त्याला बोलता येत नाही, म्हणून ऐकताही येत नाही. पन्नाशीची उमर आहे. लिहिता येते फक्त नाव. सहीपुरते. खाणाखुणावर चालतो दैनंदिन व्यवहार. प्रपंचाची कसरत करतो. हा आमचा मित्र आठवतो. कारण म्हणजे अलीकडे पाऊस झाला. नदी वाहिली. दुष्काळझळा कमी झाल्या. वेदना कायम असल्या तरी. निसर्गाची कृपा झाली. डोहात पाणी साचले, म्हणून डोकावलो तेथे. भडभडून आले. जुने दिवस आठवले. म्हशी पाण्यात सोडायच्या. त्या डुंबायच्या. पोरांनी मनसोक्त पोहायचे. एकाएकी पोहता येत नाही, त्यासाठी सांगणार कुणीतरी असावं लागत. .तो बोलत नव्हता तरी पोहायचं कसं हे सांगत होता. पाण्याची खोली, प्रवाहाची दिशा, वापरावयाची साधने याची बित्तंबातमी त्याच्याकडे असे. मुलं डोहावर जमत. मनसोक्त पाण्यात सुळकी घेत. डोळे लाल होईपर्यंत. पाण्याची भीती नाहीशी झाली. ती या मित्रामुळं. त्याचं नाव बाळू सावंत. कोळवाडी, ता. शिरूरकासार, जि. बीड या गावचा. म्हणजे माझ्याच जन्मभूमीतील. अधून मधून तो सतत भेटतो. कधी बाजारात. कधी दुकानात. कधी जातो ऊसतोडीसाठी, कधी मजुरीने शेतात तसेच बिगारकाम करायलाही. मला पाहिले की हाती पेन, लेखनी धरल्याचा अभिनय करतो. माझ्याशी मूक संवाद साधतो. त्याला खूप आनंद होतो. हे त्याच्या देहबोलीतून जाणवते. हॉटेलात चहा होतो. मीदेखील न बोलता, हातवारे करत, चेहरा, तोंड-ओठ यातून त्याच्याशी बोलका संवाद साधतो. कोणत्याही वादळात उन्मळून पडायचं नाही. बस्स! हेच शिकायचं त्याच्याकडून.
-विठ्ठल जाधव,
शिरूरकासार,बीड
Leave a Reply