नवीन लेखन...

मुंबई-माहीमच्या गादीवर आलेला दुसरा बिंब..

मुंबईच्या माहिमला राजधानी करणाऱ्या मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंबाने शके १०६२-१०६९ या कालावधीतला वाळकेश्वर ते दमण पर्यंतच्या राज्याचा राजा म्हणून ७ वर्ष राज्य केलं, तर मुंबई-माहीम ही राजधानी आणि वाळकेश्वर ते वसईपर्यंतच्या प्रदेशाचा राजा म्हणून राजा प्रताप बिंबाने ५ वर्ष राज्य केलं. ह्या प्रताप बिंबानंतर जवळपास १५५ वर्षाने दुसरा, वेगळ्याच घराण्याचा बिंब यादव माहिमच्या गादीवर आला. पहिला राजा प्रताप बिंब ते दुसरा राजा बिंबदेव यादव यांच्यात १५५ वर्षांचं अंतर होतं. ह्या १५५ वर्षात माहीमच्या राज्यात नांदलेल्या राजांची ही धावती कथा.

मुंबईच्या माहिमला राजधानी करणाऱ्या मुंबईचा मधे राजा प्रताप बिंब शके १०६९ निधन पावला आणि त्याचा पुत्र मही बिंब माहीमच्या गादीवर आला. राजा मही बिंबाने या प्रदेशावर शके ११३४ पर्यंत, म्हणजे एकूण ६५ वर्ष राज्य केलं. या ६५ वर्षांच्या शेवटच्या कालावधीत, म्हणजे शके १११० मध्ये चौलच्या भोजराजाने महिकावतीचे राज्य जिंकण्याचा मोठा प्रयत्न केला. आताच्या कळव्यात मही बिंब आणि भोजराजाचे सैन्य एकमेंकांस भिडले. या युद्धात चौलचा भोजराजा मारला गेला. मही बिंबाचा जय झाला.

या युद्धात लढलेल्या आपल्या सरदारांना बक्षिस म्हणून राजा मही बिंबाने विविध पदव्या आणि मान-सन्मान प्रदान केले. कोणाला देसाईपद दिलं, तर कुणाला ठाकूरपद दिलं. कुणाला वाद्याचा मान दिला, तर कुणाला गळ्यातलं पदक दिलं. कुणाला सरदेशकी दिली, कुणाला वंशपरंपरेने राऊतपद दिलं. कांदीवलीच्या आपल्या निष्ठावानांना त्यांने वंशपरेचं चौगुलेपद दिलं. मही बिंबाने आपल्या सरदारांना अश्याप्रकारे वश करत आपलं राज्य एकूण ६५ वर्ष सांभाळलं.

शके ११३९ मध्ये मही बिंबाच्या निधनानंतर त्याचा पुत्र केशवदेव बिंब माहीमच्या गादीवर आला. केशवदेवाचे वय या वेळेस फक्त ५ वर्षांचे होते, म्हणून केशवदेवाची आई कामाई ही त्याच्यावतीने राज्यकारभार पाहू लागली. केशवदेवाच्या काज्य कारभाराला १२ वर्ष होताच, म्हणजे तो वयाचा १७ वर्षांचा होताच त्याने स्वत:ला ‘राज पितामह’ अशी पदवी धारण केली. त्याच्या भाटांनी केशवदेवाची महती सांगणारे पोवाडे रचून आजुबाजूच्या लहान-सहान संस्थानात जाऊन ते गाऊ लागले. केवळ १७ वर्षांच्या राजचे हे पोवाडे ऐकणं आजुबाजूच्या संस्थानांतील वयाने ज्येष्ठ राजांना अपमानास्पद वाटू लागलं.

त्यातच एक होता चौलचा राजा भोजराजा. ह्याचा पराभव केशवदेवाचा बाप राजा मही बिंबाने केला होता, तो राग याच्या मनात होताच. त्याच मही बिंबाचा अवघा १७ वर्षांचा पोर स्वत:ला राज पितामह म्हणवून घेतंय हे ऐकल्यावर भोजराजा संतापाने पेटून उठला. त्याने केशवदेवास धडा शिकवायचं ठरवून तो आपलं सैन्य घेऊन महिकावतीच्या राज्यावर हल्ला करण्यास निघाला. ही बातमी मिळताच केशवदेवाने त्याचे देवनारचे वतनदार विनायक म्हात्रे यांना भोजराजाला थोपवून ठेवण्याचा हुकूम केला. कळव्यात पुन्हा एकदा भोजराजाचे सैन्य आणि केशवदेव बिंबाचे सैन्य एकमेंकास भिडले. देवनारकर विनायक म्हात्रे यांनी पराक्रमाची शर्थ करून भोजराजाचा पराभव केला. एवढ्यात भोजराजाच्या वतीने म्हसगडचा संस्थानिक जसवंतदेव युद्धात उतरला, तर त्याच्वावर केशवदेव बिंबाचा एकसरचा म्हात्रे वतनदार धावून गेला. परंतू म्हात्र्यांना थांबवून सिंधे नामक सरदार म्हसगडच्या संस्थानिकाच्या अंगावर गेला व त्याचा पराभव केला. अशारितीने भोजराजाचा संपूर्ण पराभव झाला ते साल होते शके ११४६, म्हणजे इसवी सन १२२४. यावेळी महिकावतीचा राजा केशवदेव बिंब व चौलचा राजा भोजराजानधे तह झाला. पुढे शके ११५९ पर्यंत केशवदेवाने वाळकेश्वर ते वसईची खाडी या पट्ट्यात राज्य केले.

शके ११५९ मधे राजा केशवदेव मरण पावला. परंतू केशवदेवास पुत्र नसल्याने, राजाच्या सर्व अधिकाऱ्यांनी विचार विनिमय करून जनार्दन प्रधानास दत्तक घेऊन गादीवर बसण्याची विनंती केलीं. जनार्दन प्रधानास गादी सोपताना सर्व सरदारांनी, केशवदेवाने त्याच्या अधिकाऱ्यांना दिलेले सर्व अधिकार तसेच ठेवू, असं वचन घेतलं होतं. पुढची शके ११५९ ते ११६३ अशी चार वर्ष जनार्दन प्रधानाने राज्य केलं.

जनार्दन प्रधानाच्या राज्याभिषेकांस चार वर्ष होतात न होतात तोच # घणदिवेचा राजा नागरशा माहीमवर चालून आला. तो ज्या मार्गाने माहीमवर आदळला, तो मार्ग सोबतच्या नकाशात दाखवला आहे. ठाण्यास झालेल्या युद्धात नागरशाने जनार्दन प्रधानाचा पराभव केला. पराभुत जनार्दन प्रधानालाच नागरशाने आपला प्रधान नेमून नागरशा माहीमला राजधानीत राहू लागला. अशारितीने शके १०६२ साली चंपानेरच्या प्रताप बिंब राजघराण्याची सुरु झालेली, आधी दमण ते वाळकेश्वर (राजधानी केळवे माहीम) आणि नंतर वसई ते वाळकेश्वरवरील (राजधानी मुंबई-माहीम), सत्ता शके ११६३ साली संपुष्टात आली. मुंबई-माहीम येथे राजधानी स्थापन करणाऱ्या प्रताप बिंबाच्या घराण्याने मुंबईवर १०१ वर्ष राज्य केलं.

जनार्दन प्रधानाला हरवून मुंबईच्या गादीवर बसलेल्या घणदिव्याच्या नागरशाने पुढील ३० वर्षे या प्रदेशावर राज्य केले. राज्याचा कडकोट बंदोबस्त करावा म्हणून नागरशाने ठिकठिकाणी सैन्याचे तळ उभारले. ह्याच दरम्यान नागरशाला मुलगा झाला. राज्याला वारस मिळाला. ह्या मुलाचे नांव त्याने ‘त्रिपुरकुमर’ असं ठेवले. ह्या मुलाच्या जन्माबरोबरच नागराशाच्या राज्यात भाऊबंदकीची बीज रोवली गेली.

नागराशाला नानोजी, विकोजी, बाळकोजी असे तीन मेव्हणे होते. ह्या तिन्ही मेव्हण्यांनी नागरशाला उत्तर कोकणावर विजय मिळवण्यासाठी मदत केली होती. परिणामी त्यांना सत्तेत वाटा मिळावा अशी अपेक्षा होती. हे तीनही मेव्हणे महत्वाकांक्षी आणि सत्ताकांक्षी होते आणि म्हणून नागराशाला पुत्रप्राप्ती झाल्यावर ह्यांना आपल्या भवितव्याची चिंता वाटू लागली. जस जसा नागराशाचा पुत्र त्रिपुरकुमार मोठा होत होता, तस तसे हे तिघेहीजण अस्वस्थ होत होते. पुढे आपले महत्व कमी होणार हे जाणून, ह्या मेव्हाण्यानी आपली चाल खेळायला सुरुवात केली. त्यांनी नागराशाकडे ठाणे, मालाड आणि मरोळ ही गावे बक्षिस म्हणून मागितली, जेणेकरून त्यांना तिथे स्वतंत्रपणे राज्य करता यावे. नागराशाने अर्थातच ही मागणी नाकारली. ह्यावरून नाराज झालेल्या ह्या तिन्ही मेव्हण्यांनी देवगिरीच्या €रामदेवराव यादवाच्या कानावर आपले गाऱ्हाणे घातले व त्याच्याकडे आश्रय मागितला.

त्यावेळी, म्हणजे शके ११९३ मध्ये, रामदेवराव नुकताच सम्राट पदावर आरूढ झालेला होता. रामदेवराव हा काही पराक्रमी म्हणून प्रसिद्ध नव्हता. कथा, शास्त्र, चर्चा, परमार्थ यातच त्याचे जास्त लक्ष होतं. केवळ वंशपरांपरागत हक्काने तो गादीवर आला होता. असं असलं तरी तो एका मोठ्या राज्याचा अधिपती होता आणि म्हणून नागरशाच्या मेव्हण्यांनी त्याचा आधार घ्याचं ठरवलं. त्याने तिघांचे म्हणणे ऐकून घेतले आणि नागरशाला धडा शिकवून तुम्हाला न्याय मिळवून देतो, असं सांगितलं. रामदेवरायालाही ह्या युद्धाची स्वत:ला सिद्ध करण्यासाठी गरज होतीच. त्याने ही संधी ओळखून आपला प्रधान हेमाडपंडित याला तिघांबरोबर सैन्य देऊन नागराशाचे राज्य काबीज करण्यासाठी रवाना केले.

रामदेवारायाचे हे सैन्य कळवा येथे पोचले असता त्याची गाठ नागराशाचा मांडलिक चेंदणी येथील पाटलाशी पडली. कळव्यात धमासान युद्ध झाले आणि त्याची परिणीती रामदेवरायाच्या सैन्याचा पराभव होण्यात झाली. तो पर्यंत जवान झालेला नागर्शाचा पुत्र त्रिपुरकुमार सैन्य घेऊन चेंदणी पर्यंत पोचला होता. त्रिपुरकुमारने रामदेवरायाच्या सैन्याचा पाठलाग सुरु केला. हेमाडपंडीताचे सैन्य माहुली किल्ल्याच्या आश्रयास गेले असताना, त्रिपुरकुमारने तिथे पराक्रमाची शर्थ करून हेमाडपंडीताचा पराभव केला. नागरशाचे तिनही मेव्हणे पराभुत होऊन पळून गेले. रामदेवरायाच्या सैन्याने माघार घेतली आणि नागरशाचे महिकावतीचे राज्य सलामत राहीले.

नागरशाने केलेल्या रामदेवरायाच्या केलेल्या पराभवानंतर, नागरशाचे प्रस्थ वाढलं. खरं तर रामदेवराय फारसा शुर नसला तरी, सर्वच अर्थाने मोठ्या अशा दक्षिणेचा सम्राट. ह्या सम्राटाचा पराभव तुलनेनं लहान अशा नागरशाने करावा, ही गोष्ट रामदेवरायच्या जिव्हारी लागली होती आणि ह्या पराभवाचा बदला घेण्याची एक योजना रामदेवरायाच्या मनात शिजत होती. ही महत्वाकांक्षी योजना अंमलात आणण्यासाठी रामदेवरायाने अजिबात घाई केली नाही. पहिली आपल्या राज्याला बळकट करण्याचे उद्दीष्ट ठेवून त्यावर कार्यवाही केली. इतर बारीक-सारीक अडचणी सोडवल्या. ह्यात जवळपास १२-१५ वर्षांचा कालावधी निघून गेला होता.

आता आपल्या योजना अंमलात आणायची वेळ आली असं रामदेवरावाला वाटलं आणि तो तयारीला लागला. त्याला असलेल्या शंकरदेव, केशवदेव, बिंबदेव आणि प्रतापशा अशा ४ पुत्रांपैकी थोरला पुत्र शंकरदेव यास स्व-रक्षणार्थ स्वतःजवळ ठेवून घेतलं. केशवदेवास देवगिरी दिली, बिंबदेवास उदगीर प्रांत दिला, तर प्रतापशाला अलंदापूर-पाटण दिले आणि स्वत: कधी देवगिरीस, तर कधी पैठणला जाऊन येऊन राहू लागला. रामदेवराय आपल्या पद्धतीने सर्व तयारी करत असला तरी, मुळातच त्याच्या शौर्याचा अभाव होता. हे त्याचे शत्रु सोडाच, स्वकीय आणि मांडलिकही जाणून होते व त्याची परिणिती त्याचे राज्य वरवर शक्तीशाली दिसत असले तरी आतून पोखरलेलंच होतं राज्या कुणी कुणाला जुमानेसं झालं होतं. विविध ठिकाणच्या मांडलिकांनी स्वत:चं राज्य असल्यासारखं वागायला सुरुवात केली होती. नेमकं हेच हेरून रामदेवरावाने मुंबईच्या नागरशावर स्वारी करण्यापूर्वीच शके १२१० मधे गुजरातमार्गे अल्लाऊद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली. या स्वारीत अल्लाऊद्दीन खिलजीने रामदेवरावाचा पराभव केला, परंतू त्याचं राज्य न बळकावताच तो आल्या वाटेने परत निघुनही गेला.

देवगिरीतही काही घटना घडत होत्या. देवगिरीला असलेला रामदेवरावाचा पुत्र केशवदेव मरण पावून त्याचा मुलगा रामदेवराव (दुसरा) गादीवर आला होता. प्रतापशा नांवाचा दुसरा पुत्र आलंदपूर-पाटण येथेच होता. राजा रामदेवराव यादव व त्याचा मोठा पुत्र शंकरदेव बहुदा मरण पावले असावेत.

रामदेवरावाचा चौथा पुत्र बिंबदेव यादव मात्र नागरशाने शके ११९४-९५ मधे केलेल्या पराभवाचं उट्टं काढण्याच्या प्रयत्नात होता. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरु असतानाच, शके १२१० मधे अल्लाऊद्दीन खिलजी देवगिरीवर आदळला आणि बिंबदेवाने खिलजीवर त्याच्या पिछाडीवरून हल्ला करण्याचे योजून त्या मार्गे कूच केले. परंतू अल्लाउद्दीन त्या पूर्वीच परत गेला होता. अल्लाऊद्दीन पुन्हा शके १२१६ पुन्हा देवगिरीवर चाल करून आला, तोवर बिंबदेव महिकावतीच्या दिशेने निघाला होता.

बिंबदेवाने आपला मोर्चा महिकावतीच्या नागरशाच्या दिशेने वळवला त्या वेळी नागरशाचा मुलगा त्रिपुरकुमार गादीवर आला होता. त्या परिसरातल्या इतर संस्थानिकांपेक्षा त्रिपुरकुमारची शक्ती बरीच मोठी असली तरी, बिंबदेव यादवाचे सामर्थ्य त्याहून मोठं होतं. बिंबदेव यादव त्रिपुरकुमारच्या राज्यात प्रतापपुरापर्यंत, म्हणजे मरोळपर्यंत विनासायास आला. पुढे बिंबदेव यादवाचे सामर्थ्य पाहून त्रिपुरकुमाराने आपले राज्य बिंबदेव यादवाच्या सुपुर्द केलं आणि तो त्याचे मुख्य गांव चौलच्या दिशेने निघून गेला. ह्या दोघांच्यात कोणतीही लढाई झाल्याचा वृत्तांत बखरीत नाही. अशा तऱ्हेने बिंबदेव यादवाच्या हातात महिकावतीचं राज्य आलं. बिंबदेव यादव मुंबईचा राजा झाला.

शके १२१६ मध्ये, म्हणजे इसवी सन १२९४ मध्ये मुंबई-माहीमला राजधानी स्थापन करणारा बिंबदेव यादव हा दुसरा बिंबराजा. पहिल्याचं आडनांव बिंब, तर दुसऱ्याचं स्वत:चं नांव बिंब. पहिला बिंब, प्रताप बिंब इसवी सन ११४० मधे आला, तर हा दुसरा बिंब १२९४ मधे. दोन बिंबांच्या दरम्यान १५५ वर्षांचं अंतर आहे. प्रताप बिंबाच्या ताब्यात वाळकेश्वर ते वसईची खाडीपर्यंतचाच प्रदेश होता, तर बिंब यादवाने संजाणपर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्या घेतला होता.केवळ नांवातल्या सारखेपणामुळे ह्या दोन बिंबांच्या संबंधीत घटनांमधे गोंधळ उडताना दिसतो. गंम्मत म्हणजे दोन्ही बिंबांचा राज्य करण्याचा कालावधी ९ वर्ष एवढाच असल्याने, हा गोंधळ आणखी होतो. हा गोंधळ कमी व्हावा म्हणून ह्या लेखाचं प्रयोजन.

-@नितीन साळुंखे
9321811091

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा – लेखांक – ३१ वा

टिपा-
1. या लेखासाठी श्री. वि. का. राजवाडे आणि श्री. अशोक सावे ह्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेल्या, परंतु ‘‘महिकावतीची बखर’ ह्याच नांवाच्या दोन वेगवेगळ्या पुस्तकाचा आधार घेतला आहे.

2. मुंबई-माहिमला राजधानी करुन राज्य करणारे दोन बिंब कोण आणि ते कधी होऊन गेले, हे दाखवणं येवढाच मर्यादित हेतू ह्या आणि ह्या पूर्वीच्या लेखाचा आहे. ह्या दोन्ही बिंबासमवेत मुंबईत वसण्यासाठी आलेल्या कुळांचा उल्लेख इथे केवळ संदर्भासाठा आहे.

3. दोन घटनांमधला काळ आणि प्रसंग काही ठिकाणी बखरीत स्पष्टपणे दिलेला नसल्याने, मी तो तर्काने, परंतू प्रसंगाला साजेल असा रंगवला आहे. मी हौशी अभ्यासक आहे, तज्ञ नव्हे ही बाब इथे आवर्जून लक्षात ठेवावी.

4. चंपावती- चौलचंच एक नांव. बखरीत सर्वत्र चंपावती किंवा धारचंपावती असा उल्लेख आहे. केशवदेवावर आलेला हा भोजराजा(दुसरा) असावा. कारण पहिल्या भोजाला केशवदेवाचा बाप, राजा मही बिंबाने मारलं होतं.

5. म्हसगड-हे ठिकाण नक्की कुठेहे सांगता येणार नाही, मात्र मुरबाड नजिकचं सध्याचं ‘म्हसे’ या गांवापाशी ते कुठेतरी असावं, असं या क्षेत्रातल्या काही जाणकारांशी बोललो असता समजलं.

6. रामदेवराव किंवा बिंबदेव यादव यांच्या आडनांवाचा बखरीत काही ठिकाणी ‘जाधव’ असाही उल्लेख केलेला आहे.

7. घणदिवे हे गुजरातमधिल चिखली गांवाजवळ आहे. सोबतच्या नकाशात हे गांव पाहाता येईल.

8. राजा रामदेवराव यादव व त्याचा मोठा पुत्र शंकरदेव बहुदा मरण पावले असावेत, असं मी तर्काने म्हटलेलं आहे, कारण त्यांचा कुठलाही उल्लेख नंतर बखरीत सापडत नाही.

9. इसवी सन ११४० मधे आलेल्या प्रताप बिंबासोबत सोमवंशी-सूर्यवंशी-शेषवंशी कुळे मुंबईतल्या वास्तव्यासाठी आली, तर इसवी सन १२९४ मधे आलेल्या बिंब यादवासोबत जे ५४ सोमवंशी-सूर्यवंशी-शेषवंशी सरदार मुंबईत आले, ते सर्वच्या सर्व एकजात पाठारे प्रभू होते. पाठारे प्रभुंचं मुंबईत झालेलं हे पहिलं आगमन.

10. ‘शके’वरून इसवी सन काढताना ‘शके’त ७८ मिळवावेत. उदा शके १०६२+७८= इसवी सन ११४०.

11. केळवे-माहिम म्हणजे ‘महिकावती’ आणि मुंबई-माहिम म्हणजे ‘बिंबस्थान’. वाळकेश्वर ते दमण पर्यंतच्या राज्याचा उल्लेख महिकावती असा केलेला आहे.

©️नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..