सिंगापूरमधल्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील मुलांच्या पालकांना वार्षिक परीक्षेपूर्वी एक पत्र पाठविले. हे पत्र भारतातल्या सर्व पालकांना उद्देशून आहे असे वाटते. पत्राचा मसुदा थोडक्यात असा होता.
प्रिय पालकांनो,
तुमच्या मुलांच्या वार्षिक परीक्षा लवकरच सुरु होणार आहेत. तुम्ही सगळे आपापल्या पाल्यांनी उत्कृष्ट मार्क मिळवावेत या विवंचनेत असणार. परंतु मनात ही इच्छा बाळगताना एक गोष्ट विसरु नका.
या मुलांमध्येच एक कलाकार आहे ज्याला गणित हा विषय फारसा रुचत नाही.
त्यांच्यातच एक उद्योजक आहे ज्याला इतिहासाशी किंवा इंग्लिश साहित्याशी काही देणेघेणे नाही.
एक संगीतकारही त्यांच्यातच आहे ज्याचे केमिस्ट्रीशी जुळत नाही.
एक खेळाडू आहे ज्याला शारीरिक तंदुरुस्तीपुढे दुसरे काही सुचत नाही. त्याला निश्चितच फिजिक्सपेक्षा सुदृढ शरीरयष्टी जास्त महत्वाची वाटते.
या उपरही तुमच्या मुलाला उत्कृष्ट मार्क मिळाले आणि वरची ग्रेड मिळाली तर ते कौतुकास्पद असेल. परंतु त्यांना तसे तुमच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही तर…..
कृपा करा आणि त्यांचा आत्मविश्वास डळमळू देऊ नका. त्यांना सांगा, ठीक आहे, परीक्षेखेरीज इतरही बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आयुष्यात असतात.
तुम्ही हे सांगून बघा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, ही मुले जग जिंकून दाखवतील.
एका परीक्षेत मनासारखे यश मिळाले नाही अथवा कमी मार्क मिळाले म्हणून त्यांची स्वप्ने आणि त्यांची कौशल्ये त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका.
हो, अजून एक लक्षात ठेवा. डॉक्टर्स आणि इंजिनिअर्सच फक्त या जगातले आनंदी प्राणी आहेत असे समजू नका.
मनापासून शुभेच्छांसहित,
मुख्याध्यापक.
आपल्याकडेही सतत परीक्षांचा मौसम चालू असतो. कदाचित या पत्राने आपल्याही पालकांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रत्येक मुलगा अथवा मुलगी विशेष (युनिक) आहेत. त्यांचे ते विशेष असणे जपा.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply