करते वाणी गुणवर्णन शिवगौरीतनयाचें
सुखात वा दु:खात मुखीं शुभनाम गणेशाचें ।।
चाचपडत ठेचाळत हें जीवन गेलें वाया
आतुर झालो व्याकुळलो मी तुजला भेटाया
काया-वाचा-मनें सुरूं आवर्तन नामांचें ।।
सिद्धी-प्रसिद्धीआस नको, कटिबद्ध तुला ध्याया
सिद्धीविनायका ये मज अध्यात्मबुद्धि द्याया
वृद्धिंगत होतील जीवनीं क्षण आनंदाचे ।।
शोध संपु दे, गणपतिराया, मजपुढती येई
अंत:चक्षू उघडुन आत्मज्ञानबोध देई
करी प्रबोधन, गजवदना, आ अजाण बालाचें ।।
व्याप्त मना हेरंब करितसे, तिथें न अन्यदुजें
गजाननाच्या दीप्तीपुढती सारें विश्व खुजें
करिल मोरया लुप्त पटल मायासंमोहाचें ।।
– – –
– सुभाष स. नाईक
Leave a Reply