी फसवणूक झाली, परतीचे दोर मी स्वतः च कापून टाकले होते, मग माझ्या मावस बहीणीच्या ओळखीने मला शेखर च्याच कंपनीत जॉब मिळाला,  काही काळातच माझा तिथे जम बसला आणि यथावकाश शेखर नी माझ्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला .शेखर वयाने माझ्या पेक्षा बराच मोठा आहे, पण आयुष्यात स्थैर्य मिळावं म्हणून मी होकार दिला .” ग्लास मध्ये पुन्हा ड्रिंक भरत रागिणी बोलू लागली ” पण तीच मोठी चूक झाली, शेखर आधीपासूनच विवाहित होता, आठ वर्षांच्या मेघना साठी त्याला फक्त केअर टेकर हवी होती, ” डोळे पुसत ती सांगू लागली ” पण ना तर मला कधी एका पत्नी चा दर्जा मिळाला आणि ना ही मेघना ने मला आई मानलं, फक्त मिळाला तो अमाप पैसा, गाड्या, बंगले आणि प्रचंड एकटेपण, नैराश्य . ” ” अगं एवढं सोसतेस? तू तुझ्या माहेरच्यां… ” कविता ला मध्येच थांबवत ती म्हणाली ” अगं मी घर सोडून आले आणि माझ्या लहान बहिणीचे भविष्य माझ्या मुळे अंधारेल या विचारांनी माहेर च्यांनी कधीच मला परक केलं ग ” ” जाऊ दे … बस् मग एकटे पण आणि दुःख असं बर्फा सारखं ग्लास मध्ये विरघळवून टाकते मी ” ग्लास मध्ये बर्फाचा खडा टाकत रागिणी म्हणाली.

” एैसा ही हैं जिंदगी का भरम, कभी खुशी कभी ..सॉरी हमेशा का गम ” पुन्हा एकदा दुःख लपवायला तिला फिल्मी डायलॉग चा सहारा घ्यावा लागला .

कविता ला काय बोलावं ते सुचेना, काय प्रतिक्रिया द्यावी कळेना, तिची समजून काढावी का सांत्वना द्यावी? त्या दिवशी आपण उगीच तिला टाळलं याची टोचणी लागून राहिली तिने तिला धीर देत समजावले ” जे आपल्या हातात नाही ते दैवा वर सोड आणि आयुष्य वेगळ्या पद्धतीने ने जगायचा प्रयत्न कर ” निघता निघता कविताने तीला विचारलं ” तुला माझ्या घरी यायला आवडेल रागिणी? नाशिकला ये माझ्या घरी, माझं घर लहान आहे थोडी अडचण होईल तुला, पण तुला खूप आवडेल, माझ्या घरी पण सर्वांना आवडेल तुला भेटायला, मी तुझ्या बद्दल एवढं सांगितलंय सगळ्यांना ” थोडं भावनिक होत डोळे पुसत आणि हसून रागिणी म्हणाली ” फिकर नॉट डियर.. अगं घर मोठं असून काय उपयोग घरातल्यांच मन मोठं हवं ग, मी नक्की येईन तुझ्या कडे ” तिचा हात हातात घेत तिने वाक्य पूर्ण केलं नाशिक ला परत जाण्यासाठी कविता बस मध्ये बसली आणि तिच्या लक्षात आलं की ” अरेच्च्या आपण सकाळ पासून घरी एकही फोन नाही केला, ” मग तिने राकेश ला फोन केला आणि निघाल्याच सांगितलं ” आबांना आता बरं आहे आत्ताच डिस्चार्ज मिळाला, घरी आणले आहे ” राकेश कडून हे ऐकुन तिला बरं वाटलं बस च्या खिडकीतून मंद वाऱ्याची झुळूक येत होती तिने शांत पणाने डोळे मिटले, डोक मागे टेकवून निद्रा देवी च्या आधीन झाली परतीच्या प्रवासात ती तिच्या स्वतःच्या छोट्या पण समाधानाच्या जगाकडे जात होती, मागे राहिलं होत ते फक्त “मृगजळ”

Avatar
About सागर जोशी 11 Articles
सागर जोशी हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक असून ते आम्ही साहित्यिक या फेसबुक ग्रुपचे सभासद आहेत. त्याच्या कथा अतिशय लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..