मल्टीस्टारर चित्रपटांचे निर्माते गुलशन राय यांचा जन्म २ मार्च १९२४ रोजी झाला.
गुलशन राय यांचे नाव बॉलीवूडमध्ये एक चित्रपट निर्माते म्हणून स्मरणात ठेवले जाते ज्यांनी त्यांनी निर्मिती केलेल्या मल्टीस्टारर चित्रपटांमधून प्रेक्षकांमध्ये एक विशेष ओळख निर्माण केली. गुलशन राय यांनी वितरक म्हणून करिअरची सुरुवात केली. गुलशन राय यांनी त्यांच्या त्रिमूर्ती फिल्म्स बॅनर खाली १९७० मध्ये आलेल्या जॉनी मेरा नाम या चित्रपटातून निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
‘जॉनी मेरा नाम’ मध्ये देवानंद, हेमा मालिनी, प्राण, प्रेमनाथ, आय एस जोहर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.१९७३ मध्ये गुलशन राय यांनी पुन्हा एकदा देवानंद आणि हेमा मालिनी यांच्या जोडीने जोशिलाची निर्मिती केली. यश चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट तिकीट खिडकीवर विशेष कामगिरी दाखवू शकला नाही.
१९७५ साली प्रदर्शित झालेला ‘दीवार’ हा चित्रपट गुलशन राय यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये गणला जातो.
यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ या चित्रपटातून दोन्ही भावांमधील द्वैत उत्तम प्रकारे मांडण्यात आले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यातील संघर्ष पाहण्यासारखा होता. हा चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला, त्याचप्रमाणे निरुपा रॉयलाही आईच्या भूमिकेसाठी खूप प्रसिद्धी मिळाली.
१९७७ मध्ये गुलशन राय यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना घेऊन ‘ड्रीमगर्ल’ची निर्मिती केली होती. ‘ड्रीमगर्ल’ही तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.१९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘त्रिशूल’ चित्रपटाद्वारे गुलशन राय यांनी अनेक मल्टीस्टारना एकत्र आणले. या चित्रपटात संजीव कुमार, वहिदा रहमान, अमिताभ बच्चन, शशी कपूर, हेमा मालिनी, राखी, पूनम ढिल्लन, सचिन, प्रेम चोप्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
यश चोप्रा दिग्दर्शित ‘त्रिशूल’मध्ये गुलशन राय यांनी पिता-पुत्रांमधील संघर्ष रुपेरी पडद्यावर आणला. ‘त्रिशूल’ तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.१९८२ साली प्रदर्शित झालेला ‘विधाता’ हा चित्रपट गुलशन राय यांच्या कारकिर्दीतील यशस्वी चित्रपटांमध्ये गणला जातो. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटाने पुन्हा एकदा सुपरस्टार्सची फौज उभी केली. ‘विधाता’मध्ये दिलीप कुमार, संजीव कुमार, शम्मी कपूर, संजय दत्त, पद्मिनी कोल्हापुरी, सुरेश ओबेरॉय आणि अमरीश पुरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
१९८५ मध्ये गुलशन राय यांनी ‘युद्ध’ची निर्मिती केली होती. त्यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांचा मुलगा राजीव राय यांच्याकडे सोपवली. ‘युद्ध’ला तिकीट खिडकीवर सरासरी यश मिळाले.१९८९ मध्ये गुलशन राय यांनी आणखी एक मल्टीस्टारर चित्रपट ‘त्रिदेव’ तयार केला. राजीव राय दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, नसीरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित, संगीता बिजलानी, अमरीश पुरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरला.
यानंतर गुलशन राय यांनी मोहरा आणि गुप्ता सारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. गुलशन राय यांचे ११ ऑक्टोबर २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply