कर्नाटक आणि आंध्रप्रदेशाला लागून असलेल्या दक्षिण महाराष्ट्रात बहुसंख्येने वसलेल्या व प्रामुख्याने विणकर व्यवसायात असलेल्या पद्मशाली समाजाचे आराध्य असलेले महर्षी भृगु आणि त्याच कुलपरंपरेतील मार्कंडेय ऋषी आणि भावना ऋषी यांच्यावर प्रा. विजय गोविंदराव यंगलवार यांनी अभ्यासपूर्ण लिहिलेल्या तीन नव्या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच नागपूरच्या नचिकेत प्रकाशनने केले आहे. महर्षी भृगु, मृंत्युजय मार्कंडेय ऋषी आणि वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी नावाची ही तीन पुस्तके केवळ पद्मशाली समाजच नव्हे तर अन्यही समाजातील वाचकांच्या पौराणिक, सामाजिक आणि ऐतिहासिक माहितीत भर घालणारी आहेत.
आपल्या समाजाचे आपण काही देणे लागतो ही जाणीव खरे तर प्रत्येक माणसात आणि विशेषत: प्रत्येक शिक्षित माणसात असावयास हवी, पण दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. त्यामुळे विविध रंगी, विविध ढंगी भारतीय समाजजीवनातील अनेक शाखांचा इतिहास, कर्तृत्व, परंपरा यांची माहितीच काय, अस्तित्व देखील नामशेष झालेले आहे. पण प्रा. यंगलवार यांनी प्रकर्षाने ही जाणीव ठेवून पद्मशाली समाजाचा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. पद्मशाली यशोगाथा या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने पद्मशाली समाजाच्या सखोल अभ्यासाचा वसा घेतलेल्या प्रा. यंगलवार यांनी, त्या दिशेत पुढचे पाऊल टाकताना महर्षी भृगु मृत्युंजय मार्कंडेय ऋषी आणि वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी या तीन पुस्तकांची एक मालाच जणु समाजपुरुषाच्या गळ्यात टाकली आहे. अशा विषयांवर मान्यवर विद्वान लेखकांकडून मुद्दाम लिहून घेऊन ती पुस्तके प्रकाशित करून ही माहिती हे ज्ञान संपूर्ण समाजापर्यंत नेण्याचे जे धोरण नचिकेत प्रकाशन राबवित आहे त्यासाठी त्यांंचे अभिनंदन केले पाहिजे आणि अन्य समाज पुरुंषावरही त्यांच्याकडून अशीच पुस्तके प्रकाशित होतील. अशी अपेक्षा करू. या ही तीनही पुस्तके अतिशय उत्तम, दर्जेदार व देखणी झाली आहेत. सर्वच मुखपृष्ठ आकर्षक आहेत. दर्जेदार पुस्तकाची परंपरा नचिकेत ने कायम राखली आहे.
महर्षी भृगु यांची कुलपरंपरा फार मोठी आणि कर्तृत्वान वंशजांनी युक्त असली तरी त्यात अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते त्यांचे पणतू मार्कंडेय ऋषी यांचे. भृगुंचे नातू मृकंड यांना मोठ्या तपश्चर्येनंतर भगवान शंकराच्या प्रसादाने झालेला हा मुलगा दिगंत कीर्तीवान ठरला. तेजस्वी व कर्तृत्वान मुलगा हवा असेल तर तो केवळ सोळा वर्षेच जगणारा मिळू शकेल, असे भगवान शंकराने वर देतांना म्हटले, तेव्हा मृकुंड-पत्नी मरुध्वती हिने मोठ्या आनंदाने तो मुलगा मागून घेतला. मात्र पुढे या मार्कंडेयाने तपोबलाने व वशिष्ठ आणि ब्रह्मदेवाच्या कृपेने मृत्यूवर मात केली आणि दीर्घायुष्य प्राप्त केल. ते मृत्युंजय ठरले, अशी पुराणात कथा आहे. चिरंजीव असलेल्या मार्कडेयांचे सर्व विषयांवरील ज्ञान आणि संशोधन विलक्षण आहे. या पुस्तकात लेखकाने त्याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. याशिवाय प्रसंगानुरूप त्यांनी रचलेले मृत्युंजयस्तोत्र, पितृपीडानिवारक स्तोत्र, त्यांनी केलेली नर्मदा परिक्रमा, भविष्यवर्णन यांचीही माहिती लेखकाने यात पेरली आहे. मार्कंडेय ऋषींची ग्रंथसंपदा, त्यांनी विविध प्रसंगानुरूप भेटी दिलेल्या स्थानांची माहिती, तेथील दिनविशेष व कार्यक्रम आदींची माहितीही प्रा. यंगलवार यांनी दिली आहे. या पुस्तकात विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या मार्कंडा या शिव-तीर्थांची आणि तेथून जवळच असलेल्या आमगाव (महाल) येथील दोन दुर्लक्षित मार्कंडेश्वर मंदिरांची विस्तृत माहिती देखील दिली आहे. भारतीय पौराणिक साहित्यामध्ये जी 18 पुराणे आहेत, त्यात एक अतिशय महत्वाचे असे मार्कंडेय पुराण देखील आहे. मार्कंडेय ऋषींचे पौराणिक महत्व विशद करण्यासाठी याहून अन्य दाखल्याची गरज भासू नये.
पृ. 122 किं. 120
मृत्युंजय मार्कंडेय ऋषी : प्रा. विजय यंगलवार
पृ. 122 किं. 120 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
मो. : 9225210130
मृत्युंजय मार्कंडेय ऋषी : प्रा. विजय यंगलवार
पृ. 122 किं. 120 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
मो. : 9225210130
मला हे पुस्तके घ्यायची आहेत