2008 साली ब्राझील मध्ये माझ्या पहिल्या जहाजावर जात असताना एमिरेट्स च्या विमानाने दुबई एअरपोर्ट वर कनेक्टिंग फ्लाईट साठी थांबावे लागले होते. मुंबईवरून आलेले आमचे फ्लाईट लँड झाल्याझाल्या एअरपोर्ट च्या ग्राउंड स्टाफ ची गडबड आणि विमानांची गर्दी लक्ष वेधून घेत होतं. माझा पहिलाच विमानप्रवास आणि पहिलीच परदेशवारी त्यामुळे सगळ्याच गोष्टींच अप्रूप वाटत होतं. त्यावेळी दुबई एअरपोर्टवर असलेली गर्दी, तिथला डामडौल आणि श्रीमंती डोळ्यात मावत नव्हती. एमिरेट्स चे कर्मचारी इकडून तिकडे धावत होते, पळत होते. एअरपोर्ट वरचा एकही कोपरा किंवा जागा अशी नव्हती की तिथं लोकं नाहीत. जगातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या परदेशी प्रवाशांनी एअरपोर्ट नुसतं गजबजून गेले होते. दुबई ड्युटी फ्री च्या दुकानांमध्ये तर अक्षरशः झुंबड उडालेली होती. एअरपोर्ट वर भारतीय, बांगलादेशी आणि पाकिस्तानी कर्मचारी लागलीच ओळखून येत होते. ते सुद्धा आम्ही भारतीय आहोत हे ओळखून हिंदीत बोलत होते. फ्लाईट्स च्या एकामागून एक अनाउन्समेंट एकसारख्या सुरु होत्या, त्या झाल्या की फायनल कॉल च्या अनाउन्समेंट. संपूर्ण एअरपोर्टभर नुसता गजबजाट सुरु होता. युरोपियन, आफ्रिकन देशांमध्ये जाणाऱ्या फ्लाईट्सचे गेट गोऱ्या आणि काळ्या लोकांची गर्दी बघूनच लक्षात येत होते. बांगलादेशी आणि पाकिस्तानी मजूर गटागटाने आणि घोळक्याने त्यांच्या देशात जाणाऱ्या फ्लाईट्स चे गेट शोधण्यासाठी पळताना दिसायचे. एअरपोर्ट वर काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये केरळ मधील लोकांचे वर्चस्व लगेच अधोरेखित व्हायचे ते त्यांच्या बोलण्याच्या टोन मुळे. ड्युटी फ्री शॉप्स मध्ये युरो आणि डॉलर्स ची उधळण होत होती. काउंटर मग ते डिपार्चर गेटचे असो की ड्युटी फ्री चे सगळीकडे काही ना काही देवाणघेवाण चाललेली असायची. मुंबई ते दुबई एमिरेट्स सह आपल्या भारतीय कंपन्यांची कितीतरी विमाने आहेत. सगळीच्या सगळी विमाने नेहमीच फुल्ल.
एमिरेट्स किंवा दुबई इंरनॅशनल कनेक्टिंग वर्ल्ड असं बोलण्यामागचे कारण म्हणजे युरोप, अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या खंडांना मध्यवर्ती ठिकाण म्हणून दुबई सोयीचे होते आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे जगभरात एमिरेट्सची विमाने सर्वात जास्त देशात आणि शहरात जातात कारण एमिरेट्स च्या विमानांना लागणारे इंधन दुबईत स्वस्तात उपलब्ध होते. जगभरातील विमान कंपन्या एकतर तोटयात असतात किंवा जेमतेम नफ्यात असतात कारण त्यांच्या विमानांना न परवडणाऱ्या इंधनाचा खर्च. 2008 नंतर आणखीन दोन वेळा दुबईवरून कनेक्टिंग फ्लाईट मिळाल्या होत्या त्या दोन्ही वेळेससुद्धा तोच अनुभव आला होता.
परंतु आताच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीच्या वेळेचा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. नोव्हेंबर उजाडला तरीही कोरोनाची दहशत आणि प्रादुर्भाव याच्यामुळे दुबई एअरपोर्ट पूर्णपणे थंड पडले आहे. क्षमतेच्या दहा टक्के सुद्धा फ्लाईट्स सुरु नाहीयेत. तुरळक गेट्स वरून अधून मधून फ्लाईट्स येतायत आणि जातायत. ड्युटी फ्री मधील दुकाने उघडली आहेत, कर्मचारी पण आहेत परंतु खरेदी करणारे प्रवाशीच नाहीयेत.
इंडोनेशियातील जकार्ताला जाण्यासाठी एमिरेट्स च्या विमानाने दुबईला यावे लागले आणि दुबईहून जकार्ता साठी एमिरेट्सच्याच दुसऱ्या विमानाने जकार्ताला जावे लागेल. दुबई ते जकार्ता विमान हे पुन्हा आपल्या भारताच्याच हवाई हद्दीतून जाणार आहे.
एरवी कोलंबो, बँकॉक किंवा सिंगापूर मार्गे मुंबईहून जकार्ता ला एकूण दहा ते बारा तासात ज्यामध्ये दोन्ही फ्लाईट मिळून सहा ते सात तास लागायचे, पण आता दुबईतच 16 तासाच्या अंतराने दुसरे फ्लाईट. मुंबई ते दुबई अडीच तास आणि दुबई ते जकार्ता आठ तास. म्हणजे डोंबिवलीहुन ठाण्याला जाण्याकरिता अगोदर कल्याणला जायचे आणि कल्याणहुन डोंबिवली मार्गेच ठाण्याला जायचे.
त्यात प्रमाण वेळेनुसार मुंबई दुबई दीड तासाचा फरक आणि दुबई जकार्ता तीन तासाचा फरक. मुंबईहुन फ्लाईट पकडायच्या एक दिवस अगोदर कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यावरच विमानात प्रवेश. तसाच जहाज जॉईन करायच्या पहिले जकार्ता मध्ये पुन्हा एकदा कोरोना टेस्ट, त्यामुळे टेस्ट होणार, रिपोर्ट येणार तोपर्यंत हॉटेल मध्ये तीन चार दिवस सक्तीचा आराम.
यावर्षी मे महिन्यात जहाजावरुन घरी पोचण्यापूर्वी मुंबईत परतल्यावर आठ दिवस हॉटेल मध्ये क्वारंटाईन राहावे लागले होते त्यानंतर कोरोना टेस्ट आणि मग रिपोर्ट आल्यावर घरी. घरी गेल्यावर पुन्हा सात दिवस स्वतःच होम क्वारंटाईन.
कोरोना आला पण अजून पूर्णपणे काही गेला नाही. ठप्प झालेले जनजीवन व्यवहार हळूहळू सुरु झाले तरीपण अजूनही काहीसे विस्कळीतच.कोणाचा एखाद दोन दिवसासाठी एन आर आय टाइम राहिला तर कोणाचे चालू आर्थिक वर्षाचा एन आर आय टाइम पण पूर्ण झाला.
जहाजावरुन कोणी घरी गेलेच नाही तर कोणी घरून जहाजावर येऊच शकले नाही, कोरोना मुळे लॉक डाऊन झाले, महिनो न महिने सगळे बंद झाले पण क्रूझ लायनर सोडून इतर सगळी जहाजे मात्र चालूच राहिली, म्हणूनच पुन्हा एकदा जहाजावर नेहमी ऐकवलं जाणारे वाक्य आठवायला लागतं ; ” जहाज किसी के लिये रुकता नही”.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech. ), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply