आमच्यासाठी घर हेच
आमचं संपूर्ण विश्व होतं
विश्वाच्या पसाऱ्यात यांना मग
आमचंच घर कसं दिसत नाही
आसूसून यांच्यासाठी आम्ही
किती जमवले आनंदाचे कवडसे
नाही खिजगणतीतही त्यांच्या
आम्ही किंवा आमचे उसासे
उमेद होती तेव्हा कशाकशाची
तमा नाही बाळगली श्रमाची
उमजत नाही बाळगावी का
उमेदही यांच्या तारतम्याची
केवढा ध्यास आम्हाला, यांचे
हात लागावेत गगनाला
पाय तरी ठरतील जमिनीत का
वाटते आता शंका मनाला
घ्यावी भरारी त्यांनी म्हणून
धावलो घेऊन वेड्यागत आपण
दिशा हुकली की आशाच चुकली
वाटतं पाहून आता रिकामं अंगण
कळकळ नि काळजी आमच्या
असायची काळजात घर करुन
आता नशिबी आहे रहाणं
काळजाला पडलेली घरं मोजून
काळजातले झरे आमच्या
वाहले प्रसंगी प्रवाही बनून
कातळात खडखडाट यांच्या
नसावा पाझर जराही काहून
सदैव अवतीभोवती यांच्या
करत आम्ही बाळ, बाळ
त्यांना फुरसत नसावी पुसाया
का असाही आता यावा काळ?
व्यापात कामाच्या आपण
तरीही घेत होतो यांची चाहूल
गुंग हे स्वतःतच कायम
विश्वात आपल्या होऊन मश्गूल
यांच्या हुसक्याच्याही धसक्याने
जागलो कितीकदा दचकून आपण
धसका अजूनही बसतो हृदयाला
हाक आमची कुठंवर पोचेल
कानावर यांच्या की पल्याड होऊन
आमच्या अपेक्षांची तुम्ही
करा भले उपेक्षा, केवळ
उपेक्षेचीच तुमच्या करायला
लावू नका आम्हाला अपेक्षा
एकंदरीत हे जगच सारा आहे केवळ भास
तेव्हाही, जेव्हा वाटलं आपण होतो मुलांचे
आताही, अन्… जेव्हा जाणवतं मुलं नव्हतीच आपली
-संगोपनास समर्पण
(आईच्या, आईच्या पिढीच्या आशंकित भावनांना शब्दरुप)
–यतीन सामंत
ऋणानुबंध या कविता संग्रहातून
(९/१२/२००१)
Leave a Reply