आज रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षावाल्याला त्याच्या मित्राचा फोन आला त्याचा संवाद माझ्या कानावर पडत होता. त्याचा मित्र काय म्हणत होता ते मला ऐकू येत नव्हते पण त्यांच्या संवादाची सुरुवात आता मुंबईत काही राम राहिला नाही मी मुंबई सोडून गावाला जाण्याचा विचार केला आहे. मुंबई परवडत नाही आता. त्यानंतर त्याचा मित्र काय बोलला असेल याची कल्पना मी नक्कीच करू शकत होतो कारण त्याच पुढंच वाक्य होतं चौथ्यांदा काय पाचव्यांदाच काय मी सहाव्यांदाही प्रयत्न करीन… पण मला मुलगी हवीच ! त्याचा संवाद पुढे सुरू होताच पण माझं घर जवळ आल्यामुळे मी रिक्षा थांबवून रिक्षातून खाली उतरलो आणि चालू लागलो. चालताना मला एकीकडं त्या रिक्षावाल्याचा अभिमानही वाटत होता आणि दुसरीकडे हसूही येत होतं की मुंबई परवडत नाही म्हणून तो गावाला चालला होता आणि दुसरीकडे सहा मुलं झाली तरी त्यांचं पालनपोषण करण्याचं तो समर्थन करत होता. मला खरंतर त्या रिक्षावाल्याशी बोलायचं होतं पण आमच्यात संवाद होणं तेंव्हा अशक्य होतं पण मी खात्रीने सांगू शकतो की तो रिक्षावाला नक्कीच कोकणातील असणार कारण मुलगी जन्माला येण्याची वाट इतक्या आतुरतेने पाहणारा आणि त्यासाठी दिव्य करायला तयार असणारा माणूस फक्त आणि फक्त कोकणातीलच असू शकतो.
मी हे इतक्या खात्रीने सांगू शकतो कारण असाच एक माणूस आमच्या घरात होता तो माणूस म्हणजे माझे वडील ! आमच्या वडिलांना मुलगी हवी होती म्हणून आम्हा तीन भावांचा जन्म झाला. त्या रिक्षावाल्याचा आणि आमच्या बाबांच्या विचारसरणीत काडीचाही फरक नव्हता इतकेच नव्हे तर आर्थिक परिस्थितीतही फार फरक नव्हता कारण आमच्या बहिणीचा जन्म होईपर्यत आम्ही मुंबईत भाड्याच्या घरात राहत होतो. त्याकाळी लोक मुलगा झाला तर पेढे वाटायचे पण आमच्या बाबांनी मुलगी झाल्यावर पेढे वाटले. आमच्या बहिणीचा जन्म झाला आणि तिच्या पायगुणाने आम्ही स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला गेलो. आमची बहीण लहानपाणी दिसायला एखाद्या बहुलीसारखी दिसायची. आमच्या बाबांच्या हट्टापायी आम्हाला एक गोड बहीण मिळाली. या एका गोष्टीसाठी मला माझ्या बाबांचा अभिमान वाटत आला आणि भविष्यातही वाटत राहिला आमच्या बाबांचं तिच्यावर इतकं प्रेम होत की तिच्या प्रेमविवाहही त्यांनी सहज स्वीकारला. मुलगी म्हणून तिच्यावर कधीही कोणतीही बंधने घातली नाहीत. योगायोग असा होता की आमच्या बहिणीचा जन्म आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनी झाला होतो. पण मुलीच्या बाबतीतल्या सध्याच्या काही वर्षातील बातम्या वाचल्या तर भयंकर चीड येते. आजही कोणीतरी माझ्या बाबांसारखा विचार करणारा आहे याचा मला कौतुक वाटतं पण विशेष कौतुक त्या रिक्षावाल्याच वाटतं कारण सध्याच्या परिस्थितीतही तो तसा विचार करतोय…गरीब असला मध्यमवर्गीय असला तरी तो खरा पुरुष आहे…ज्याला ज्याला मुलगीच्या जन्माचा सोहळा करायचा आहे…
— निलेश बामणे.