मुखी केव्हा काय घ्यावे
कसे मुखास सुधारावे
का म्हणोनी बांधावे
संकट समयी!!
मुखोदगत काय शिकावे
विडी की नाम धरावे
कोणास म्हणूनी बधावे
कशासाठी!!
‘तो ना खूप रागीट आहे, उगाच ज्यात्यावर चिडत असतो.’
‘ह्याला ना जाम attitude आहे, सारखं दुसऱ्यांना शिकवत असतो.’
मुळात आपण हे कोणाविषयी बोलत असताना आपण आपल्या स्वभावातले दुर्गुण उघडे करतोय हेच आपल्याला समजत नाही. मग इतरही आपल्या बद्दल बोलतात, मागून खुप बोलतो हा, चोमडा आहे एक नंबरचा.
मुळात कोणाच्या नादाला लागावं आणि कोणाला टाळावं हे आपणच ठरवायला हवे आणि ते आपल्या स्वभावावर अवलंबून आहे असं मला वाटतं. कुणी शांत स्वभावाचा, अबोल, निर्व्यसनी नाक्यावर फार काळ टिकू शकत नाही कारण एकतर तो तिथलं वातावरण सहन करू शकत नाही किंवा थट्टा मस्करी चा विषय बनून जातो. एकपाठी जर चुकीच्या संगतीत गेला तर श्लोकांच्या ऐवजी शिव्यांची बाराखडी मुखोदगत झालीच समजा. म्हणून कोणत्या गोष्टींना आपलंसं करावं आणि कोणत्या गोष्टींना दूर ठेवावं हे लक्षात आलं पाहिजे.
संकट काळी किंवा एखाद्या कठीण प्रसंगी panic होऊन कसे चालेल? तिथे शब्दांवर नियंत्रण आणि संयम यांचा मेळ घातला गेला तर गोष्टी सोप्प्या होतात.
व्यसन करावं की नकरावं या बद्दल प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात पण एखादं व्यसन लागलं की त्यात तुमचा चांगलेपण दडलं जातं आणि मग रामनाम घेणारा सुद्धा विडी ओढत असेल तर त्याला तरी राम जवळ कसा करेल ह्यावर विचार केला पाहिजे.
हातात असे ज्ञानेश्वरी, मुखात शिवी अघोरी
प्रसन्न झाला भगवंत जरी, कृपादृष्टी नाही
— सुमंत परचुरे.
Leave a Reply