जेवणानं भरलेला डबा कुठून घ्यायचा, तो कुणाकुणाच्या हाती द्यायचा, शेवटी कुठं पोचवायचा, पुन्हा रिकामा डबा कुठून अुचलायचा आणि परत कोणत्या घरी पोचवायचा हे अगदी सोप्या सांकेतिक भाषेत लिहिलेलं असतं. ही भाषा म्हणजे, जेवणाच्या डब्याच्या वरच्या झाकणावर, लाल, हिरव्या, पिवळ्या, निळ्या तेलरंगांचे ठिबके आणि रेघा हे त्यांचं बारकोड असतं.
मुंबअीतील ५००० डबेवाले, रोज, १ लाख ७५ हजार जेवणाचे डबे, त्यांच्या मालकांच्या घरून घेअून, त्यांच्या कामाच्या जागेपर्यंत पोचवितात. यासाठी त्यांना फक्त दोन ते अडीच तासांचाच अवधी मिळतो. डबा पोचविण्याच्या जागांमधलं अंतर १६ ते ४० कि. मी. देखील असतं. डबे नुसते पोचविण्याचंच काम नसतं तर रिकामे डबेही परत प्रत्येकाच्या घरी पोचविले जातात.
दोन महिन्यांच्या काळात सुमारे १ कोटी ६० लाख वेळा डबे पोचविले जातात आणि परत आणले जातात. या सर्व व्यवहारात फक्त अेकच चूक होते असा डबेवाल्यांच्या संघटनेचा दावा आहे आणि तो ग्राह्य मानला जातो. म्हणजे हे Six Sigma कार्य आहे असं समजलं जाते.
अमेरिकेच्या फोर्बस् मासिकानं या डबेवाल्यांचं अुदाहरण प्रचंड यशाचं कार्य आहे असं मानलं आहे. डबे पोचविणं आणि परत आणणं या कार्याचं तर्कशास्त्र म्हणजे लॉजिक्स सर्वात चांगलं आहे असंही, ते मासिक म्हणतं. फोर्बज् ग्लोबलमुळे आता मुंबअीचे डबेवाले जगप्रसिद्ध झाले आहेत.
मुंबअीचे डबेवाले फार शिकलेले नसतात. साधा पेहराव, साधी राहणी, कपाळी लाल गंध, डोक्यावर पांढरी खादी टोपी, पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा खाक्या असतो. तंबाखूचा मावा चघळणं किंवा विड्या फुंकणं हा त्यांचा विरंगुळा असतो. अेकंदरीत हे डबेवाले हिंदुस्थानातच राहणारे आणि शोभणारे आहेत. परंतू जेवणाच्या डब्यांची ने-आण करण्याचं त्यांचं काम, अिंडियातल्या लोकांनाही जमणार नाही, हे फोर्बस् मासिकानं दाखवून दिलं आहे.
Six Sigma हा शब्दप्रयोग, ९९.९९९९९९ टक्के अचूकतेसाठी वापरतात. दशांश चिन्हापलीकडे नवाचे सहा आकडे आहेत म्हणून Six Sigma अचूकता असं म्हणतात. ‘मोटरोला’ या कंपनीनं Electronic साधनं मिळवून आणि संगणकाच्या सहाय्यानं ही अनोखी ‘पतधारणा’ मिळविली आहे. आता त्याची बरोबरी मुंबअीच्या निरक्षर डबेवाल्यांनी केवळ तीन-चार तैलरंगीत खुणांच्या सहाय्यानं मिळविली आहे. या तोडीची क्षमता साध्य करणं म्हणजे पाश्चिमात्य व्यापारी जगतात फक्त कल्पनाच करतात. ‘सक्षम व्यवस्थापन’ ही फक्त जादा नफा मिळविण्यासाठीच राबविली जाते. परंतू मुंबअीच्या डबेवाल्यांची प्राप्ती त्यांच्या ‘सक्षमते’ समोर नगण्य आहे.
फोर्बस् मासिकात मुंबअीच्या डबेवाल्यांचं वर्णनही फारच मनोरंजक केलं आहे. जेवणानं भरलेला डबा कुठून घ्यायचा, तो कुणाकुणाच्या हाती द्यायचा, शेवटी कुठं पोचवायचा, पुन्हा रिकामा डबा कुठून अुचलायचा आणि परत कोणत्या घरी पोचवायचा हे अगदी सोप्या सांकेतिक भाषेत लिहिलेलं असतं. ही भाषा म्हणजे, जेवणाच्या डब्याच्या वरच्या झाकणावर, लाल, हिरव्या, पिवळ्या, निळ्या तेलरंगांचे ठिबके आणि रेघा हे त्यांचं बारकोडच असतं. आत तीन किंवा चार डबे असतात. त्यात निरनिराळे खाद्य पदार्थ ठेवलेले असतात. हे ताजे पदार्थ घरीच तयार केलेले असतात. आतल्या डब्यांना त्यांनी Bowl असं म्हटलं आहे आणि ते तारेच्या हँगरने बांधलेले असतात असं लिहीलं आहे.
जेवणानं भरलेला डबा कुठून घ्यायचा, तो कुणाकुणाच्या हाती द्यायचा, शेवटी कुठं पोचवायचा, पुन्हा रिकामा डबा कुठून अुचलायचा आणि परत कोणत्या घरी पोचवायचा हे अगदी सोप्या सांकेतिक भाषेत लिहिलेलं असतं. ही भाषा म्हणजे, जेवणाच्या डब्याच्या वरच्या झाकणावर, लाल, हिरव्या, पिवळ्या, निळ्या तेलरंगांचे ठिबके आणि रेघा हे त्यांचं बारकोड असतं. डबे वाहून नेण्यासाठी लाकडाचा ट्रे आणि सायकली यांची मदत घेतात. लोकल गाडयात या लाकडी ट्रेला बरोबर चढवायचं कसं आणि अुतरवायचं कसं हे कसब अवर्णनीय आहे.
हे लोक पांढर्या कापडाची `हॅट` घालतात, घरून डबा घेणारा डबेवाला आणि तोच डबा कार्यालयात पोचविणारा किंवा तेथून रिकामा डबा परत घेणारा डबेवाला निराळा तर असतोच परंतू डब्याच्या मध्यंतरीच्या प्रवासातही तो बर्याच डबेवाल्यांच्या हातून निवडला जातो, म्हणजे sorting केला जातो आणि ठराविक अंतरापर्यंतच्या टप्प्यावर पोचविला जातो.
डायल केलेल्या टेलिफोन नंबराचा संकेत फोन यंत्रणेद्वारा किंवा अुपग्रहामार्फत त्या त्या घरच्या टेलिफोन अुपकरणापर्यंत नेअून, तो कार्यान्वित करणं म्हणजे जेवणाचा डबा योग्य ठिकाणी पोचविणं आणि तो टेलीफोन अुचलला गेला, अुचलणार्यानं हॅलो म्हटलं आणि ते टेलीफोन करणार्यानं अैकलं म्हणजे जेवणाचा रिकामा डबा परत आणणं यासारखंच आहे.
सार्या जगात किती टेलीफोन लाअीन्स असतील याचाही ढोबळमानानं अंदाज करता येतो. सध्या जगाची लोकसंख्या सुमारे 6 अब्ज 20 कोटी आहे. सरासरी चार माणसांचं कुटुंब गृहीत धरल्यास 1 अब्ज 55 कोटी कुटुंबं होतात. त्यातील 10 टक्के कुटुंबांकडे किमान अेक फोन आहे असं समजलं तर जगात 15 कोटी 50 लाख फोन होतात. प्रत्येक फोन दिवसातून 5 कॉल्स करतो असं समजल्यास दररोज सरासरीनं 77 कोटी 50 लाख कॉल्स होतात. अितक्या फोन्सचा अितक्या वेळा परस्पर संपर्क ठेवणं म्हणजे अचाटच काम आहे. यातील कुणाच्यातरी चुकीनं राँग नंबर लागतात. त्यांची संख्या मुंबअीच्या डबेवाल्यांच्या चुकांच्या संख्येपेक्षा खूपच जास्त आहे.म्हणजेच त्यातील अचूकता मुंबअीच्या डबेवाल्यांपेक्षा कमीच आहे असं फोर्बस् मासिकाचं म्हणणं आहे.
धोबी मार्क हे ही असंच अुदाहरण आहे. तुमची आद्याक्षरं आणि काही खुणा यांच्या सहाय्यानं कपड्यांवर ओळखअक्षरं (Initials) काळ्या शाअीनं लिहीली जातात. ही शाअी कापडावर रासायनिक क्रिया करते. त्यामुळे कपडा कितीही वेळा धुतला तरी ही खूण पुसली जात नाही. अनेक लॉंन्ड्र्यांमधून गोळा केलेले हे कपडे, अेकाच धोब्याकडे धुवायला जातात. तरी ते धुतल्यानंतर त्याच लॉन्ड्रीत पोचविले जातात आणि त्याच व्यक्तीला मिळतात. डबेवाल्यांसारखाच हा ही प्रकार असला तरी कपडे आणणं आणि धुतलेले कपडे पोचविणं यात काही दिवसांचं अंतर असतं.
काही साध्या साध्या अुदाहरणावरून महत्वाच्या तत्त्वांचा शोध लागतो किंवा जाणीव होते. शबरीनं बोरं चाखून फक्त गोड बोरंच रामासाठी ठेवली हे अुदाहरण म्हणजे आधुनिक ‘दर्जा नियंत्रण’ म्हणजे क्वालिटी कंट्रोलचं आहे. त्यात ‘चव’ ही परीक्षा म्हणून वापरली आहे. Taste is the test for quality.
खिडकीतून आलेल्या वार्यामुळे महत्वाचे कागद अुडू लागले की आपण ते गोळा करून त्यावर अेखादी जड वस्तू ठेवतो. म्हणजे नकळत आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला आपल्या फायद्यासाठी राबविण्यासारखंच आहे. अंधारात पायाला काटा बोचला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला चटका बसला की आपल्या मेंदूला त्याची चटकन जाणीव होते. हे स्वयंचलीत टेलीफोनचं जाळंच आहे असं म्हणता येअील. ही यंत्रणा जगातील कोणत्याही टेलीफोन यंत्रणेपेक्षा कितीतरी पटीनं कार्यक्षम आहे.
तीर्थक्षेत्रीचे बडवे :
नाशिक, माहूर, कोल्हापूर, बनारस, अलाहाबाद, तिरुपती वगैरे तीर्थक्षेत्रं आणि कुलदैवतं असलेल्या ठिकाणी देवदर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंची नावं बडवेलोक आपल्या वह्यात लिहून ठेवतात. तुमचे जे जे पूर्वज त्या क्षेत्री आणि बडव्यांकडे येअून गेले, त्या सर्वांची नावं, ते केव्हा आले, किती दिवस राहिले, त्यांनी कुलदैवतेची पूजा कशी केली? असा तुमच्या अनेक पिढ्यांचा पूर्ण वृत्तांत, तुम्हाला अगदी थोड्या वेळात काढून देतात. हा संदर्भ शोधतांना, कित्येक वह्या आणि कित्येक पानं चाळावी लागतात. ही कामं, बडवेलोकांचा मेंदू कुशलतेनं आणि अगदी थोड्या वेळात करतो. ही कृती म्हणजे संगणकाचा ‘सर्च’ किंवा अशाच प्रकारची ‘मला पाहिजे ती माहिती शोधून द्या’ ही आज्ञावली आहे. या साअीटवर तुम्हाला पाहिजे असलेला संदर्भ अब्जावधी पानं ‘वाचून’ काढून दिला जातो.
बिनडोक परंतू अतीशय कार्यक्षम असलेला संगणक प्रत्येक पान वाचून संदर्भ काढतो तर मानवी मेंदू आवश्यक असलेल्याच नोंदींचा संदर्भ घेतो. म्हणजे मानवी मेंदू, बुध्दीचा वापर करतो. अशी बुध्दी असलेले संगणक सध्यातरी निर्माण झालेले नाहीत. ते जेव्हा निर्माण होतील तेव्हा अेखाद्या अविचारी माणसाच्या हाती अणुबाँब किंवा मानवी फुटवे (क्लोन) निर्माण करण्याचं तंत्र लागण्यासारखं होणार आहे. असे संगणक, फक्त सद्विचारी माणसांच्याच हाती राहतील याची काळजी घेतली पाहिजे. गुन्हेगारांच्या हाती असा संगणक लागला तर गुन्हे करण्याची नवीन तंत्रं तो शोधून काढेल.
नाशिकच्या तीर्थक्षेत्री, धार्मिक विधी व क्रियाकर्म करायला येणार्या भाविकांच्या वंशावळीची नोंद ठेवणार्या पुरोहितांच्या चोपड्यांचं, अमेरिकेतील विद्यापीठांतर्फे, सध्या संशोधनाचं काम सुरू आहे. पुरोहितांकडे असलेल्या प्रत्येक पानाची मायक्रोप्रिंट, या संशोधक पथकामार्फत घेतली जात असून, गेल्या ४ ते ५ महिन्यात अवघ्या ५ ते ६ पुरोहितांच्या चोपड्याचं मायक्रोप्रिंट घेण्याचं काम पूर्ण झालं आहे.
नाशिकच्या पुरोहितांची चोपडी म्हणजे भारतीय समाजाच्या वंशावळीची, आश्चर्यकारक नोंद आहे. भारताच्या कोणत्याही राज्यातून, तसंच कोणत्याही गावाहून आलेल्या भाविकाला, पूर्वी त्यांचा पूर्वज जर नाशिकला, गोदावरीच्या घाटावर, धार्मिक विधीसाठी येअून गेला असेल तर, त्याची नोंद या चोपडीत पहायला मिळते. अनेकांना आपल्या पूर्वजांच्या हस्ताक्षरातल्या नोंदी पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. सरकारच्या सांख्यिकी किंवा प्रशासकीय विभागालाही जितक्या तत्परतेनं काम करता येणार नाही, तितक्या तत्परतेनं, नाशिकचे पुरोहित, भाविकाला, त्याच्या वंशावळीच्या नोंदी काढून दाखवितात.
अमेरिकेतील संशोधक पथकाला, या गोष्टीचं कुतुहल वाटल्यानं, या नोंदींचं संसोधन करायचं त्यांनी टरविलं आणि त्यानुसार या नोंदींची मायक्रोप्रिंट घेण्याचं काम सुरू झालं.
नाशिकला, गोदावरीच्या तीरावर, सुमारे ३५० पुरोहित आहेत. पिढीजात पूजाअर्चा, भिक्षुकी व धार्मिक अुपक्रमांमध्ये व्यस्त असलेल्या या पुरोहितांनी धर्म, जाती व पोटजातीनुसार भारतीय समाजाचं वर्गीकरण केलं असून, विशिष्ट जातीचे व पोटजातीचे तसेच विशिष्ट धर्माचे ठराविक पुरोहित आहेत.
आपला पुरोहित कोण आहे याची माहिती, ५ मिनीटांच्या अवधीत, रामकुंडाजवळील पुरोहित संघाच्या कार्यालयात, देशातल्या कोणालाही प्राप्त होते व पुढच्या १५ मिनिटात त्या पुरोहिताची प्रत्यक्ष भेटहि होते. पुरोहित आपल्या १०० पानी चोपडीत, आलेल्या भाविकाचं नाशिकला येण्याचं कारण, त्याच्या कुटुंबाची पूर्ण वंशावळ, कुटुंबातले अुपस्थित आहेत त्यांची हस्ताक्षरं व स्वाक्षर्या या चोपडीत नोंदवून घेतात. याबद्दल त्यांना भाविक, आपल्या कुवतीनुसार विशेष दक्षिणा देतात.
पुरोहिताच्या अनेक पिढ्यांनी, अत्यंत कष्टानं जपलेल्या या वंशावळींच्या नोंदींचं जेव्हा संशोधन सुरू झालं तेव्हा प्रत्येक पानासाठी ५० पैसे मानधन दिलं जात असे. हे मानधन अत्यल्प असल्याचं पुरोहितांनी निदर्शनाला आणून दिल्यावर, अमेरिकन विद्यापीठाच्या संशोधकांनी, पुरोहितांची मागणी मान्य करून, चोपडीच्या प्रत्येक पानामागे आता १ रुपया मानधन देण्याचं मान्य केलं आहे.
अमेरिकन संशोधक पथकानं, आतापर्यंत ५ ते ६ पुरोहितांच्या नोंदींचं संशोधन पूर्ण केलं असून, हे काम वर्षभर तरी चालेल असं समजतं. या नोंदींचं संशोधन करून कोणता निष्कर्ष निघतो या विषयी सर्वांनाच कुतूहल आहे.
`तुमचं कूळ आणि पूर्वज` हाही असाच अेक प्रोग्रॅम आहे. यात जगभरच्या जनतेची `कुळं` नोंदविली आहेत. ज्या संस्थेनं ही आज्ञावली तयार केली त्या संस्थचे प्रतिनिधी जगभर हिंडले आणि त्यांनी, त्या त्या देशातील अनेक कुटुंबांची माहिती गोळा केली. भारतातदेखील ते बनारस, अलाहाबाद, मदुराअी, नाशिक, पंढरपूर, माहूर वगैरे तीर्थक्षेत्री आले आणि रग्गड पैसे देअून बडव्यांकडच्या वह्यांच्या झेरॉक्स कॉप्या घेअून गेले असं वृत्त वाचल्याचं आठवतं.
http://www.ancestry.com ”या वेबसाअटला भेट द्या आणि आपला कुलवृक्ष १५ दिवसपर्यंत अगदी फुकट पहा नंतर त्यांची फी देअून ठराविक नोंदी आपल्याजवळ ठेवा” अशी जाहीरातही ते करीत आहेत. या साअीटवर १.५ अब्ज नोंदी आणि ७० कोटी नावं आहेत असा त्यांचा दावा आहे.
अमेरिकेत विवाहांच्या नोंदी, जन्ममृत्यूच्या नोंदी, सोशल सिक्यूरिटी नंबर्स, वाहनचालक परवाने, गुन्ह्यांच्या नोंदी, न्यायालयातल्या नोंदी, तुरुंगातल्या कैद्यांच्या नोंदी, युध्दातील सैनिकांच्या नोंदी, पासपोर्ट, व्हीसा, अमेरिकेत आलेले आणि अमेरिकेबाहेर गेलेले पर्यटक वगैरेंच्या याद्या संगणकांच्या सहाय्यानं अद्ययावत स्वरूपात ठेवलेल्या असतात.
या याद्या तयार करतांना, बहुतेक वेळा व्यक्तीचे जोडीदार म्हणजे स्पाअुस, अपत्यं त्यांची जन्मस्थळं, आअीवडिलांची नावं, पत्ते, त्यांची जन्मस्थळं, महिलांची विवाहापूर्वीची नावं वगैरे अुदंड माहिती भरून द्यावी लागते. आणि त्या याद्यातील माहिती योग्य मार्गांनी, योग्य आणि गरजू व्यक्तींना मिळविता येते. या सर्वांमुळे, व्यक्ती आणि कुलवृत्तांत यांचं संकलन करणं कठीण नाही.
या सर्वांचा अुपयोग करून American Genealogical-Biographical Index म्हणजे ‘अमेरिकन व्यक्ती आणि त्यांचा कुलवृत्तांत’ तयार केला आहे. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाचा वंशवृक्ष तयार करता यतो. केव्हढं हे प्रचंड काम आहे.
वर्षानुवर्षे टिकणारा कागद आणि शाअी वगैरे लेखनसाहित्य मिळविणं, या वह्यात अक्षरानुक्रमे नोंदी लिहून ठेवणं, त्या वह्या वर्षवार लावून ठेवणं, वातानुकूलन नसलेल्या, ओल आलेल्या, अुंदीर, झुरळं आणि किडे असलेल्या, मातीच्या घरात, या वह्या पिढ्यान् पिढ्या जतन करून ठेवणं म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाला लाजवील असंच तंत्रज्ञान आपल्या पूर्वजांनी विकसित केलं आहे असं म्हटलं पाहिजे.
जीवनाच्या अनेक क्षेत्रात, आपल्या संस्कृतीत, परंपरागत, अनुभवसिध्द विज्ञान आणि तंत्रज्ञान सामावलेलं आहे. परंतू पाश्चिमात्य देशातील शास्त्रज्ञांनी आपल्याला दाखविल्याशिवाय ते आपल्याला दिसत नाही हे आपलं दुर्दैव !! दिवेलागणीच्या सांजवेळी, लहानपणी, आम्ही परवचा, पाढे आणि अनेक श्लोक पाठ म्हणत असू. अनेक वेळा पाठांतर केल्यामुळे ते ज्ञान आपल्या मेंदूत पक्कं बसत असे. त्यामुळे त्या ज्ञानाचा वापर करतांना फारसा विचार न करता आणि वेळ न घालवता, अचूकता साधता यायची. परीक्षेच्या वेळी या पाठांतराचा कॅल्क्युलेटरसारखा अुपयोग होतो.
देवादिकांच्या आरत्या आपण अितक्या वेळी म्हटल्या असतात की, आपली वाणी, त्या स्वयंचेता यंत्रणेद्वारेच म्हणत असते. मनात दुसरे विचार येत असतात पण आरती बरोबर म्हटली जात असते.
सध्या अमेरिकेत शाळकरी पोरं ‘Kumon’ नावाच्या क्लासेसला जातात. त्यासाठी महिन्याकाठी ५० ते १०० डॉलर फी भरतात. शिवाय या मुलांना, त्यांचे आअीवडील, क्लासला ८ ते १० किलोमीटर अंतरावर मोटारीतून पोचवितात आणि तासाभरानं ‘पिकप’ करतात. आठवड्यातून दोनतीन वेळातरी हा कार्यक्रम असतो.
कुमॉन ही शिक्षणाची जपानी पध्दत आहे. अेखादी बाब अनेक वेळा, वारंवार वाचली, अुच्चारली किवा कृतीत आणली तर ती मेंदूत पक्की बसते किंवा आपल्या शरीराला त्याची सवय होते अितकी की, ती शरीराच्या स्वयंचेता यंत्रणेत बसते. शिक्षणाच्या या पद्धतीचा प्रचार योजनापूर्वक केला जात आहे. तुमच्याकडे क्लास घेण्यासाठी मोक्क्याच्या ठिकाणी जागा असेल तर ही मंडळी तुम्हाला सर्व लेखनसाहित्य, अगदी स्वस्तात पुरवितात. हा धंदा आपल्याकडील कोचिंग क्लाससारखा फायदेशीर होतो आहे.
अेखादा व्यवहार वारंवार करीत राहिल्यास तो आपल्या हाडीमासी भिनतो, अगदी अंगवळणी पडतो हे मात्र खरं आहे. माझी नात वय वर्षे ४, जी अमेरिकेत जन्मली आणि वाढली ती, पहिल्यांदाच भारतात आली होती. मी तिला जवळपासच फिरायला घेअून गेलो आणि चालताचालता विरंगुळा म्हणून तिला दोन चॉकलटं खायला दिली. परत आल्यावर बघतो तर तिनं मुठीत काहीतरी घट्ट धरून ठेवलं होतं. मूठ अुघडली तर ती चॉकलेटची आवरणं होती. तिला अमेरिकेसारखी कचराकुंडी कुठं दिसली नाही म्हणून तिनं ती आवरणं घरी आणली.
तिला बिचारीला काय माहित की भारतात, अख्खा परिसर म्हणजेच अेक भलंमोठं कचराकुंड आहे आणि त्यात सर्वांनी वाटेल तसा आणि वाटेल तेव्हा खुशाल कचरा फेकीत जावं. कुठेही कचरा फेकू नये हे तिच्या हाडीमासी भिनलं आहे तर कुठेही कचरा फेकावा हे आमच्या स्वयंचेता यंत्रणेत भिनलं आहे. दैनंददिन व्यवहारात, कचरा सुव्यवस्थापन हे आपल्या अगदी अंगवळणी पडला पाहिजे.
बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अुत्पादनांच्या जाहीराती, टीव्हीवर सतत, वारंवार दाखविल्या जात असतात. मेंदूवर सतत आघात होत असल्यामुळे या जाहीराती मेंदूवर पक्क्या ठसतात. अुत्पादनाचे अनेक `गुण`, जाहीरातीच्या माध्यामातून, तुमच्या मेंदूत ठासून भरले जातात आणि त्याचे पैसेही तुमच्याच खिशातून काढले जातात. !! टीव्हीवर अेकच जाहिरात, लागोपाठ अनेक वेळा दाखविणं किंवा अेका टीव्ही मालिकेला तोचतोच प्रायोजक लाभणं यात देखील हेच तत्व आहे. मोठ्या आवाजातील आणि भडक दृष्यातील जाहीरात अनेक वेळा दिसली की ती प्रेक्षकांच्या मेंदूत पक्की बसते.
आपल्या दैनंदिन जीवनात पूर्वापार पध्दतींनं आपण असे अनेक व्यवहार करीत असतो. परंतू त्यांचं महत्व आणि अुपयोगिता आपल्या लक्षात येत नाही. विज्ञानीय दृष्टीकोनातून पाहिल्यास कदाचित, त्या तंत्रांचा वापर, आजच्या व्यवहारांतही चांगल्या तर्हेनं करणं शक्य होअील. अुदा. आपण अनेक प्रकरच्या नोंदी ठेवतो. मुलंही अभ्यासाच्या नोंदी काढतात, घरातला कर्ता पुरूष, फोन नंबर, बँकांची खाती, राखीव ठेवी, ओळखीच्या व्यक्तींचे पत्ते, आयकर वगैरेसाठी लागणार्या नोंदी रोखीनं व्यवहार केल्याच्या पावत्या अशा अनेक नोंदी आणि कगदपत्रं ठेवीत असतो. ते सर्व पध्दतशीरपणे ठेवल्यास, संदर्भ चटकन आणि अचूकतेनं मिळू शकतील. तीर्थक्षेत्रीच्या बडव्यांकडून स्फूर्ती मात्र घेतली पाहिजे.
मुंबअीचे डबेवाले आणि तीर्थक्षेत्रीचे बडवे हे हिंदूस्थानातले लोक आहेत. परंतू त्यांनी अिंडियातल्या लोकांसारखं काम करून, जगातल्या अेका सुप्रसिध्द मासिकाडून आणि अद्ययावत संगणक वापरणार्या संस्थेकडून वाहवा मिळविली आहे हे लक्षात घ्यावं. या कामासाठी त्यांनी अिंडियातले संगणक वापरले नाहीत हे विशेष.
— गजानन वामनाचार्य.
मनबोली : मुंबअी तरूण भारत : गुरूवार ८ ऑगस्ट २००२ (डबेवाले)
मनबोली : मुंबअी तरूण भारत : शनिवार २४ ऑगस्ट २००२ (बडवे)
मराठी विज्ञान परिषद पत्रिका : डिसेंबर २००२.
Leave a Reply