नवीन लेखन...

काळजाला हात घालणारा गायक : मुकेश

प्रत्येक व्यक्तीच्या घशात “व्होकल कॉर्ड’’ नावाचा अवयव निसर्गत: असतो. एक अत्यंत पातळ पापूद्र्या सारखा दिसणारा हा अवयव आम्हाला बोलताना किंवा गाताना मदत करत असतो. मी कुठे तरी वाचल्याचं आठवतं की लता दिदीनी आपल्या घशाचा विमा उतरविला आहे. कारण त्यांचा घसा हाच सर्वात महागडा असा अवयव आहे. निसर्गत:च आवाजाची देगणी अनेक कलावंताना लाभलेली असते मात्र प्रत्येक आवाजाचा एक विशिष्ठ पोत असतो. या पोतावरूनच आम्हाला सहज ओळखता येते की आवाज कुणाचा आहे. चित्रपटसृष्टीतल्या अनेक नामवंत गायक गायिकेचा आवाज म्हणूनच आम्ही सहज ओळखू शकतो. चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसविण्यासाठी अनेकजण येत असतात. पण अनेकदा त्याला जे व्हायचं असतं ते मात्र राहून जातं आणि त्याची वेगळीच ओळख तयार होते. लुधियानातील जोरावर चंद आणि चाँद रानी यांच्या पोटी जन्मलेलेल्या एका तरूणाचे काहीसे असेच होणार होते.

खरं तर दिसायला सुंदरच होता हा तरूण. ३०-४० च्या दशकातल्या चित्रपटातले अनेक नायक स्वत:ची गाणी स्वत:च गात कारण तेव्हा पार्श्व गायन पूर्ण रूजले नव्हते. याला गाताही येत असल्यामुळे नायक होण्याची महत्वकांक्षा होती यात गैर काहीच नव्हते. मोठी बहिण संगीत शिकत असतानां याला लहानपणीच संगीताची गोडी लागलेली. जोरावर चंद् आणि चाँद रानी यांचे एक दूरचे नातेवाईक होते मोतीलाल. चित्रपटसृष्टीतले नामवंत अभिनेते. त्यांनी या तरूणाला बहिणीच्या लग्नाच्या कार्यक्रमात गाताना ऐकले. त्यांच्या आवाजातील वेगळेपण त्यांच्या लक्षात आले व ते त्याला मुंबईला घेऊन आले. मोतीलाल या तरूणापेक्षा १३ वर्षे मोठे होते. पण त्यावेळी त्यांनी ही कल्पनाही केली नसेल की याच तरूणाचा उसना आवाज घेऊन एके दिवशी त्यानां गावे लागणार आहे. मुंबईत त्याची रहाण्याची सोय मोतीलालनी स्वत:च्या घरातच केली व एक संगीत शिक्षक पण त्याच्यासाठी नेमला. १९४१ मध्ये या तरूणाला शेवटी एका चित्रपटात नायकाची भूमिका मिळाली. चित्रपट होता ‘निर्दोष’ यातील गाणीही त्याने स्वत: म्हटली होती. त्या काळात कुंदनलाल सैगल गायकात सर्वोच्च शिखरावर होते. आणखी तीन वर्षांनी हा तरूण सर्वांचे लक्ष वेधून घेणार होता पण अभिनयाने नव्हे तर आपल्या गोड गळ्याने…….
मध्ये मजहर खान नावाच्या दिग्दर्शकाचा “पहली नजर” हा चित्रपट थिएटरमध्ये झळकला.

मोतीलाल, वीणा, मुन्वर सुलताना, बाबूराव पेंढारकर, प्रसिद्ध शाहीर बाळकराम,बिब्बो अशी तगडी स्टार कास्ट होती. दोन पठाण मुस्लिम घराण्यातील शोकातिंका यात दाखविली होती. या चित्रपटाचे संगीतकार होते अनिल विश्वास. सफदर आह सितापूरी यांनी गाणी लिहली होती. पैकी एक गाणे होते “दिल जलता है तो जलने दे……” हे गीत कुणी गायले यावर त्यावेळच्या अनेक चित्रपट रसिकांनी पैजा लावल्याचे बोलले जाते. गाणे कुंदनलाल सैगलचे आहे म्हणणारे बहूतेक रसिक ही पैज हरले होते. स्वत: सैगलही हे गाणे ऐकून अचंबित झाले होते. कारण आवाज थेट तयांच्या सारखाच होता. हे गाणे गायले होते मुकेश चंद जोरावर चंद् माथूर या २२ वर्षीय तरूणाने जो पूढे चित्रपटसृष्टीतला महान गायक मुकेश बनला…….या गाण्याने भारतभर त्याला ओळख मिळवून दिली. नंतर हळूहळू मुकेश सैगलच्या प्रभावातुन मुक्त झाले. प्रत्येक कलावंत मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, सुरूवातीस कुणाच्या तरी प्रभावाखाली असतोच. जर त्याने स्वत:ला यातुन मुक्त केले नाही तर मात्र त्याची ओळख फार काळ टिकू शकत नाही.अनेक गायक-गायिकेच्या बाबतीत असे झाले आहे. मुकेशचा किंचीत अनुनासिक पण दर्दभरा आवाज हीच त्यांची खरी ओळख बनली. संगीतकार नौशाद यांनी दिलीपकुमारसाठी अनेक गाणी गाऊन् घेतली. मेहबूब खानच्या ‘अंदाज’ चित्रपटतील मुकेशची सर्वच गाणी गाजली. तु कहे अगर…..झूमझूम के नाचो आज…..हम आज कही दिल खो बैठे….वगैरे. ‘गाए जा गीत मिलनके’, धरती को आकाश पूकारे (मेला), ये मेरा दिवानपन है (यहुदी), सुहाना सफर और ये मोसम हँसी (मधूमती), जीवन सपना टूट गया (अनोखा प्यार)…इत्यादी. ही सर्व दिलीपकुमार साठी मुकेशने गायलेली गाणी. १९५० नंतर मात्र मुकेशचा गळा खऱ्या अर्थाने राज कपूरलाच शोभला. आणि रफीच्या उदया नंतर दिलीप कुमार रफीच्या आवाजात गाऊ लागला…याच वेळी किशोरदा चा आवाज देव साहबसाठी चपखल बसला.

मुकेशच्या आवाजात एक वेगळीच आर्तता असायची. महंमद रफी सारखी सर्व सप्तकातील रेंज वा मन्नादाच्या आवाजतला शास्त्रीय टच भलेही नव्हता मुकेशच्या आवाजात मात्र हृदय भेदून जाणारा दर्द नक्कीच होता. काही मोजकीच गाणी सोडली तर संगीतकार तार सप्तकात त्यांना गायला सांगत नसत. ‘मात्र झूमती चली हवा’ हे सोहनी रागातील गाणे (संगीत समांट तानसेन) आणि शिवरंजनी रागातील ‘जाने काहाँ गए वो दिन’ (मेरा नाम जोकर) या गाण्यात मुकेशजीने खूप वरचे स्वर लावले आहेत..जे आजही ऐकतानां हृदयाच्या आरपार जातात. मुकेशची सर्वच गाणी ओठात सहज बसणारी आहेत. त्यांनी गायलेली उडत्या चालीची अनेक गाणी खूप हीट झाली. मेरा जूता है जापानी (आवारा ), किसी की मुस्कूराहटो पर हो निसार सब कुछ सिख हमने(अनाडी), डम डम डिगा डिगा (छलिया), रूक जा वो जानेवली रूक जा (कन्हैया), मेरा जुता है जापानी (श्री ४२०)वगैरे…….राज कपूरसाठी गातानां मुकेश ख्रोखरच अप्रतिम गात असत. राज कपूरचा चेहरा विलक्षण बोलका. चेहऱ्यावरची प्रत्येक नस न नस हलायची. डोळयातील भाव मुकेशच्या आवाजाने अधिक गहिरे होत जायचे. स्वत: राज कपूर पण सुंदर गात असत. मुकेशने त्यांची आठवण सांगतानां म्हटले होते की- ‘मनात आणले असते तर ते माझ्यापेक्षाही उत्तम गायक झाले असते.’ राज कपूरनी मुकेशला वचन दिले होते की मी आयुष्यभर तुझ्याच गळ्याने गायील व ते त्यांनी मुकेश यांच्या शेवटा पर्यंत पाळले देखिल. सत्यम् शिवम सुंदरम हा खरा नायिका प्रधान चित्रपट. पण या चित्रपटात मुकेश यांच्या गाण्यासाठी राज कपूरने प्रसंग निर्माण केले.

मुकेश प्रत्यक्ष जीवनात अत्यंत भावूक आणि संवेदनशील होते. एकदा एक मुलगी खूप आजारी पडली. तिला मुकेश खूप आवडत असत. आजार वाढू लागला तसे तिने आई जवळ मागणी केली की मला जर मुकेशने गाणे म्हणून दाखवले तर मी लवकर बरी होईल. आईने तिला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला की- ते खूप नामवंत गायक आहेत, ते कसे येऊ शकतील? शिवाय त्यानां खूप पैसेही द्यावे लागणार. पण तिचा हट्ट सुरूच…शेवटी डॉक्टरांनी मुकेशशी संपर्क साधला. आणि खरोखरच मुकेश त्या मुलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले आणि गाणे ही गायले. मुलीच्या चोहऱ्या वरील आनंद बघून ते म्हणाले- ती आता जितकी आनंदी दिसतेय त्याच्या किती तरी पट आनंद मला झाला आहे. त्यांच्या याच संवेदनशीलतेमुळे त्यांचे गाणे बहूदा हृदया पासून येत असावे. राज कपूरच्या “श्री ४२०” आणि “आह” चित्रपटात मुकेश तुम्हाला दिसतील. आह मधील ‘छोटीसी ये जिंदगानी’…हे गाणे गाणारा गाडीवान स्वत: मुकेश आहे. स्वत: मुकेशने दोन चित्रपटाची निर्मिती पण केली. १९५१ मध्ये त्यांनी ‘मल्हार’ हा चित्रपट निर्माण केला. यातील प्रमूख भमिका मोती सागर(रामानंद सागर यांचे चिरंजीव) आणि शम्मी यांनी केली होती. यातील मुकेश आणि लताचे ‘बडे आरमानसे रखा है बलम तेरी कसम’…..हे रोशनने संगीत दिलेले गाणे खूप लोकप्रिय झाले. दुसरा चित्रपट १९५६ मधील “अनुराग” हा होता. यात त्यांनी प्रमूख नायकाची भूमिका केली होती. या नंतर बहुदा त्यांच्या लक्षात आले असावे की अभिनय हा आपला प्रांत नाही. मग त्यांनी गाण्यावरच लक्ष केंद्रीत केले व आपला ठसा उमटवला.

६० च्या दशकातल्या सर्वच संगीतकारानी मुकेश कडून गाणी गाऊन घेतली. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचे सर्वोच्च शिखर असलेला काळ.सुनील दत्त, मनोज कुमार यांच्यासाठी गायलेली गाणी देखिल तुफान गाजली. १९६७ मध्ये सुनीलदत्त-नुतनच्या “मिलन” मधील ‘सावन का महिना’…. हे लताजी बरोबर गायलेले ड्युअट तुफान लोकप्रिय झाले. त्यावर्षीचे बिनाका मधील ते क्रमांक एक चे गाणे होते….’सब कुछ सिख हमने’( अनाडी: १९५९), ‘सबसे बडा नादान’…(पहचान:१९७०),’जय बोलो बेईमान की…’(बेईमान:१९७२), ‘कभी कभी मेरे दिलमे’…(कभी कभी:१९७६ )असे चार फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाले. तर १९७४ मधील रंजनीगंधा सिनेमातील ‘कई बार यूं देखा है….’या गाण्याने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. त्यांनी रायचंद्र त्रिवेदी यांची मुलगी सरला त्रिवेदी यांच्याशी २२ जुलै १९४६ मध्ये लग्न केले. त्यावेळी गाणे बजावणे हे खालच्या पातळीवरचे समजण्यात येई. त्यामुळे रायचंद यांनी विरोध केला. मग दोघांनी कांदीवलीच्या एका देवळात जाऊन् लग्न केले.त्यावेळी मुकेश २३ वर्षाचे होते. मोतीलाल व आर.डी. माथूर (मुगल-ए-आझम या चित्रपटाचे छायाचित्रकार) यांनी त्यानां मदत केली. त्यानां नितीन मुकेश या गायक मुलासह सह एकूण चार अपत्ये आहेत. अभिनेता नील नितीन मुकेश हा त्यांचा नातू.
मुकेशजी अनेकदा स्टेज शो देखिल करत असत. गातानां सोबत त्यांची हर्मोनियम नेहमी असे. किशोर कुमार जसे स्टेजवर मस्ती करत त्यांच्या नेमके उलट मुकेशचे असे. टापटीप कोट टाय, वळणदार भांग अशा वेषात ते जेव्हा सूर लावत तेव्हा त्यानां लोक उभे राहून सन्मान देत. त्यांच्या गाण्यात एका प्रकारचा साधेपणा असायचा. त्यांचे गाणे प्रेक्षक अत्यंत शांतपणे ऐकत असत मध्येच शिट्टया वा टाळ्या वाजत नसत. २२ जुलै १९७४ ला मुकेशनी त्यांच्या लग्नाची ३० वर्षे झाल्याचा सोहळा साजरा केला आणि लगेच चार दिवसांनी अमेरिकेला प्रयाण केले. डेट्रईट, मिचीगन येथे त्यांचा स्टेज शो होता. २७ ऑगष्टला एरवी पेक्षा लवकर उठून स्नान केले. कपडे घालतानां त्यांच्या छातीत दुखायला लागले म्हणून त्यानां लगेच डॉक्टरांकडे नेले. पण तो पर्यंत खूपच उशीर झाला होता. हॉस्पीटल मध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. शिल्लक राहिलेला स्टेज शो लतादीदी आणि त्यांच्या मुलगा नितीन मुकेश यांनी पूर्ण केला. लताबाई त्यांचे शव घेऊन भारतात आल्या त्यावेळी चित्रपटसृष्टीतले असंख्य मान्यवर उपस्थित होते. राज कपूर यांच्या कानावर जेव्हा वृत्त गेले त्यावेळी त्यांचे उदगार होते-‘आज माझा आवाज हरवला आहे’ त्यांच्या मृत्यू नंतर त्यांनी गाणी गायलेले चित्रपट प्रदर्शीत झाले. मुकेशजी देखिल वयाच्या ५३ व्या वर्षी हे जग सोडून गेले. म्हणजे तसे ते तरूणच होते. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज असे अवेळी का सोडून गेले असावेत? हा प्रश्न मनाला सतत बोचणी लावतो.

-दासू भगत (२२ जुलै २०१७)

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..