नवीन लेखन...

मुंबई मेरी जान…

खरं पाहता मुंबई ही काम करणाऱ्याची आईच आहे. कारण मुंबई कधीच कुणाला नाराज करत नाही. देशभरातून लोक इथे येतात आणि पैसे कमावतात. आता तर मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढलेली असल्यामुळे येथे ग्राहकही खूप आहेत. अगदी 20 – 25 वर्षांपूर्वी जिथे कमी लोकसंख्या होती, तिथे मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेले आहेत. कोरोनाकाळाचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर नोकरी गेल्यामुळे त्रासलेल्या लोकांना नव-रोजगार सुद्धा मिळालेला आहे.

माझ्या अमराठी मित्रांशी मुंबईवर चर्चा करताना, बऱ्याचदा ते असं म्हणतात की, ‘आम्हाला मुंबईचं फार आकर्षण होतं. मुंबई जणू भव्य दिव्य असं शहर आहे, मुळात ज्याप्रमाणे पूर्वी मुली आपल्या स्वप्नातला राजकुमार येईल आणि आपल्याला घोड्यावर बसवून घेऊन जाईल अशी स्वप्न रंगवत होत्या, त्याप्रमाणे आमच्या गावचे लोक मुंबईला एक दिवस जायला मिळेल अशी स्वप्न रंगवायचे.’

दिवंगत राजू श्रीवास्तव यांचे ’गजोधर’ नावाचे पात्र हे तसेच आहे. गजोधर मुंबईला येतो आणि गावी जाऊन मुंबईचे गंमतीदार किस्से सांगतो. त्यांचं हे पात्र खूप गाजलं. सांगायचं तात्पर्य की मुंबई ही अनेकांसाठी स्वप्नांची नगरी आहे. रावणाच्या काळात जर मुंबई असती तर त्याने मुंबईवर राज्य करण्यासाठी नक्कीच धडपड केली असती आणि ग.दि.मा. यांना ‘रम्य ही स्वर्गाहून मुंबई’ असे गीत लिहावयास लागले असते. मात्र ही मुंबापुरी समग्र कोकणचेच एक बेट, वस्ती आहे हे लोक का विसरतात!

रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहराला लाभलेल्या आहेत. अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये मुंबईत आहेत. महाराष्ट्र व देशभरातून आपलं नशीब आजमवण्यासाठी लोक इथे येत राहतात. मराठी सिनेसृष्टीसोबत बॉलिवूड म्हणजेच हिंदी सिनेसृष्टीचं मुंबई हे केंद्र आहे.

असं म्हणतात की ही मुंबई कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही. ज्याच्या मनगटात बळ असतं, तो इथे सुखी राहतो. पूर्वी मुंबईत बहुसंख्य मराठी माणूस होता. परंतु इथे वाढलेल्या व्यापाराच्या संधी, कलेला मिळालेलं प्रोत्साहन अशा अनेक गोष्टींमुळे इतर प्रांतातले लोक इथे प्रामुख्याने आकर्षित झाले. मुंबा-आईने त्या सर्वांना आपल्या कवेत घेतले.

मुंबईचं ऐतिहासिक महत्व:

मुंबईवर अनेक शासकांनी शासन केलेलं आहे. इ.स. 1343 पर्यंत हा प्रदेश हिंदू राज्यकर्त्यांकडे होता. हिंदू राजांचं वर्चस्व मुंबईवरुन गेलं आणि पुढे गुजरातच्या मोहम्मदाने मुंबई पादक्रांत केली आणि त्यानंतर 1534 रोजी पोर्तुगीज लोकांनी मुंबई आपल्या ताब्यात घेतली. त्यांनी सायन, माहिम, बांद्रा, और बेसियन येथे इमारती, चर्च बांधले. 1625 दरम्यान डच लोकांनी देखील मुंबईवर आपलं राज्य स्थापन केलं होतं. पुन्हा पोर्तुगीजांकडे मुंबई गेली आणि 1661 साली त्यांनी चार्ल्स द्वितीय ला भेट म्हणून मुंबई देण्यात आली.

मुंबई म्हटली की पोर्तुगाल आणि ब्रिटिश नजरेसमोर येतात. पण पोर्तुगाल आणि ब्रिटिंशांच्या पलीकडेही मुंबईचं महत्व आहे. मुंबईचा इतिहास मर्यादित नसून त्याचा मागोवा घेतला की आपण सम्राट अशोकाच्या काळापर्यंत जाऊन पोहोचतो.

नालासोपाऱ्यात सम्राट अशोकाच्या काळातील स्तूप, आज्ञाशिला आढळले होते. दहिसर नदीचे संशोधन केल्यावर आदिमानवाच्या काळातील हत्यारेही सापडली होती. म्हणजेच मुंबईला अति-प्राचीन महत्त्व प्राप्त झाले आहे.

याविषयी विशेष संशोधन न झाल्यामुळे मुंबईची ऐतिहासिक तथ्ये आजही काळाच्या पडद्याआड दडून राहिलेली आहेत. जर यावर संशोधन झाले तर मुंबईचं ऐतिहासिक रूप लोकांना कळेल आणि ते ऐतिहासिक महत्त्व पटलं तर मुंबईच्या पर्यटनातही वाढ होईल. खरं पाहता, ही सात बेटे होती. पूर्वीच्या काळात मुंबईत 80 बंदरांच्या नोंदी आढळतात. इसवीसन पहिल्या शतकातला तो काळ, त्या कालखंडात सातवाहनांचे राज्य होते.

पैठण ही त्यांची राजधानी. रोमन, ग्रीक, पर्शियन आणि अरब राष्ट्रातील लोकांशी व्यावसायिक संबंध असल्याने महाराष्ट्र हे खूप मोठे आणि समृद्ध राज्य होते. महा-राष्ट्र हे नाव त्यासाठी साजेसेच आहे. इथे अनेक लेण्या सापडतात. बोरीवलीत लेण्यांची संकुले सापडतात. मुंबई हे पूर्वीपासूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते. कलचुरी, गुप्त सम्राट, चालुक्य, राष्ट्रकुल, शिलाहार आणि मराठे असे शासक इथे होऊन गेले आहेत.

कोळी समाज हा इथला प्राचीन समाज मानला जातो. कोलवरून कोलीय वंश आणि त्यावरून कोळी असे नामकरण झाले, कोळी हे सातवाहनांचे सरदार मानले जातात. त्याचबरोबर पांचाळ, शाक्य, मालवगण, मल्लवी अशाप्रकारची सोळा जनपदे या भागात होती. कोळी म्हणजेच कोल सरदारांमुळे कदाचित कोलाबा, कोल कल्याण, कोलडोंगरी, कोलाड अशी नावे पडली असल्याचा अंदाज आहे. याबाबतीत पुढे संशोधन झाले तर थक्क करणारे पुरावे समोर येऊ शकतात. तर वाचकांनो, मुंबईला असे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.

ब्रिटिश आणि मुंबई

19 व्या शतकात इंग्रजी राज्य आले आणि मुंबईला फारच महत्त्व प्राप्त झाले. जे जे नवे सुधारित यावे ते प्रथम मुंबईत असा शिरस्ताच होता. त्याच काळात व्हिक्टोरिया टर्मिनस, जनरल पोस्ट ऑफिस, नगर निगम, प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय, राजाबाई टॉवर आणि बॉम्बे विश्वविद्यालय, एल्फिंस्टन कॉलेज आणि कवासजी जहांगीर हॉल, क्रॉफोर्ड मार्केट, ओल्ड सचिवालय (ओल्ड कस्टम्स हाऊस) अशा अनेक इमारतींचे निर्माण करण्यात आले.

राजा जॉर्ज आणि राणी मेरीच्या भारत यात्रेसाठी 1911 रोजी गेटवे ऑफ इंडिया तयार झालं. आज गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात मुंबईकर व पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते.

आज महाराष्ट्र आणि गुजरात नावाचे दोन वेगळे राज्य आहेत. पण ब्रिटिश इंडियामध्ये बॉम्बे राज्यात गुजरात व महाराष्ट्र ही दोन्ही राज्ये येत होती. आजची मुंबई म्हणजे ब्रिटिशकालीन बॉम्बे नव्हे.

पूर्वी कुलाबा, माहिम, छोटा कुलाबा, माझगाव, वरळी, माटुंगा आणि परळ अशी सात बेटे होती. ही बेटे जोडून मुंबई या विशाल शहराची निर्मिती झाली आहे. प्रत्येकाला मुंबईचं आकर्षण वाटू लागलं. नशीब आजमवायचं असेल तर मुंबईत गेलं पाहिजे ही भावना दृढ होऊ लागली. पण याचा वाईट परिणाम मुंबईच्या लोकसंख्येवर होऊ लागला.

दर वर्षी 10 पौंडच्या बदल्यात मुंबई ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई आपल्या ताब्यात घेतली. खरी पण ब्रिटिशांनी मात्र मुंबईचं स्वरुप बदललं. त्यांनी मिल्स मुंबईला हलवल्या. त्यानंतर ‘बॉम बिमा’ हे पोर्तुगीज नाव बदलून इंग्रजांनी ‘बॉम्बे’ असं नामकरण केलं. मुंबादेवी ही मुंबईची देवी, कोळ्यांची देवी म्हणून ते मुंबईला मुंबा म्हणायचे.

गेराल्ड आँगियर बॉम्बेचे गव्हर्नर झाले. तेव्हा त्यांनी गुजराती व्यापारी, पारसी व इतर लोकांना मुंबईकडे आकृष्ट केलं. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या वाढू लागली. मुंबईतला मराठी माणूस कमी होऊ लागला, त्याचीही सुरुवात होती. 1835 ते 1838 पर्यंत रॉबर्ट ग्रँट बॉम्बेचे गव्हर्नर होते. त्यांच्या काळात अनेक रस्त्यांचे काम झाले. मुंबईत पक्के रस्ते निर्माण होऊ लागले.

या शहराचा जलदगतीने विकास होऊ लागला. मुंबई व्यवसायाचे केंद्र झाली. व्हिक्टोरिया टर्मिनस आणि ठाणे दरम्यान भारतातली पहिली रेल्वे धावली. या रेल्वे लाईनचं उद्घाटन 16 एप्रिल 1853 रोजी करण्यातं आलं. 1857 च्या स्वातंत्र्य समरानंतर इंग्रजांनी मुंबई आपल्या ताब्यात घेतली. हळूहळू मुंबईचे 7 बेट जोडले गेले आणि एक विशाल औद्योगिक आणि कष्टकऱ्यांच्या शहरात मुंबईचे रुपांतर झाले.

भारताची आर्थिक राजधानी :

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि भारताची आर्थिक राजधानी आहे. काँग्रेसने काश्मीरप्रश्न ज्याप्रमाणे जटिल करून ठेवला होता तसा मुंबईचा प्रश्नही जटिल करण्याचा त्यांचा डाव होता. 1955 नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काही लोक मुंबईला केंद्रशासित करण्यावर भर देत होते. पण इथला मराठी माणूस सावध असल्यामुळे हा प्रश्न फारसा जटिल झाला नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून या कुटनीतीला प्रचंड विरोध करण्यात आला. पुढे मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली गेली. देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी याला विरोध केला. पण मराठी माणूस केंद्रापुढे झुकला नाही आणि मुंबई ही महाराष्ट्राची झाली. दुःखास्पद गोष्ट म्हणजे यासाठी 106 मराठी माणसांना हुतात्मा व्हावं लागलं. पण या जनरेट्यापुढे केंद्राला झुकावे लागले आणि हौतात्म्यामुळे 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. हुतात्म्यांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथील चौकाचे हुतात्मा चौक असे नामकरण करण्यात आले.

मुंबई हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. सुमारे 12 दशलक्ष एवढी मुंबईची लोकसंख्या आहे. मुंबई हे एक असे शहर आहे जिथे श्रीमंतांपासून गरीब अशा सर्व प्रकारचा वर्ग इथे आढळतो. अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये मुंबईत आहेत. महाराष्ट्र व देशभरातून आपलं नशीब आजमवण्यासाठी लोक इथे येत राहतात. मराठी सिनेसृष्टीसोबत बॉलिवूड म्हणजेच हिंदी सिनेसृष्टीचं मुंबई हे केंद्र आहे.

मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणतात याला महत्वाचे कारण म्हणजे इथले उद्योग आणि उपलब्ध असलेली रोजगाराची सुवर्ण संधी. भारताचा 10% कारखाना रोजगार, 40% प्राप्तिकर, 20% केंद्रीय कर, 60% आयात कर, 40% परदेश व्यापार आणि 40 अब्ज व्यावसायिक कर हा मुंबईतून जातो. मुंबईमध्ये कोणताही उद्योग करता येतो हे रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या स्टॉल्समुळे आपल्याला कळतं.

कष्टकऱ्यांची जननी

खरं पाहता मुंबई ही काम करणाऱ्याची आईच आहे. कारण मुंबई कधीच कुणाला नाराज करत नाही. देशभरातून लोक इथे येतात आणि पैसे कमावतात. आता तर मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढलेली असल्यामुळे येथे ग्राहकही खूप आहेत. अगदी 20 – 25 वर्षांपूर्वी जिथे कमी लोकसंख्या होती, तिथे मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेले आहेत. कोरोनाकाळाचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर नोकरी गेल्यामुळे त्रासलेल्या लोकांना नव-रोजगार सुद्धा मिळालेला आहे.

कोरोनाकाळातील रोजगार ही तर मुंबईची करामत आहे. कितीतरी लोकांनी कोरोना काळात नोकरी गेल्यामुळे हार-फुलांचा, भाज्यांचा, मच्छी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. अर्थात त्यातून सर्वांनाच चांगलं उत्पन्न मिळालं नसेल, पण किमान पोट भरण्यापुरते किंवा जगण्यापुरते तरी पैसे कमावले असतील. ही मुंबईची किमया आहे. मुंबई ही कष्टकऱ्यांना आकर्षित करते. ज्याच्यात कष्ट करण्याची क्षमता आहे, त्याला मुंबई कधीही उपाशी पोटी झोपू देत नाही आणि जर स्मार्ट वर्क करण्याची तयारी असेल तर रंकाचा रावही इथे होतो. गरिबीत वाढलेल्या अनेक लोकांनी या मुंबापुरीत बक्कळ पैसे कमावले आहेत. फक्त कष्ट आणि चिकाटी हवी.

-–जयेश मेस्त्री

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

1 Comment on मुंबई मेरी जान…

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..