मृणाल सेन यांचा जन्म १४ मे १९२३ रोजी फरीदपूर जे आता बांगला देशात आहे तेथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण संपल्यावर १९४० साली त्यांनी आपले घर सोडले आणि कोलकता येथे शिक्षणासाठी आले तेथे त्यांना सगळेच नवीन होते , कोणी ओळखणारे नव्हते. त्यांचे शिक्षण स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये झाले. पुढे त्यांना कोलकता विद्यापीठाची पोस्ट ग्रॅजुएट डिग्री मिळाली परंतु ते विद्यार्थी असताना ते कम्युनिस् ऑफ इंडिया या पार्टीच्या संपर्कात आले . खरे तर ते या पार्टीच्या संपर्कात आपणहून आले नाहीत आले ते थिएटर अससोसिएशनमुळे त्यांच्या संपर्कात आले . कोलकत्यात आल्यावर त्यांनी इंपिरिअल लायब्ररीमध्ये म्हणजे आताच्या नॅशनल लायब्ररी मध्ये खूप पुस्तके वाचायला सुरवात केली.
त्यावेळचा कालखंड तसाच होता दंगली चालू होत्या , चळवळी चालू होत्या. त्यांनी युरोपचा इतिहास , नाटके , तत्वज्ञान सर्वच प्रकारची पुस्तके वाचायला सुरवात केली. परंतु त्यांना दिशा नव्हती, ते सर्वच प्रकारची पुस्तके वाचत असत परंतु सिनेमावर पुस्तके वाचली नव्हती. त्यांनी पहिल्यांदा एक स्क्रिप्ट लिहिले अर्थात ते चांगली स्क्रिप्ट नव्हती. त्यांना ते कसे लिहावयाचे हे माहीतही नव्हते परंतु त्यांचे दोन-तीन मित्र होते त्यातले सलील चौधरी आणि ऋषिकेश मुखर्जी त्यातले ह्रषिकेश मुखर्जी फक्त सिनेमाक्षेत्रात होते. त्यांनी शूट करायचे ठरवले. मुखर्जी यांनी एक साधा शूट करण्यासाठी १६ एम एम कॅमेरा शोधला एक कॅमेरामन मित्र होता तो फारसा चांगला नव्हता , सलील चौधरीना संगीत कसे द्यायचे हे नीट माहीत नव्हते ऋत्विकला पण डायरेक्ट कसे करायचे नीट माहीत नव्हते .मृणाल सेन यांनाही शॉटच्यावेळे स्क्रिप्ट कसे करायचे हे माहीत नव्हते. तिघेही नवीन होते. त्यांनी त्यावेळच्या राजकारणावर छोटी फिल्म बनवली . एकदा ते आपल्या तापोष ह्या मित्राबरोबर सिगरेट प्यायला गेले असताना तिथल्या पानवाल्याने त्यांना सावध करून सांगितले पोलीस तुम्हाला शोधत आहेत. मृणाल सेन यांनी स्क्रिप्ट जाळून टाकले. नंतर घरी पोलीस आले तेव्हा त्यांना काही मिळाले नाही.
तापोष ह्याला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट होता तर ऋत्विक घटकला थिएटरमध्ये , हृषिकेश मुखर्जी हे खरे फिल्म मेकर होते. मृणाल सेन त्यांच्या संपर्कात आले . त्यावेळी सत्यजित रे फिल्म बनवत त्या लो बजेट फिल्म बनवत कारण तितके पैसेही नव्हते. मृणाल सेन यांना एक निर्माता मिळाला परंतु त्याचे म्हणणे होते सत्यजित रे यांच्या ‘ पाथेर पांचाली ‘ नंतर रिलीज करू. पाथेर पांचाली बघीतल्यानांतर मृणाल सेन यांना कळले की फिल्म बनवणे म्हणजे काय . ते म्हणतात सत्यजित रे यांच्यामुळे मला खूप शिकायला मिळाले. मृणाल सेन यांचा पहिला चित्रपट होता ‘ रात भोर ‘. चित्रपट १९५५ साली रिलीज झाला. त्या चित्रपटात उत्तम कुमार होता, त्यावेळी तोही नवा होता. परंतु तो चित्रपट चालला नाही. मृणाल सेन यांचा दुसरा चित्रपट होता ‘ नील अक्षर निचेय ‘ ( अंडर द ब्लू स्काय ) . ह्या चित्रपटाचे स्थानिक प्रेक्षकांनी स्वागत केले परंतु त्यांच्या ‘ बैशिए शिरवन ‘ ह्या चित्रपटाने त्यांची जागतिक स्तरावर चर्चा झाली . ह्या चित्रपटाचा खरा विषय होता ‘ ज्या दिवशी रवीन्द्रनाथ टागोरांचा मृत्यू झाला ‘ . मृणाल सेन यांनी त्यानंतर पाच चित्रपट केले . त्यांनतर त्यांनी ‘ भुवन शोम ‘ चित्रपट तयार केला आणि त्याला भारत नव्हे तर जगभर त्याची चर्चा झाली कारण त्या चित्रपटापासून भारतात ‘ नवीन सिनेमा ‘ ची लाट निर्माण झाली असे म्हटले जाते.
त्या कालखंडात कोलकता येथील राजकीय परिस्थितीचे पडसाद त्यांच्या अनेक चित्रपटातून उमटले. त्याच्या गंभीर चित्रपटातून एक वेगळाच संदेश गेला की आपल्याला बाहेरच्या शत्रूपेक्षा आतल्या शत्रूशी लढायांचे आहे. जे शत्रू मध्यमवर्गात आहेत . हे त्याच्या चित्रपटामुळे जगाला कळले. त्यांची कर्मभूमी ही कोलकता होती ते शहर त्यांना प्रेरणा देत होते , इन्स्पायर करत होते. त्यामध्ये तेथील लोकांचे राहणीमान , जीवनपद्धती, जाती-वर्ण व्यवस्था हे सगळे दिसत असे. मला वाटते आपल्या समाजाचे चित्र जेवढे बंगाली चित्रपटात आले आहे तितके क्वचितच त्यावेळच्या चित्रपटात आले असेल . आज ह्या घडीला आपला मराठी चित्रपट राष्ट्रीय , जागतिक स्तरावर जसा नव्या दमाने वाटचाल करतो आहे तशी परिस्थिती कोलकत्यात सत्यजित रे , मृणाल सेन आणि रंगमंचावर ऋत्विक घटक यांनी निर्माण केली होती . चित्रपटांना सामाजिक भान येणे अत्यंत महत्वाचे असते. मृणाल सेन हे दोनदा मास्को इंटरनॅशनल फेस्टिव्हल ज्युरी म्हंणून राहिले आहेत तर बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ज्युरी म्ह्णून राहिले आहेत. मृणाल सेन हे सतत आपल्या चित्रपटासाठी प्रयोगशील राहिलेले आहेत ही प्रयोगशीलता बाजारू केव्हा कधीच सवंग नव्हती. कारण प्रयोशीलतेच्या नावाखाली बरेच काही घडते किंवा घडवले जाते. वयाच्या ८० व्या वर्षी म्हणजे २००२ साली त्यांनी ‘ आमार भुवन ‘ नावाचा चित्रपट केला. मृणाल सेन यांच्या चित्रपटांना कान्स , बर्लिन, मॉस्को , मॉंट्रिअल , चिकागो आणि कैरो येथील चित्रपट महोत्सवात सन्मान मिळालेले आहेत , अवॉर्ड्स मिळाली आहेत. मृणाल सेन याना इतकी जगभरातून अवॉर्ड्स मिळाली आहेत त्याची यादी काढायची झाली तर खूप मोठी होईल. त्याच्या अवॉर्ड्स मिळालेल्या चित्रपटांची नावे भुवन शोम , चोरस , मृगया , अकलेर संधने , कलकत्ता ७१ , खरजी , पूनासचा , आकाश कुसुम , अंतरेंन , ओका ओरी कथा , परशुराम , एक दिन प्रतिदिन ,खंडहर , एक दिन अचानक ह्या चित्रपटांना वेगवेगळ्या कामाबद्दल अवॉर्ड्स मिळली आहेत. मृणाल सेन यांनी अनेक डॉक्यूमेंटरीज बनवल्या आहेत. मृणाल सेन याना १९७९ साली पदमभूषण अवॉर्ड मिळाले , तर २००५ साली दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाले .
२०१७ साली त्यांच्या पत्नी गीता शोम यांचे निधन झाले . त्यानंतर 30 डिसेंबर 2018 मध्ये त्यांचे कोलकता येथे निधन झाले.
– सतीश चाफेकर.
Leave a Reply