मुकुट शिरी तो धारण करूनी
आदेश त्याने धाडीला
प्रखर तेज ते युगपुरुषाचे
अखेर कणा मोडीला!!
अर्थ–
“आम्ही राजे आहोत इथले, महाबळेश्वराचा आम्हाला आशीर्वाद आहे, तो शिवाजी कोण कुठला, त्याच्या समोर आम्ही मुजरा करायचा? का? आम्ही इथले आहोत, ना की बाहेरून कुणी आलेले. ही गादी आम्हास स्वतः देवाने सुपूर्त केली आहे. आम्ही त्या बंडखोर शिवाजीच्या समोर माथे टेकणार नाही. उलट आम्हीच आदेश देतो त्या दरोडेखोर शिवबाला पकडून आमच्या समोर आणा”, प्रतापराव मोरे ने त्याच्या माणसांना हुकूम केला.
विजापूर दारी चाकरी करणारे मोरे बंधु शिवाजीच्या कर्तृत्वाने चिडले होते. आपल्यापेक्षा लहान असलेल्या एका मुलाने आम्हास नोकरी द्यावी, हा त्यांचा अपमान होता आणि म्हणूनच त्यांनी शिवाजीला पकडून आणण्याचे आदेश दिले होते. जावळीचे मोरे म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्या भागात शिवाजी कसला येतोय हा अतिआत्मविश्वास त्यांना नडला आणि बोलणी करण्या आलेल्या वकीलाकडून अन सोबत असलेल्या माणसांकडून प्रतापराव मोरे याचा काटा त्याच्याच वाडयात काढला गेला. चंद्रराव मोरे त्या अकाळी आलेल्या संकटाने घाबरला आणि महाडनजीक असलेल्या रायरी किल्ल्यावर जाऊन लपला. शिवाजी राजांनी रायरीस वेढा घालून काही दिवसात चंद्रराव चा पाडाव केला आणि स्वराज्याच्या कार्यापुढे एक अहंकारी वृत्तीचा खात्मा झाला.
कार्य कोण करते आहे यापेक्षा कार्य कोणते आहे हे पाहून जर आपण त्यात सामील झालो तर पाडाव होण्यापेक्षा यशाकडे पाऊल टाकलं जाऊ शकतं. म्हणून कोणालाही कमी लेखू नका. कोणाचाही द्वेष करू नका. आपण करीत असलेला द्वेषच आपल्या पराभवाचा वेष घालुन यायला वेळ लागत नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply