नवीन लेखन...

मुक्त विचार

“सगळे उत्तम/थोर विचार चालता चालता सहज सुचतात ” असे महान तत्वज्ञ फ्रेड्रीचचे (आडनांव विसरलो) म्हणणे आहे. चालताना मेंदूला रक्तपुरवठा वाढतो. घरातील किंवा कार्यालयातील विचलित करणाऱ्या वातावरणापासून दूर जात समस्यांकडे बघण्याचा अगदी नवा दृष्टिकोन मिळतो. नवसर्जन सहजी प्रवाहित होते. चालताना मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वळविता येते-

* माझे जीवनहेतू कोणते आहेत?
* ते साध्य होताहेत का?
* या विश्वासाठी मी काय केले ज्यामुळे ते जगण्यासाठीचे अधिक चांगले ठिकाण बनलंय?
* कोणाला मी कळत /नकळत दुखावले तर नाही नं ? ते आता दुरुस्त करता येईल का आणि कसे?
* जीवनानंतर काय येते?
* उर्वरित आयुष्य मी अधिक चांगल्या रीतीने कसे घालवू शकेन?

(आपण एकटे चालतो,तेव्हा नवनव्या कल्पना सुचत जातात, गर्दीत आपण घुसमटतो आणि कानी पडेल ते बडबडणे निमूटपणे सहन करीत असतो)

हिंडतानाचे वेगळे ताजे,अनाघ्रात वातावरण आपले दृष्टिकोन बदलण्यास किंबहुना त्यांच्याकडे वेगळ्या कोनातून बघण्याची दृष्टी देतात. खरे तर दैनंदिनीतून किंचित सुटका मिळताच मेंदू अधिक टवटवीत आणि सर्जनशील होत असतो. चालताना मेंदूमधील सक्रिय “जाणिवेचा” (conscious) कप्पा अनेकविध कृतींना पाठबळ देत असतो- नवे शिकणे, निरीक्षण करणे, लक्षपूर्वक ऐकणे, चर्चेत सहभागी होणे इ. अन्यथा नेणिवेच्या पातळीवर आपण “ऑटो पायलट ” मोडवर जगत असतो- आकलनाच्या गृहितकावर चालणे, श्वासोच्छवास, सहजगत्या परिचित रस्त्यावरून वाहन चालविणे इ.

या दोन्ही वेळी विचार करण्यासाठी किंवा विचारमंथन करण्यासाठी आवश्यक असलेली जास्तीची/रिकामी (स्पेअर) क्षमता मेंदूकडे नसते.

मेंदूचा सक्रिय हिस्सा जेव्हा रिकामा असतो तेव्हा खूप काही नवं सुचतं, त्रास देणाऱ्या समस्यांची उत्तरे चुटकीसरशी मिळतात, शॉवर खाली असताना काहीतरी भन्नाट सुचून जातं. मानवी मेंदूची क्षमता अफाट असली तरी रोज जो अनावश्यक कचरा(क्लटर) आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून त्यांत कोंबत असतो, ती केराची टोपली चालताना अंशतः रिकामी होते.

स्वतःला दिवसातून काही वेळ अशी “मानसिक जागा” द्यावी.

१९९५ साली जेव्हा उरळीकांचनच्या निसर्गोपचार केंद्रात मी गेलो होतो,तेव्हा तेथील डॉ निसळ आणि डॉ केतकरांनी या रोजच्या चालण्याचे महत्व मला समजावून सांगितले.

“रोज सकाळी पाचला उठून मी सहा वाजताची (के एस बी ची) बस पकडतो, तर मला मॉर्निंग वॉक कसा शक्य आहे?” माझी शंका.

ते समंजस हसले आणि म्हणाले- ” वॉक फक्त मॉर्निंग ला करायचा असतो,हे कोणी सांगितले तुम्हांला? रात्री जेवणानंतर करा,पण चाला.”

“माझ्या घरासमोर हमरस्ता आहे,त्यावरील रहदारी,धूळ सारं त्रासदायक असतं ” मी excuse चा दुसरा खांब पकडला.

“अहो देशपांडे, रस्त्यावर वॉक करायचा ही संकल्पना चुकीची आहे. तुमच्या बिल्डिंगला टेरेस आहे कां ? मग तेथे शंभर फेऱ्या मारा ,रात्री जेवणानंतर – झाला २-३ किमी वॉक! ”

सगळे आधार सुटल्यावर मी मान डोलावली.

“हां, एक पथ्य पाळा – चालणं एकट्याने करा. सोबत सहधर्मचारिणी नको, नाहीतर पिठामिठाच्या गप्पा सुरु होतात आणि चालण्याची लय बिघडते आणि स्वतःशी संवाद थांबतो.
त्यांना स्वतंत्र (वेगळ्या वेळी) जाऊ देत किंवा (वेगळ्या रस्त्याने) जाऊ देत.”

मी (आम्ही?) हे आजतागायत पाळतोय.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..