नवीन लेखन...

मृत्युंजय

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारूकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

हा झाला महामृत्युंजय मंत्र . अर्थ हा की तीन नेत्र असलेल्या भगवान शिवाला आम्ही नमन करतो, आमचे शरीर सदैव सुगंधयुक्त धष्टपुष्ट राहो . ज्याप्रमाणे पुर्ण पिकल्यानंतर खरबूज आपणहून झाडाच्या फांदीपासुन वेगळे होते, तद्वतच आमचे समृध्द जीवन सुख ,समाधानपुर्ण व्यतीत झाल्यानंतर , आम्हाला बिना कष्टाच्या मृत्यु उपरांत अमरत्व ,मोक्ष प्राप्त होवो. “मृत्युंजय मंत्र” हा फार प्रभावशाली अाहे असे जाणकार सांगतात व जेव्हा कोणी व्यक्ती शारिरीक प्रकृतीच्या गंभीर स्थितीत असतो तेव्हा ह्या मंत्राचा जवळच्या माणसाने जप केला तर बरेचदा मनुष्य मृत्युच्या दाढेतून बाहेर येतो असा अनुभव सांगतात.

मृत्युंजयाय रूद्राय, नीलकंठाय शांभवे ।
अमृतेशाय सर्वाय, महादेवाय नमो नम: ॥

हा मृत्युंजय मंत्र पण बरेच जण म्हणतात. ह्यांत पण मृत्युंजय, रूद्र, नीलकंठ, शंभो, अमृतेशाय नावांनी ओळखल्या जाणार्या महादेवाला आम्ही नमन करतो असा भावार्थ आहे परंतु मृत्युशय्येवर असणार्यासाठी असे विषेश भाष्य नाहीय. जीव जंतुंचे निर्माण, निर्वहन व निवृत्ती करणार्या, क्रमश: ब्रम्हा, विष्णु व महेश या त्रिदेवातल्या निवृत्त करणार्या ( विनाश ) महेशाची महती मंत्राद्वारे केली गेली आहे.

“मृत्युंजय “ ह्या शब्दाचा अर्थ सहसा मृत्युवर विजय मिळवणारा किंवा मिळवलेला असा होतो . डाॅक्टर ज्याप्रमाणे गंभीर पेशंट असला तरी आटोकाट प्रयत्न करतात पण गॅरंटी देत नाही किंबहुना देऊच शकत नाही, तसेच या बाबतीत म्हणावे लागेल. शेवटी सारे काही जसे नियतीने ठरवले असेल तसेच होते,परंतु श्रध्दापुर्वक मंत्राचाही एक प्रयत्न करण्या जोगा असतो . न जाणो, बुडत्याला काठीचा आधार तसे. मंत्राचा एकदा सुदैवानी उपयोग झाला तर पुढचे वेळी पुन्हा होईल किंवा असेच चालु राहुन कोणी अमर होईल असा ऐहिक अर्थ मुळीच नाही.मंत्र काही अमरत्व देत नाही. जगांत सात चिरंजिवी आहेत असे म्हणतात, त्यांच्यासाठी देवाने विशेष प्रावधान केले असले पाहिजे अन्यथा , मानवी अवतार घेऊन आलेल्या देवांनाही मृत्युला कवटाळावे लागलेच. कदाचीत सती सावित्री सारखी एखादीच मृत्युला थोपवु शकणारी भाग्यवान असावी. तिने आपल्या हुशारीने यमदुताला निरूत्तर करून,  सत्यवानाला जीवीत करायला भाग पाडले अशी आख्यायिका आहे. त्यावेळी duty वर आलेला  यमदुत पण साधा असेल, नाहीतर त्याने म्हटले असते “तुझ्या सासर्यांना नातवंड हवी आहेत तर दत्तक घ्या म्हणावं “ . त्याला शिवशंकराने  स्पेशल पावर्स पण दिल्या असतील कदाचीत ! आरोग्याची देवता ‘सुर्य’ म्हणुनच चांगले आरोग्य ठेवण्याकरता अग्निहोत्र करताना आपण सुर्य नारायणाला सकाळी – सकाळी पुजतो ( सुर्याय स्वाहा , सुर्याय इदम्  न मम् ) कारण सर्व जिवात्म्यांना तोच सगळी शक्ती देतो , अर्थात “सरोगमुक्तोदीर्घायु: मुखं पुष्टिं च विन्दति “ ही झाली फलश्रृती . “ॐ सूर्यपूत्राय विघ्नहे।महांकालाय धीमहि।तन्नो यम: प्रचोदयात।ही गायत्री हेच सांगते की सुर्यपुत्र म्हणजेच यमराज. हे दोघ मिळुन जणु , पुर्ण विश्वाची ‘inventory maintain ‘ करतात. पृथ्वीवरील लोकसंख्येचा balance जरासुध्दा बिघडतां कामा नये ही जबाबदारी शिवशंकरानेच त्यांना दिलेली .नवीन जीवात्म्यांना पृथ्वीतलावर जागा करुन देण्यासाठी जुन्यांना जावे तर  लागणारच .” भुईला  भार नको “ म्हणतात ते त्यामुळेच !

मृत्युनंतर पुढे काय असेल हा स्वाभाविक प्रश्न सर्वांच्याच मनांत  येतो. एक पर्याय वाटतो तो म्हणजे पुनर्जन्म. आत्मा देहाला सोडुन गेला की तो तीन दिवस त्याच वास्तुत घुटमळत असतो अशी एक मान्यता आहे. त्यामुळेच त्या जागी तीन दिवस दिवा लावुन ठेवतात व अलिखीत नियम म्हणुन गेलेल्या माणसाबद्दल सहसा चांगलेच बोलतात अन्यथा त्याला पुढच्या प्रवासावर ( पीतर लोक ) जायला त्रास होतो. कर्मकांडा चे पुर्ण विधी झाल्यानंतर आत्मा दुसर्या योनीत पुन:र्जन्म घ्यायला मोकळा होतो असा बहुतेक धर्मसिंधु त उल्लेख आहे . ह्या संबंधात डाॅक्टर ब्रेन वीस ( Dr Brian Weiss ) Psychiatrist यांनी “ Many Lives,Many Masters “ या त्यांच्या “past life regression “ वर आधारीत पुस्तकांत, त्यांनी  “केथेरीन नावांच्या तरूण मुलीवर तिच्या मानसिक रोगावर “ उपचार म्हणुन आठ -दहा सेशन्स मध्ये तिला hypnotise करुन  multiple past lifetimes मध्ये नेऊन तिच्याकडुन पुर्व जन्मांच्या मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करुन  पुर्ण बरे केले ,त्या संबंधी पुर्ण विवरण दिले आहे. त्यात तिने दिलेली मागील जन्मांची माहिती ( जसे स्थान ,काळ,पत्ता,नांवे फॅमिली माहिती वगैरे ) note करुन ती available history च्या माहितीशी पडताळुन बघितली व पुनर्जन्मावर शिक्कामोर्तब केले आहे असे म्हणायला हरकत नाही . कमकुवत मन नसणार्यांसाठी ते पुस्तक खुप वाचनीय आहे. जन्म व मृत्यु अशा घटना आहेत की जन्माच्याच वेळेला त्या व्यक्तीचा मृत्यु केव्हा हे निश्चीत झालेले असते. पाचवीच्या पुजेच्या वेळी ‘सटवी’ ते  लिहुन ठेवते असा समज आहे. ( फक्त आपल्याला ते माहित नसते ) . जन्माला येताना खुप कष्ट पडतात  जन्मदात्री ( नऊ महिने ) व अर्भक  दोघांनाही परंतु मृत्यु हा कोणालाही एका क्षणात येतो ( कुणा कुणाला मात्र खुप कष्ट सोसावे लागतात, ती गोष्ट वेगळी ) . मृत्युच्यावेळी माणसाला नेमके काय वाटते ते सहसा कळत नाही. टाटा कॅंसर हाॅस्पिटल मधल्या कुणा एका प्रसिध्द डाॅक्टरानी खितपत पडलेल्या बर्याच पेशंट शी अंतीम क्षणी, Occupetional therapy चा एक भाग म्हणुन ,हळुवार पणे संवाद साधला. त्यांना असे दिसुन आले की बहुतेकांना केलेल्या काही गोष्टींचे वाईट वाटुन पश्चाताप होत होता पण आता ते काही करु शकत नव्हते याची हळहळ सुध्दा वाटत होती. एकदमच कॅंसर ने , न  कळत घेरले अन्यथा त्यांना बरेच काही करायचे होते तसेच कोणी कोणी त्या क्षणी  संबंधितांना माफ करायची इच्छा प्रतिपादली ,असे मध्यंतरी माझ्या वाचण्यात आले. ह्या संबंधात बरेच लेख उपलब्ध आहेत .ब्रम्हकुमारी ज च्या प्रसिध्द मेंटर, बी के शिवानी सुध्दा पुनर्जन्माच्या ,तेही मानव जन्माच्या,पुरस्कर्त्या दिसतात.त्यांच्यामते आपण blank किंवा pre-recorded संस्कार घेवुन जन्माला येतो आणी आपल्या व आपल्या सभोवतालच्या माणसांमध्ये सतत विचारांच्या लहरींच्या माध्यमांतुन ( रेडिएशन म्हणा ) सदिच्छा, दुर्भावना, प्रेम अशा भावनांचे आवागमन होत असते व त्यांचा सततचा प्रभाव इतरांबरोबर आपल्या स्वत :वर पण ( reflection ) होत असतो.जितके संस्कार पुर्वजन्मीचे असतात त्याहुन किंबहुना जास्तच आपण न कळत घडवत असतो. मुळत: सगळ्यांचा आत्मा बिना पुर्वग्रहाचा, शांत , प्रेमळ असतो व तो चिंतन करुन प्रयत्नपुर्वक तसाच टिकवला पाहिजे , तरच तो ( आत्मा ) शरीर सोडताना “परब्रम्ह” तत्वात विलीन होईल व जन्म- मृत्युच्या चक्रातून सुटेल !

वर उल्लेखिल्याप्रमाणे, भुतलावर अविनाशी असे कोणीच नाही म्हणजेच मृत्यु हा जन्माइतकाच निश्चित  आहे . जन्म आपल्या हातचा नाही तसाच मृत्युपण आपल्या हातचा नाही. तो कुठे, केंव्हा व कसा येईल हे गुलदस्त्यात ठेऊन देवाने जणु आपल्यावर उपकारच केलेत.माझे काॅलेज मध्ये एक मित्र कम सहचारी होते जे पट्टीचे पत्रीका जोतिष्य पाहाणारे होते.त्यांना  एका मित्राने दुसर्या एका मित्राची पत्रिका पाहायला सांगितली .त्यांनी टिपण सांगितले पण ह्या मित्राने त्या दुसर्या मित्राच्या मृत्युची तारीख सांगायलाच गळ घातली.ज्योतिष्य शास्त्रात  हा अलिखीत नियम आहे की कोणी कितीही ,काही ही अमिष दाखवले तरी  कोणाच्या मृत्युबद्दल काही सांगायचे नाही. शेवटी त्यांनी तारीख सांगितली.ज्यांची पत्रिका दाखवली होती ते हिंदु नसल्याने त्यांचा विश्वास नव्हताच व त्यांना त्याबद्दल काही सांगितले पण नाही पण दुर्दैवानी तारीख खरी ठरली. ह्यात बरेचसे buts & nots असले तरी कोणी चुकुन सांगितली असती तर ते शाॅकने च जाण्याची शक्यता नाकारतां येत नाही. मृत्यु निश्चीत असला तरी घटना अनिश्चित असल्याचा “फायदा” च म्हणावा लागेल .

एकदा एका राजाला ज्ञानी भविष्यवेत्त्याने सांगितले की त्याला सर्पदंशाने मृत्यु येईल. मग काय राजाने वेगवेगळे उपाय केले, विशेष राजवाडा बांधला. परंतु राजा एकदा रथातून कुठेसा जात असताना ,वरुन साप तोंडात धरुन जात असणार्या घारीच्या तोंडातून साप निसटला, तो थेट राजाच्या अंगावर. अशा अनेक घटना ,काही गोष्टींमधल्या तर काही खर्याखुर्या  सांगतां येतील. माझे एक (८०-८२वर्षांचे )परिचीत नागपूरला राहायचे.त्यांनी कुठल्याही कारणास्तव पंधरा- वीस वर्षे नागपुर सोडले नाही कारण त्यांना मृत्यु नागपुरांतच हवा होता .हरिद्वार,काशी,गया इथे जाऊन राहाणारे लोक तर ऐकले होते,कारण तिथे मरण आल्यास सरळ मोक्ष मिळतो असे म्हणतात. हा झाला एक प्रकारचा इच्छामृत्यु,ज्यांत मृत्यु इच्छीत जागी येईल. खरा इच्छामृत्यु तो, ज्यांत माणसाला “ असहनीय शारिरीक क्लेश, दुरुस्त होण्याची संभावना बिलकुल च नाही हे कळल्यावर “ जगायची इच्छा नसल्यास त्याला सोप्या पध्दतीने मरण्यासाठी परवानगी देणे. काही देशांत ते कायदेशीर आहे पण आपल्याकडे मात्र कोर्ट, डाॅक्टर ,वकील करण्यात इतके नाकी नऊ येतात की कोणी म्हणेल नको तो मृत्यु ! एका परीने, हे आवश्यक पण आहे कारण परिस्थिती चा कोणी गैरफायदा ( जसे: पेशंटचा कंटाळा येणे,घरदार,मालमत्ता यांचा मोह ) घेऊ नये म्हणुन. सुवर्णमध्य कसा काढता येईल ही खरी तारेवरची कसरत होईल . रोग, मग तो कोणचा कां असेना वाईटच पण काही मात्र असे असतात की ऐकणार्याला धडकीच भरते. माझे परिचीत एक मित्र होते त्यांना कॅंसर झाला होता.आम्हाला त्यातले विेषेश समजत नसल्याने माझ्या डाॅक्टर बहीणीला विचारले, तर ती म्हणाली , हा चांगल्या प्रकारचा कॅंसर आहे, आता कॅंसर तो कॅन्सरच ,म्हणायचा अर्थ हा होता की बरा व्हायचे chances खुप असतात व मनुष्य खिचपत पडत नाही.देवाने विचारले तर हाच मागावा. दुर्दैव हे की तिलाच कॅंसर झाला, तो पण कष्ट देणारा व त्यातच ती गेली,अर्थात डाॅक्टर म्हणुन तिला कल्पना आली होती व तिने हिंमतीने  तोंड दिले,कोणाला भासु दिले नाही की ती काय त्रास सहन करतेय !

मृत्यु म्हटला की सर्व सामान्यांना भिती वाटणारच . माझ्या वडिलांना मृत्युची भिती वगैरे कधी वाटायचीच नाही. ते म्हणायचे कोणी पैज लावली तर मी एकटा रात्री स्मशानात जाऊन झोपून दाखवतो, कोणी रात्री येऊन चेक करू शकता मुख्य म्हणजे त्यांची झोप पण  खुप सावध असे. दीड-दोन फुट रूंदीच्या उंच भिंतीवर सहजपणे झोपायची त्यांची तयारी असे,तसेच ८०-८२ व्या वर्षी पाण्यावर तास न तास पडुन राहायची( floating ) तयारी असे. ते खरोखरीच पोहायला पण लागले होते शेवटी आम्हीच त्यांना १५-२० मि.नंतर म्हटले बस झाले आता.त्या काळी ,छोटेसे गांव म्हणुन सगळे ब्राम्हण समाज ओळखीचे,त्यामुळे कोणी पण गेलेले कळले की ,खांदा द्यायला जायची पंध्दत होती. ते सत्कर्म समजले जायचे.(आम्हा मुलांना भिती वाटायची ). स्मशानांत जाऊन आले की एक प्रकारचे तत्कालीक वैराग्य येते.( लोक चेष्टेच्या गप्पा मारायचे की आता कोण नंबर लावत रे ? वगैरे.) त्यामुळे असेल कदाचीत, पण वैराग्यात राहुन,संसार करायचा म्हणजे कसरतच. त्यानी एक प्रकारची स्थितप्रज्ञ ता येते,ती त्यांच्यात होती. सुखाने ह्रुरळुन जायचे नाही व दुःखाने खचुन जायचे नाही- समत्व भाव.देवाला ते कधी काही मागायचे नाही, मनांत म्हणायचे तु योग्य ते देतोसच,असेच मन ,बुध्दी राहु दे ,बस झाले. माझे वडील ९० वर्षाचे पुर्ण शुध्दीत गेले, तेव्हा माझा हात त्यांच्या हातात होता. ते इंग्लीश मध्येच म्हणाले” I have lived my life,happily.मला कशाची खंत नाही .पुनर्जन्म असतो की नाही माहित नाही पण असलाच व देवाने जर मला पर्याय दिला तर मी तुम्हा सर्वांनाच मुले म्हणुन व काकुला( आम्ही आईला काकु म्हणत असु ) बायको म्हणुन मागुन घेईन .( हे शक्य नाही हे माहित होतेच पण बोलुन तेवढाच दिलासा ).मी जातो आहे कोणी रडायचे नाही,प्रत्येकालाच एक ना एक दिवस जायचेच आहे.”इतके बोलुन ,त्यांच्या हातातुन माझा हात सुटला.सारे क्षणात संपले. माझे एक डाॅक्टर मित्र ,त्यांचे वडिल पण डाॅक्टर होते.ते वृध्दावस्थेत असताना काहीश्या निमित्ताने दवाखान्यांत भरती होते व वेंटीलेटर वर होते.काही दिवस गेल्यावर ते एक दिवस सकाळी म्हणाले, माझे वेंटिलेटर काढुन टाका.मला रामरक्षा म्हणु द्या, त्यांनी ती म्हटली, पुर्ण झाली व प्राण सोडले. असेही पुण्यात्मा असतात.

आता समजा आपण खुप पुण्य कर्म केले व खुष होऊन देवाने म्हटले तुला भिष्माचार्यांसारखा “म्हणशील तेंव्हा “असा तर नाही, पण म्हणशील तसा तुझ्या इच्छेनुसार मृत्यु देईन. बोल कसा मृत्यु हवा ?विचार करा, किती मुश्कील होईल ! कॅंसर ,टी बी मागाल?नाही रे बाबा,जबरदस्त ऐक्सिडेंट? अं हं ,पाण्यांत बुडुन ? नको रे बाबा, बर्नींग ? छे ,हार्ट अटॅक ? बाप रे , पुन्हा लोक ICU मध्ये नेतील व तेच नाटक, झोपेत ?कळलेच नाही तर मनाची तयारी काय करणार?बर तयारी करायला वेळ दिला तर ?गावाला जायची तयारीच तर जाईपर्यंत होत नाही मग.. …तर एकुण काय, काहीच सांगु शकत नाही.खरी तयारी आधीपासुनच हवी. आपले सगळे जीवन कधी स्थिर ( static) नसते, अस्थीरता (dynamic ) म्हणजे परिस्थिती बदलतच राहाते , म्हणुन म्हणतात आपण उद्याच जातो आहे असे समज़ुन ,सदैव तयारच असावे. मग विनोद करायचा झाला तर उद्याचे प्लॅनिंग तर करताच येणार नाही ! पांडवांच्या राज्यांत एका याचकानी मदतीसाठी महालासमोर ची  घंटा वाजवली,अर्जुन गेला व म्हणाला तुझी समस्या उद्या सोडवीन.लगेच धर्मराज( युधिष्ठीर ) आला व म्हणाला अरे,तु कसे गृहित धरलेस की तु उद्या जिवंत राहाशील ? म्हणतात नं, कल करे सो आज,आज करे सो अब !

आम्हा मुलांना लहानपणी मात्र मृत्युची चांगलीच भिती वाटायची. कारणे पण तशीच होती,न्यायच्या वेळीचे विधी,रडारड,शोकाकुल स्थिती, केविलवाणी लहान मुले, भेटायला येणारे, तेच तेच प्रश्न, तीच उत्तरे,एकुण परिस्थिती च असाधारण व भितीदायक. तेंव्हा गावांहुन येणार्यांची वाट पाहाण्याची पध्दत नव्हती,साधारण नातेवाईक स्थानिक ,जवळपासचे च असायचे. खांदा द्यायला चार जण नक्कीच मिळायचे. त्यामुळेच म्हणायचे” नीट वाग,खांदा द्यायला निदान चारजण तरी आले पाहिजे”.स्मशानात बायका जात नसतं ,परिस्थिती पण विचीत्र, लाकडे जमवा,ती पंण पेटली पाहिजे,मंत्राग्नी साठी गुरुजी,डाॅक्टरांचे सर्टिफिकेट मिळवणे सगळेच हताश करणारे. मग प्रभातफेरी सारखी मिरवणुक, सोलापुर कडे वगैरे तर बसवुन नेतात तेही पैसे फेकत व वाजत गाजत.त्या काळी वाईट मनुष्य मेला तर भुत बनतो ही समजुत होती.

एकुण मृत्यु व त्या घटनेभोवती एक दुःख वजा” भितीदायक वलय” सतत असायचे.त्यामुळे नांव काढले तरी पोटात गोळा येतो व हातापायातील शक्तीच जाते.नंतर “डेथ सर्टीफिकेट “वगैरे तर वैताग आणणारे असायचे.आम्ही नागपूरला जाताना आमच्या पुतणी (डाॅक्टर) कडे जबलपुरला तिच्या पी जी होस्टलला उतरायचो. तिच्या मैत्रिणी वगैरेंच्या गप्पा म्हणजे “आज तुने कितनी “डी सी “ काटी रे? डी सी म्हणजे डेथ सर्टिफिकेट.! किती आरामात त्या बोलायच्या,आम्ही स्टंट व्हायचो. मृत्युवर विजय मिळवणे शक्य नसले तरी “त्याभोवती असलेल्या भिती वजा वलया “वर मात्र परिस्थितीनुरुप  काही प्रमाणात विजय मिळवण्यात आला आहे असे आपण म्हणु शकतो.आजकाल सहसा पेशंटला दवाखान्यात लगेच ॲडमिट करतात, गंभीरता दिसत असली तर ICIU वगैरे क्रमप्राप्त असते.तिथल्या थंडगार हवामानात निमोनिया,मग complications,एकएक organs fail व्हायला मदतगार बनतात .मग वेंटीलेटर वगैरे . देव जसा दोष आपल्यावर काही घेत नाही तसे दवाखाने पण घेत नाहीत.तुमच्याकडुनच transperancy च्या नावांवर मत घेऊन वाटचाल चालु ठेवतात . व्हेंटिलेटर चालु ठेवले तर त्यांचे बील वाढत असते,त्यांना फरक पडत नाही, against medical advise तुम्ही पेशंटला घरी नेत नाही,शेवटी आपल्याला व्हेंटिलेटर काढा वगैरे अशी हालचाल करावी लागते,व “पेशंट” चे रूपांतर “बाॅडी” त केंव्हा होते कळत पण नाही. कोणी जवळचा नातेवाईक यायचा असतो ( आजकाल मुल,मुली बरेचसे US ला किंवा परदेशी असतात) त्यांची वाट पाहायची म्हणजे दिवसभर बाॅडी घरांत ठेवायची तर पुर्ण वातावरणच केविलवाणे होते, त्यामुळे बाॅडी हाॅस्पिटलला माॅरचुरीत च ठेवतात.मृत्यु घरी झाला असला तरी कधी कधी बाॅडी माॅरचुरीत नेऊन ठेवतात.( सर्टिफिकेटचा प्रश्न वेगळा )आजकाल फ्लॅट प्रथा म्हणुन जागा कमी, लिफ्ट छोटी, ने आण समस्या व स्वत:ची पार्कींग जागा असतेच ( सोसायटीने खुप पैशात दिलेली ) म्हणुन सगळे विधी खाली रिकाम्या पार्किंग जागेत नाहीतर काॅमन जागेत उरकता येतात. भेटायला येणार्यांना आॅफीस घाई म्हणुन खालच्या खाली परततां येते. शेवटपर्यंत पोहचवणारे कमीच असतात ते गाड्यांनी जातात म्हणजे फटाफट वापस जाता येते.मोठ्या शहरांमध्ये शववाहिका म्हणुन मोठ्या गाड्या ठेवल्या असतात , ते सोईचे होते. अग्नी ऐवजी,इलेक्ट्रीक दाहगृह म्हणुन तिथले काम लवकरच होते .एकंदरीत काय तर जणु मृत्यु सुटसुटीत झालाय.

क्रियाकर्म करण्याला एक पर्याय हल्ली प्रचलीत होऊ पाहातो आहे ,तो म्हणजे” देहदान”! तो स्वत:च विश्लेषणाचा एक वेगळा विषय होईल.तरी मृत्युशी निगडीत म्हणुन थोडक्यात त्यावर एक कटाक्ष टाकणे गैर होणार नाही.ह्यात दोन प्रकार येतात .एक विशिष्ट अवयव दान ,दुसरे संपुर्ण देहदान.त्यासाठी जो जातो त्याची जिवंत असतानाची तशी इच्छा व आप्तजनांची सहमती घेणे गरजेचे असते.मी या प्रकाराच्या विरोधात नाही पण पुरस्कृत करणारा पण नाही .शेवटी तो वैयक्तिक व्यक्ति व तिच्या सख्ख्या नातेवाईकांच्या भावनेचा कम धर्माचा प्रश्न असतो.तुमचा तुमच्या शरीरावर हक्क तुम्ही जिवंत असेपर्यंतच , तरीही तुम्ही आत्महत्या करू शकत नाही,आमरण उपास करू शकत नाही.मेल्यानंतर व्यक्तिच्या धर्मात सांगितले असेल तसे पार्थीवावर संस्कार केल्या जातात,अपेक्षा असते.तसा काय फरक पडतो म्हणुन आपण जवळच्या व्यक्तिला गाडु देऊ कां?सगळ्या औपचारिकता झाल्या असल्या तर नेत्र ( काॅर्निया ),किडनी,लिव्हर असे vital अवयव दान केल्या जाऊ शकतात,पण दान सत्पात्री होणार असेल तर ( कोणी विकुन पैसे कमवणार नसेल तर ) व बाॅडी विद्रूप झालेली जवळच्या माणसांना पाहणे सहन होणार असेल तर. मृत्यु जर घरी किंवा दवाखान्यात झाला नसेल तर सहसा पोलीस केस होते व पोस्टमाॅर्टम आवश्यक होते. त्यानंतर ते बाॅडी गाठोड्यात गुंढाळुन बांधुन देतात ते दृष्य पाहणे पण सुसह्य नसते.मी प्राचार्य असताना एका विद्यार्थ्याला तसे आणले होते तेव्हा मी पण हेलावुन गेलो होतो.पुर्ण देहदान केले तर आपल्याला पुढचे कळु शकत नाही ( गेलेल्याला तर तसाही फरक पडत नाही ) पण नंतर विचार केल्यावर बाॅडीचे शव विच्छेदन ( desection )केले जाते आहे ही कल्पना हलवणारी असते. जवळच्या नातेवाईकांमध्ये  पक्केपणा पाहिजे. अमुक अमुक मेडिकल काॅलेजमध्ये द्या ,अशी कंडीशन कशी टाकणार ? तुम्ही विदेशात असलात तर ?बारीक बारीक मुद्दे( intricacies )खुप असतात.वैदिक शास्त्राप्रमाणे “पार्थिव “हे अग्निला समर्पित केले जाते,( आहुती स्वाहा S )तसे कारण अग्नि हा देव असतो.”स्वाहा” हे अग्निच्या बायकोचे नांव आहे. कुठलीही आहुती स्वाहा च्या नावांनेच अग्निला दिली जाईल असा तिला“वर “मिळालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पार्थिव हे वाईट शक्तींच्या हातात जाऊ नये. अस्थी सुध्दा वाहत्या प्रवाहात विसर्जित केल्या जातात ,त्यामागचा पण हाच उद्देश असतो. कोणाचा त्यावर विश्वासच नसला तर गोष्ट वेगळी. जे शोकाकुल होतात वा दु:खी होतात ते तर होतातच पण वर उल्लेखिलेल्या सुटसुटीत पणा मुळे इतरांसाठी “मृत्युच्या भितीचे वलय “जरा हलके फुंलके  होते .किंबहुना भितीच्या वातावरणावर “विजय “ मिळवल्या गत होतो, म्हणुन  “मृत्युंजय “ हे शीर्षकाचे प्रयोजन.

वेगवेगळ्या तत्ववेत्यांनी, आपले शरीर जसजश्या  वेगवेगळ्या क्रिया करते तसेच मृत्यु ही एक सहज क्रिया आहे हे समजवताना, येणेप्रमाणे वेगवेगळ्या उपमा दिल्या आहेत .- –

  • मृत्यु म्हणजे एक वस्त्र बदलुन दुसरे घालणे.
  • मृत्यु म्हणजे एका गावांहून दुसर्या अनोळखी गावी जाणे.
  • मृत्यु म्हणजे एक गाडी( train ) बदलुन दुसर्या गाडीत बसणे.

हे सगळं म्हणणे  किंवा वाचणे सोपे वाटते पण दु:ख पचवण्याची वेळ ज्याच्या वर येते तोच काय ते जाणतो.

ह्या संदर्भात,आध्यात्मिक द्रृष्टीने, भगवतगीता, दासबोध,धर्मसिंधु ,वेद व उपनिषिधांमध्ये विवीध भाष्य सापडतात , ती अशी. .

  • मृत्यु म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन.
  • मृत्यु म्हणजे अडुसष्ट कोटी योनींच्या शेवटी ,पाप पुण्याची जाण असलेल्या मानवी जीवनाचे सार्थक करणे.
  • मृत्यु म्हणजे जन्म मृत्युच्या फेर्यातुन सुटका/ मोक्ष मिळवण्याची संधी.
  • मृत्यु म्हणजे पंचतत्वात विलीन होणे.
  • पण सगळ्यांचा मतितार्थ एकच .हे सर्व जो जितक्या लवकर समजेल व तशी वृत्ती बाळगेल त्याला तितकेच येणारी परिस्थीती मान्य करणे सुकर होईल. तसे झाल्यावर शेवटी मन कबुल करतेच की—.

“मी जाता ,राहील कार्य काय.?
जन पळभर म्हणतील हाय हाय !”

जेंव्हा ही हतबल झाल्याची स्थिती येते तेंव्हा आशेचा एकच किरण दिसतो ,तो म्हणजे दैवी शक्तीचा आधार. गुरूचरित्रात चौदाव्या अध्यायात म्हटलेच आहे की “ श्रीगुरुकृपा होय ज्यासी,कलिकाळाचे भय नाही” . श्री स्वामी समर्थ सुध्दा त्यांच्या तारक मंत्रात म्हणतातच- –

उगासी  भितोसी भय हे पळू  दे.।
जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे .॥
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा.।
नको घाबरु , तु असे बाळ त्यांचा.॥

— सतीश परांजपे 
९०२१७५८३०५

3 Comments on मृत्युंजय

  1. Dear Satishrao,
    The rice is highly engrossing and reflects on your vast reading and analysing the same in the present day context. It really covers all angles of Death and so also the post death factors. Likewise, I suggest please select the subject of Birth related to Atma and how the place, family etc are predetermined for particular Atma, since it is immortal, the accounting of it ( traffic control) is really an awesome matter. This whole philosophyical concept needs a research. Your article is very well written and is really praise worthy.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..