नुकताच काही निमित्ताने छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर, आझाद मैदानात असलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इमारतीत जाण्याचा योग आला. ज्येष्ठ पत्रकार श्री. कुमार कदम यांच्या सोबत इमारतीचा फेरफटका मारताना सहज म्हणून इमारतीच्या गच्चीवर गेलो. संघाच्या इमारतीच्या गच्चीवरून मुंबईच्या पूर्व बाजूची स्कायलाईन पहिली आणि ठळकपणे एक दृश्य दिसले. पत्रकार संघाच्या इमारतीच्या गच्चीवर पूर्वेकडे, मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीकडे तोंड करून उभे राहिले, की मुंबईचे दक्षिणो-त्तर दोन भाग पडलेले स्वच्छ दिसून येतात.. उजव्या बाजूला दक्षिणेची, ब्रिटिशांनी वसवलेली, ‘रॉयल’ मुंबई तर डाव्या बाजूच्या उत्तरेस कशीही वेडी-वाकडी वाढलेली, चित्र-विचित्र इमारतींचे बांधकाम असलेली, देशी साहेब वसवत असलेली मुंबई..अगदी सहज लक्षात येण्यासारखा फरक आहे हा..
हे सर्व पाहत असताना गेल्या काही वर्षात वाचलेली मुंबईचा इतिहास नोंदवलेली काही पुस्तके डोळ्यासमोर आली आणि मुंबईचा इतिहास सर्रकन डोळ्यासमोरून एला.. मुंबई कशी वसत गेली, घडत-बिघडत गेली याचा फार सुंदर शब्दचित्र श्री. न.र.फाटक, श्री. अरुण टिकेकर किंवा अगदी वाचलेले श्री. अरुण पुराणिक यांनी रेखाटलेलं मला आठवल. मुंबईचा इतिहास लिहिलेली तशी अनेक पुस्तकं असली तरी मी वाचलेली आणि मला मनापासून पटलेली ही पुस्तके आहेत. श्री. अशोक सावे यांनी लिहिलेली ‘महिकावातीची बखर‘ या ग्रंथात देखील मुंबई-ठाण्याच्या अनुषंगाने सुरेख माहिती दिलेली आहे.
शालेय पुस्तकात अभ्यासाला असल्याने व त्यामुळे आपल्याला मार्क्स मिळत असल्याने आपल्या सर्वाना माहित असतो तो ब्रिटीशकाळ ते भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या सालापर्यंतचा एकूण पावणेतीन-तीनशे वर्षांचा इतिहास..! परंतु आपल्या मुंबईला ब्रिटीशांच्या पूर्विचाही फार मोठा इतिहास आहे आणि तो रंजकही आहे हे माहित नसते. इतिहास असलेली मुंबई फोर्ट-भायखळा-माझगाव आणि फार तर परळ-दादर व पूर्वेसं सायन पर्यंत सापडते. पुढची उपनगरेही त्याकाळी होती परंतु इतिहास म्हणावे असे काही विशेष त्या भागाबाद्दलचे नोंदलेले माझ्याही वाचनात आले नाही.
तसा इतिहास हा सर्वच सजीव-निर्जीव वास्तुमात्राना असतो. मात्र आपण ज्या शहरात जन्मलो, वाढलो त्या शहराचा इतिहास वाचण्याची मजा काही औरच असते..आपल्या मुंबईचा प्राचीन उल्लेख टॉलेमी नावाच्या प्राचीन इजिप्शियन भूगोलज्ञाच्या यादीत इ. स. १५० मध्ये नोंदलेले आढळते असा उल्लेख श्री. न.र. फाटकांनी आपल्या ‘मुंबई नगरी’ या पुस्तकात केलेली आढळते. म्हणजे आज २०१६ साली मुंबईला १८६५ वर्षाचा ज्ञात इतिहास आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या एकोणीस – वीस शतकात मुंबई घडली आणि बरीचशी बिघडली. इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात मुंबईवर सातवाहन साम्रज्याचे राज्य होते व त्यानंतर इसवी सनाच्या तेराव्या शतकापर्यंत क्षत्रप, मौर्य, चालुक्य, यादव आदि बलाढ्य साम्राज्य आली आणि गेलीही. या सर्वांच्या कारकिर्दीत मुंबई होती परंतु तीस तेवढे महत्व नव्हते. या प्रत्येकाच्या व सर्वांच्या कारकिर्दीतली मुंबई हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे आणि तो करण्यासारखाच आहे.
नंतर कुठेतरी इसवीसनाच्या तेराव्या शतकात राजा भीमदेवाचा अंमल मुंबईवर सुरु झाला आणि मुंबई थोडी प्रकाशझोतात यायला सुरुवात झाली. ( हा बिंब कि भीम, यादव कि सोलंकी, हे एक होते, दोन होते की तीन या विषयी अजूनही संदिग्धता आहे. आपल्या सोयीसाठी आपण ‘भीमदेव’ किंवा ‘भिमराजा’ हेच नाव कायम ठेऊ.) राज भिमादेवाने मुंबईला तिची स्वतःची ओळख द्यायला सुरुवात केली असे म्हटले तरी हरकत नाही. हा भीमराजा पालघर-केळवे माहीम या सध्याच्या पालघर जिल्ह्यातून येथे आला होता हा निष्कर्ष मी माझ्यापुरता मान्य केला आहे. येथे येताना त्याने सोबत पाताणे, प्रभू, पाचकळशी-सूर्यवंशी व चंद्रवंशी, मराठे वगैरे सरदार मंडळी आणली होती. सध्याचे मुंबईतील माहीम हे या भिमराजाने वसवले होते असा उल्लेख मुंबईच्या इतिहासात अनेक ठिकाणी आलेला आहे. राजा भिमदेवाचा महाल सध्याच्या मध्य मुंबईतील परेल भागात असलेल्या नायगाव-भोईवाडा परिसरात होता. हे नायगाव राजा भिमदेवाने वसवलेले आहे असा उल्लेख अनेक पुस्तकांत आलेला आहे. या ठिकाणी त्याच्याबरोबर आलेल्या पाचकळशी, सुतार, सोमवंशी, चंद्रवंशी सरदारांनी वसती केली. आजही परेल-नायगाव-भोईवाडा भागात चुरी, ठाकूर, म्हात्रे आदि आडनावाची अनेक कुटुंबे पूर्वापार वास्तव्याला आहेत आणि या सर्वांचे संबंध कुठेतरी पालघर-केळवे-माहीम परिसरात आहेत. नायगाव हे राजा भीमदेवाच्या न्यायदानाचे ठिकाण होते. राजाची पालखी उचलणारे भोई ज्या गावात स्थायिक झाले तो ‘भोईवाडा’ हे आपण सहज समजू शकतो. राजा भीमदेवा पासून मुंबई नावारूपाला येऊ लागली.
पुढे चौदा ते सोळाव्या शतकापर्यंत मुंबईवर गुजरातच्या सुलतानांनी राज्य केले. यापूर्वी काही काळ चौलच्या नागरदेवांनी मुंबईवर राज्य करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रयत्न गुजरातेतील मुसलमानांनी हाणून पाडले आणि येथून पुढे कोकणपट्टीवरील (पक्षी मुंबईवरील) हिंदूंच्या स्वतंत्र ग्रहण लागले ते कायमचेच.
आता सोळाव्या शतकाच्या प्रारंभी मुंबईच्या इतिहासाच्या रंगमंचावर पोर्तुगीजांचा प्रवेश झाला आणि मुंबई खऱ्या अर्थाने जागतिक नकाशावर उगम पावायला लागली. शेवटचा गुजराथी सुलतान बहादूरशहा याने उत्तरेकडून मोगलांचे दडपण व दक्षिणेत वाढणारे पोर्तुगीजांचे आक्रमक सामर्थ्य या पेचातून अंशत: मोकळे होण्यासाठी सोळाव्या शतकाच्या मध्यावर मुंबई आणि वसई ही ठिकाणे पोर्तुगीजांच्या हवाली केली. सन १५३४ साली मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली ती त्यांच्या ताब्यात सन १६६१ साला पर्यंत होती. पोर्तुगीज जरी व्यापाराच्या निमित्ता आले असले, तरी त्यांचा मुख्य उद्देश येथील स्थानिकांना बाटवून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा होता. त्यामुळे मुंबईच्या नैसर्गिक बंदराच्या असण्याचा व्यापारासाठी म्हणावा तसा उपयोग पोर्तुगीजांनी केला नाही. माहीम –वसई परिसरातील स्थानिकांना येनकेनप्रकारेण बाटवून त्यांना ख्रिश्चन करणे हा त्यांचा मुख्य धंदा होता. येथी राज्यकारभारात पोर्तुगीज शासकांपेक्षा त्यांच्या धर्मगुरूंचा जास्त पगडा होता. मुंबई माहीम-वांद्रे किंवा वसई भागात जे बहुसंख्येने ख्रिश्चन दिसतात ते या तेंव्हाच्या पोर्तुगीज प्रभावामुळेच. पोर्तुगीज सत्तेचे आंधळे धार्मिक स्वरूप वजा केल्यास त्यांच्या कित्येक गोष्टी त्या कालच्या इथल्या लोकांनी स्वीकारल्या. मुंबईच्या दैनंदिन जीवनात ‘पावा’चा शिरकाव झाला तो यांच्यामुळेच.
विहिरीत ‘पाव’ टाकून ते पाणी स्थानिकांना पिण्यास देऊन त्यांना सामुहिकपणे बाटवण्याचा उद्योग पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणावर केला. आणि म्हणून इथल्या ख्रिश्चनांना आजही आपण ‘पाववाले’ म्हणून ओळखतो. कोणीही परकीय धर्मप्रसारक सत्ता करते त्याप्रमाणे पोतुगीजनीही आक्रमकपणे धर्मप्रसार करताना येथील काही देवळे व मशिदी पडून त्या जागेवर चर्चेस उभारण्याचा पवित्र घेतला. माहीमचे सेंट मायकेल चर्च, अंधेरीचे सेंट. जॉन द बाप्टीस्ट चर्च (सध्या हे चर्च अंधेरी येथील सीप्झ संकुलाच्या आत आणि पडीक अवस्थेत आहे अशी माहिती इंटरनेट वर मिळते.), भायखळ्याचे ग्लोरिया चर्च ही आजही सुस्थितीत असलेली आणि सर्वाना माहित असलेली ठिकाणे ही पोर्तुगेजांची निर्मिती आहे. या व्यतिरिक्त आताच्या ताज लॅण्ड्स एंड (किंवा हॉटेल सी रॉक येथे) या ठिकाणी अजूनही असलेला वांद्र्याचा किल्ला, मालाडच्या मढ येथील आणि सध्या वायूदलाच्या ताब्यात असलेला वर्सोव्याचा किल्ला किंवा मुंबईचा प्रसिद्ध ‘फोर्ट’ (आता फक्त नाव. आपण ज्याला इंग्रजांचा ‘फोर्ट विभाग’ म्हणून ओळखतो, तो किल्ला मुळात पोर्तुगिजांचा होता.) या पोर्तुगेजांच्या खुणा अजूनही मुंबईत शिल्लक आहेत. सन १६६१ नंतर मुंबई पोतुगीज राजकन्येच्या लग्नात ब्रिटीशांच्या ताब्यात गेली आणि मुंबईला आपल्या सर्वाना माहित असलेला इतिहास प्राप्त होण्यास सुरुवात झाली.
पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रागांझा आणि इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स यांच्या विवाहाचा तहनामा जून १६६१ मध्ये लिहिला गेला त्यानंतर मे १६६२ मध्ये लग्न संपन्न झाले. या लग्नात पोर्तुगीजांकडून इंग्रजांना मुंबई हे बेत आंदन म्हणून दिले गेले हा शाळेत वाचलेला इतिहास आपल्या लक्षात आहे. जरी मुंबई इंग्रजांना आंदन म्हणून गेली असली तरी पोर्तुगीजांनी मुंबई ब्रिटीशांच्या प्रत्यक्ष हातात हातात देई पर्यंत अनेक कायदेशीर- बेकायदेशीर अडचणी काढून आपल्याच हातात ठेवली. मुंबई ब्रिटीशांच्या ताब्यात देण्यास पोतुगीज धर्मगुरूंचा मोठा विरोध होता. अखेर इंग्रजांनी बळाचा वापर करून सन १६६५ साली आपल्या ताब्यात घेतली.. पुढे १६६८ साली मुंबईचा कारभार ब्रिटीश राजाने इस्ट इंडिया कंपनीच्या हाती सोपवला आणि मुंबईला इतिहास लिहिण्याची संधी मिळाली.
आता आपल्या सर्वांच्या तोंडावर असलेल्या मुंबईच्या इतिहासाची सुरुवात झाली. मुंबईत येण्यापूर्वी इस्ट इंडिया कंपनीचे अस्तित्व सुरतेत होते. कंपनीच्या वाढत्या व्यापाराला सुरतचे बंदर अपुरे पडू लागले व तेवढ्यात ब्रिटीश शासकांनी कंपनीसमोर त्यांच्या व्यापार वृद्धीसाठी मुंबई किंवा कारवर असे दोन पर्याय ठेवले. शातिर दिमागाच्या इस्ट इंडिया कंपनीच्या जातिवंत ब्रिटीश व्यापाऱ्यांनी मुंबईचे नैसर्गिक बंदर असणे हेरले होते आणि मुंबईला आपली पसंती दिली आणि मुंबईच्या भरभराटीची सुरुवात झाली.
ब्रिटिशांना तत्कालीन उपखंडात आपले बंदर विकसित करायचे होते आणि मुंबईच नैसर्गिक सुरक्षित बंदर असण हे त्यासाठी योग्य वाटलं. ब्रिटिशांनी सूरतेहून आपले हेड ऑफिस मुंबईला हलविले आणि मुंबई वाढण्यास सुरुवात झाली. मुंबईमध्ये बाहेरचे लोक काम-धंद्यासाठी येण्यास सुरवात होऊन मुंबई अखिल भारतीय होण्यास सुरुवात झाली. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे हे मुख्यालय पुढे संपूर्ण देशाचा कारभार ब्रिटनच्या राणीच्या हातात गेल्यानंतरही ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’ची राजधानी म्हणून कायम राहिले. ब्रिटिशांना मुंबईला पूर्वेकडचे लंडन बनवायचे होते व म्हणून त्यांच्या ताब्यात हे शहर गेल्यानंतर त्यांनी त्याची सुव्यवस्थित रचना केली. आजही सुस्थिती डौलाने उभ्या असलेल्या मुंबईच्या फोर्ट विभागातील इमारती ही त्याची जिवंत साक्ष आहे. सन १८५३ मध्ये ब्रिटिशानी मुंबई ते ठाणे दरम्यान त्यावेळी पहिली रेल्वे मार्ग सुरु केला. पोस्त खाते, तारायंत्र आणले. ब्रिटीशानी सुरु केलेल्या कापड गिरण्यांमुळे मुंबई जगातील कापड व्यवहाराचे एक प्रमुख केंद्र बनली होती. कापूस, अफूचा व्यापार तेजीत आला.
भारतीय जनतेला ब्रिटीशांच्या अन्यायाची जाणीव होऊन पुढे स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात भारतीय जनतेचा लढा सुरू झाला, त्यावेळी या सगळ्या चळवळीचे केंद्र मुंबईच होते. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या ‘गोवालिया टँक’ मैदानावर (आताचे ‘ऑगस्ट क्रांती’ मैदान) संपन्न झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात म. गांधीजींनी ब्रिटिश शासनाला ‘चले जाव- छोडो भारत’ हा इशारा दिला, आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एका निर्णायक टप्प्याला सुरुवात झाली आणि पुढे देशाची फाळणी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे अस्तित्वात येऊन भारत स्वतंत्र झाला हा पुढचा इतिहास आपल्या सर्वाना माहित आहे..
स्वातंत्रोत्तर भारतात केंद्र सरकारने भाषावार प्रांत रचना करण्यास प्राधान्य दिले. केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना सुलभ व्हावी यासाठी विविध वर्षात वेगवेगळी कामिशाने नेमली..इतर राज्यांची निर्मिती होत असताना महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र उपेक्षाच येत होती..मुंबई महाराष्ट्राला देण्याची केंद्र सरकारची मान्य मिळत नव्हती..मुंबई केंद्राशासासित ठेवावी कि गुजरातला द्यावी यावर कारस्थान झाली होती. भाषावार प्रांतरचना करताना केंद्र सरकारकडून महाराष्ट्रावर सतत अन्यायच झाला होता. सुरुवातीस महाराष्ट्र-गुजरात व स्वतंत्र महाराष्ट्र अशी तरी राज्य योजना मांडण्यात अली. मुंबईवरचा महाराष्ट्राचा हक्क मान्य करण्यास केंद्र सरकार मुळीच तयार नव्हते. त्यात महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे बडे नेते महाराष्ट्रावर अन्याय होताना केंद्र सरकारचीच री ओढत होते. जनतेला हे मान्य नव्हते. ‘संयुक्त महार्ष्ट्राच्या मागणी साठी संयुक्त महार्शग्त्र समिती स्थापन करण्यात अली होती..निवेदने मोर्चे, सत्याग्रह तुरुंगवास हे सारे सारे मुंबईतील नागरिकांनी स्वतंत्र महाराष्ट्रासाठी सासोले..मुंबईतील १०६ सर्व सामान्य नागरिकांनी बेळगाव-कारवर-मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी हौतात्म्य पत्करल आणि अशी सगळी भूतो न भविष्याती होऊन दी. १ मे १९६० रोजी गुजरात महाराष्ट्र पासून वेगळे होऊन मुंबईसह महाराष्ट्र व गुजरात अशी दोन वेगळी राज्ये निर्माण झाली. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर जवळपास १३ वर्षांनी महाराष्ट्र हे देशातील १४वे राज्य म्हणून मान्यता मिळाली.
मुंबई आपल्या ताब्यात असावी ही महत्वाकांक्षा ब्रिटीश सरकारपासून ते आता पर्यंत सर्वच सरकारची सुप्त इच्छा होती व आहे. देशाची राजधानी दिल्ली असली तरी आर्थिक राजधानी मुंबईच आहे. स्वातंत्र्यानंतर जवळपास ७० वर्ष होऊनही मुंबईचे हे स्थान कोणीही हिरावून घेऊ शकलेल नाही. याला कारण मुंबईतील नागरिक. कष्टाळू, कोणत्याही संकटाने डगमगून जाता सतत कार्यरत राहणारे आणि तरीही माणुसकी जिवंत असलेलं..मुंबईचा लौकिक वाढला किंबहुना इतकी वर्ष होऊनही टिकून राहिला तो त्यांच्यामुळेच..मुंबई बहुरंगी, बहुढंगी आहे..नवीन विचारांचं स्वागत करणारी आहे.. इथे बुरसटलेल्या विचाराना आणि माणसांनाही स्थान नाही आणि म्हणून ती देशात अव्वल आहे..मुंबईत प्रांतवाद नाही..देशाच्या कोणत्याही भागातून आलेल्या कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला ती सारख्याच प्रेमाने जवळ घेते, आश्रय देते आणि एवढे असूनही ती तिचे मराठीपण सोडत नाही..
— गणेश साळुंखे
(पूर्व प्रसिद्धी – ‘पत्रकार दर्पण’, मुंबई मराठी पत्रकार संघाचे मुखपत्र, जाने-जून २०१६ )
मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणा लेखमाला – लेख १
संदर्भ –
१. मुंबई नगरी – न. र. फाटक
२. स्थल–काल – अरुण टिकेकर
३. गाथा संयुक्त महारष्ट्र आंदोलनाची – विजय वैद्य
Leave a Reply